जुलाब व उलट्या होणे :
पातळ जुलाब आणि वारंवार उलट्या होण्याचा त्रास काहीवेळा होत असतो. प्रामुख्याने दूषित अन्न व पाण्यातून संसर्ग झाल्याने हा त्रास होऊ लागतो. जुलाब व उलटी होणे हे जरी सामान्य वाटत असले तरीही अशावेळी अधिक काळजी घ्यावी लागते. कारण वारंवार जुलाब व उलटी झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढतो.
डिहायड्रेशनमुळे अनेक गुंतागुंत निर्माण होत असते. यासाठी जुलाब, उलट्या होत असल्यास शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.
जुलाब व उलटीवरील महत्त्वाचा उपाय :
वरचेवर तरल पदार्थ किंवा ओआरएस मिश्रण पिणे हा जुलाब व उलटीवरील महत्त्वाचा उपाय आहे. कारण सतत पातळ जुलाब किंवा उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी सोडियम, पोटॅशियम ह्या क्षार घटकांचे शरीरातील प्रमाण कमी होते.
यासाठी जुलाब व उलट्या होत असल्यास गरम करून थंड केलेल्या एक लिटर पाण्यात 6 चमचे साखर व अर्धा चमचा मीठ मिसळून मिश्रण तयार करावे. जेंव्हाजेंव्हा जुलाब होईल तेंव्हातेंव्हा यातील थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका टाळतो.
याशिवाय यासाठी आपण तरल पदार्थ, पाणी, फळांचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ओआरएस इलेक्ट्रॉल पावडरही वापरू शकता. हा उपाय सर्वांनी करावा.
जुलाब व उलटीवर हे करा घरगुती उपाय :
लिंबू रस व मध –
एक चमचा लिंबू रसात एक चमचा मध मिसळावे. ह्या मिश्रणाचे वरचेवर चाटण केल्यास मळमळ, उलटी व जुलाब थांबण्यास मदत होते.
आले व मध –
आल्याचा तुकडा मधाबरोबर खाल्याने जुलाब आणि उलटी कमी होण्यास मदत होते.
दालचिनी व मध –
एक कप उकळत्या पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर (cinnamon powder) घालून मिश्रण उकळून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात थोडे मध घालून प्यावे. जुलाब आणि उलटी वर हा घरगुती उपायही उपयुक्त ठरतो.
उलटी व जुलाब होत असल्यास असा घ्यावा आहार :
पातळ जुलाब व उलट्या होत असल्यास काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
- जुलाब, उलट्या लागल्यास पचनास हलका आहार घ्यावा.
- जुलाब होत असल्यास तळलेले पदार्थ, तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे टाळावे.
- बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
- पाणी उकळवून थंड करून प्यावे.
- डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाण्यासारखे द्रव्य पदार्थ, ओआरएस मिश्रण, नारळपाणी पुरेसे प्यावे.
जुलाब व उलट्या थांबवण्यासाठी ही घ्यावी काळजी :
- घरगुती उपाय करूनही जुलाब किंवा उलट्या थांबत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
- जुलाब प्रामुख्याने जिवाणू किंवा विषाणूंच्या इन्फेक्शनमुळे होत असतो.
- घरगुती उपायांनी इन्फेक्शन आटोक्यात आणता येत नाही. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
- उलटी व जुलाब लागल्यास शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते यासाठी तरल पदार्थ, पाणी किंवा ओआरएस मिश्रण वरचेवर पीत राहावे.
- जुलाबमुळे अशक्तपणा येत असतो तेंव्हा अशावेळी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
- आहारातून इन्फेक्शन होऊ नये यासाठी घरात पुरेशी स्वच्छता ठेवावी.
हे सुद्धा वाचा..
उलटी होणे यावरील उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Vomiting and Diarrhoea Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.