तोंड कोरडे पडणे – Dry Mouth :
बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात.
तोंड कोरडे पडणे ही एक सामान्य समस्या आहे. तसेच काहीवेळा इतर आजारातही तोंड कोरडे पडण्याची समस्या होत असते.
तोंड कोरडे पडण्याची कारणे (causes) :
अनेक कारणांमुळे तोंड कोरडे पडत असते. विशेषतः शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊन ही समस्या होत असते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार ठरू शकतात.
- मानसिक तणाव,
- स्मोकिंग, तंबाखूचे व्यसन,
- अँटीहिस्टामाइन्स, एंटीडिप्रेससन्ट्स यासारखी औषधे घेतल्याने,
- रेडिएशन थेरपीमुळे,
- तोंडावाटे श्वास घेण्याची सवय,
- वृद्धावस्था अशा विविध कारणांमुळे तोंड कोरडे पडते.
याशिवाय डायबेटीस, अतिसार, ताप येणे, अल्झायमर, सिस्टिक फायब्रोसिस, एचआयव्ही आणि एड्स अशा आजारातसुद्धा तोंड करडे होणे हे लक्षण असू शकते.
तोंड कोरडे पडणे यावरील घरगुती उपाय :
- पुरेसे पाणी प्यावे.
- दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- शहाळ्याचे पाणी, रसदार फळे, लिंबूपाणी, सरबत यांचा समावेश करावा.
- तीन ते चार काळ्या मिरी चावून खाव्यात. यामुळे लाळग्रंथी क्रियाशील होण्यास मदत होईल.
- वेलदोडे, बडीशेप किंवा आले चावून खाल्यासही तोंड कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
- स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- दररोज दात स्वच्छ करावेत.
- दात घासताना तोंडाची स्वछताही करावी.
- कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
तोंड कोरडे पडत असल्यास डॉक्टरांना कधी भेटावे..?
कोरड्या तोंडाची समस्या वारंवार होत असल्यास किंवा घरगुती उपाय करूनही समस्या दूर होत नसल्यास आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी. याशिवाय खालील लक्षणे असल्याससुद्धा आपल्या डॉक्टरांकडे जावे.
- सतत आपले तोंड किंवा घसा कोरडा वाटणे,
- जीभ खडबडीत होणे,
- क्रॅक ओठ,
- अन्नपदार्थ चघळताना किंवा गिळताना त्रास होणे,
- तोंडाला चव नसणे,
- तोंडातून दुर्गंधी येणे,
- किंवा विशिष्ट औषधे घेतल्यानंतर तोंड कोरडे पडत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जावे.
हे सुद्धा वाचा..
तोंड येण्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपचारांची माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry Mouth Causes, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.
माझे वय 53 वर्षे असून माझे सारखे तोंड कोरडे पडते. कृपया उपाय सांगा
दिवसभरात वरचेवर पाणी व रसदार फळे यांचे सेवन करा. तसेच जर सारखे तोंड कोरडे पडत असल्यास ब्लड शुगर तपासून घ्या. कारण डायबेटिस मुळेही हा त्रास होऊ शकतो.