उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Hiccup in Marathi)

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

Hiccup in marathi, uchaki upay in marathi, uchaki band honyache upay, hichki var upay.

उचकी लागणे (Hiccup) :

अचानक कधीही उचकी येत असते. उचकी लागल्यावर अस्वस्थता होते. कधीकधी सारख्या उचक्या येत असतात अशावेळी त्यांना रोखणेही अवघड असते. यासाठी उचकी का लागते, त्याची कारणे काय आहेत आणि उचकी बंद होण्याचे उपाय याठिकाणी दिले आहेत. या उपायांमुळे आपली उचकी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल.  

उचकी का लागते..?

आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाची मांसपेशी (मसल्स) अचानक अकुंचन पावल्याने उचक्या येत असतात.

उचकी लागणे कारणे :

उचकी सुरू होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण खाण्यामुळे, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते.

उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय :

थंड पाणी –
उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते.

काही सेकंद श्वास रोखणे –
उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. 

मध आणि लिंबू –
उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्ल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. किंवा एक चमचा लिंबू रसात एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते.

साखर आणि मीठ –
उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे-थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते. 

काळे मिरे –
तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात धरून चावत राहावी. त्यावर एक ते दोन घोट पाणी पिण्यामुळे उचक्या थांबतात.

उलटे अंक मोजा –
100 ते 1 असे उलटे अंक मोजल्याने उचकी थांबण्यास मदत होते. तसेच उचकी लागलेल्या व्यक्तीला अचानक घाबरविल्यासही उचकी थांबते.

जेवताना उचक्या लागत असल्यास हे करा..

अनेकदा घाईघाईत जेवताना उचकी लागते. त्यामुळे उचकी थांबवण्यासाठी पाणी प्यावे लागते पर्यायाने जेवण पूर्ण होण्याआधीच पाण्याने पोट भरते. यासाठी जेवताना उचकी लागू नये म्हणून जेवताना सावकाश, एक-एक घास चावत गिळावे आणि भरपेट जेवणेही टाळावे.

उचकी येत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

उचकी येणे सामान्य गोष्ट आहे मात्र जर घरगुती उपाय केल्यानंतरही उचकी थांबत नसल्यास किंवा उचकीचा सतत त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

Hiccups in Marathi – What Causes Hiccups? What Are the Home Remedies of Hiccups in Marathi information.

© कॉपीराईट विशेष सूचना :
वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.