डोक्यात खाज येणे – Head itching :
डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यामध्ये अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही डोक्यात खाज येत असते. अशी डोक्यात खाज येण्याची कारणे अनेक असतात.
डोक्यात खाज येण्याच्या त्रासावर योग्यवेळीच उपाय करणे गरजेचे असते. कारण डोक्यात जास्त खाजवल्यामुळे जखम होऊन तेथील त्वचेतून रक्त येण्याची आणि इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे केसांची मूळंही हलतात आणि त्याचा परिणाम होऊन केसगळतीही मोठ्या प्रमाणात होते.
डोक्यात खाज येण्याची कारणे :
- डोक्याची त्वचा (स्काल्प) कोरडे पडल्यामुळे,
- केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे,
- केसात इन्फेक्शन झाल्याने,
- केसात उवा झाल्याने,
- डोक्याच्या त्वचेला सूज आल्यामुळे (seborrheic dermatitis),
- वातावरणातील बदलामुळे जसे पावसाळ्यात भिजल्याने किंवा उन्हाळ्यात केसातील घामामुळे,
- केसांची स्वच्छता व निगा न ठेवल्याने,
- हार्मोन्समधील बदलांमुळे,
- हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या ऍलर्जीमुळे,
- मानसिक तणावामुळे,
- तसेच सोरायसिस, शीतपित्त, ऍलर्जी, eczema, डायबेटीस ह्या आजारांमुळेही डोक्यात खाज येऊ शकते.
डोक्यात खाज येणे यावर घरगुती उपाय :
- डोक्यात खाज येत असल्यास डोक्याला खोबरेल तेलाने मालिश करावी.
- उवांमुळे डोक्यात खाज येत असल्यास सिताफळाच्या बियांच्या चूर्णाची पेस्ट केसांच्या मुळांशी लावावी व थोड्यावेळाने केस धुवा. यामुळे उवा कमी होऊन डोक्यातील खाज कमी होते.
- केसात कोंडा झाल्याने डोक्यात खाज येत असल्यास पाच चमचे खोबरेल तेलात लिंबूरस घालून ते मिश्रण केसांच्या मुळांशी लावावे व थोड्यावेळाने केस धुवावेत. यामुळे कोंडा कमी होऊन डोक्यातील खाज कमी होते.
- केसांच्या मुळांना कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवा. हा आयुर्वेदिक उपाय डोक्यात खाज येणे यावर खूप चांगला आहे.
- कोमट पाण्यात थोडे अॅपल व्हिनेगर घालून त्याने केसांना मालिश केल्यास कोरडेपणा जाऊन डोक्यामध्ये होणारी खाज कमी होते.
डोक्यात खाज येणे यावर वर दिलेले घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतात.
डोक्यात खाज येणे यावरील शॅम्पू –
डोक्यामध्ये जास्त खाज येत असल्यास Salicylic acid किंवा Ketoconazole हे औषध घटक असणारे शॅम्पूचा वापर करू शकता.
हे सुद्धा वाचा – केसातील उवा जाण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.
डोक्यामध्ये खाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा..?
एक आठवड्यापेक्षा जास्त काळ डोक्यात खाज होत असल्यास किंवा डोक्यात खाज येण्याबरोबरच त्याठिकाणी वेदना होणे, जखमा होणे, पुरळ, डोक्यात फोड येणे, चट्टे येणे, सूज येणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घेणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा – केसातील कोंडा दूर करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.
निष्कर्ष – Conclusion :
अशाप्रकारे याठिकाणी डोक्यात खाज येण्याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती दिली आहे. डोक्यात खाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपाय करावेत. कारण डोक्यात येणाऱ्या खाजेमुळे डोक्यात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच डोके सारखे खाजवल्याने केसांची मुळे हलतात व कमजोर होतात. त्यामुळे पुढे केसगळतीही मोठ्या प्रमाणात होऊ लागते.
हे सुद्धा वाचा – केस गळतीवरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Head itching causes and treatments. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.