गरोदरपणातील तिसरा महिना – लक्षणे, आहार, तपासणी व काळजी

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Three month pregnancy tips in Marathi.

गरोदरपणातील तिसरा महिना :

प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती, या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते. यासाठी याठिकाणी गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यात होणारे बदल आणि घ्यावयाची काळजी, आहार, विहार याविषयीची माहिती दिली आहे.

गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यात गर्भामध्ये होणारे बदल :

तिसऱ्या महिन्यात गर्भाची डोळे, कान, नाक, हात, पाय असे अंग-अवयव तयार होऊन त्यांची वाढ होऊ लागते. त्याच्या डोक्यावर केस येत असतात व संपूर्ण अंगावर लव येत असते. गर्भाशयातील गर्भजलात सुरक्षितपणे आपले बाळ तरंगत असते. गर्भजलामुळे त्याचे धक्क्यापासून संरक्षण होत असते. तिसऱ्या महिन्यात गर्भ हा अगदी तळ हातात मावेल एवढ्या लहान आकाराचा असतो. सोनोग्राफी केल्यास, एखाद्या छोट्या बाहुलीप्रमाणे बाळाचा आकार दिसतो.

तिसरा महिना संपत असताना, नाळ (Placenta) पूर्णपणे तयार झालेली असते. या नाळेमार्फतच गर्भाचे संपूर्ण पोषण होत असते. त्यामुळे या नाळेतील रक्तपुरवठा योग्य रीतीने होत असणे गरजेचे असते. त्यासाठी गरोदर मातेचा आहार, विहार, औषधी योग्य असणे गरजेचे असते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गरोदर स्त्री मध्ये तिसऱ्या महिन्यात होणारे बदल :

दुसऱ्या महिन्यात जाणवणारी उलट्या होणे, मळमळणे, अशक्तपणा वाटणे यासारखी लक्षणे तिसऱ्या महिन्यात थोडी कमी होतात.

तिसऱ्या महिन्यात भूक जरा वाढू लागते. मात्र याही महिन्यात वजन फारसे वाढलेले दिसत नाही. कंबर व स्तनांभोवती कपडे जरा घट्ट होत असल्याचे जाणवेल. तिसऱ्या महिन्यानंतर गरोदर असल्यामुळे पोटावर एक लहानसा उंचवटा दिसू लागेल.

गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यात अशी घ्या काळजी..

गरोदरपणात तिसऱ्या महिन्यातील आहार –
तिसऱ्या महिन्यात मळमळणे, उलट्या होणे यासारख्या समस्या थोड्याफार कमी होतात. तसेच अचानक वरचेवर भूक लागल्याचे जाणवते. यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. ताजा व संतुलित आहार घ्यावा.

आहारात पोळी, भात, डाळी, भाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असणारे दूध व दूधाचे पदार्थही आहारात असावेत. त्यामुळे बाळाचे हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

गरोदरपणात शरीराला ताकद देणारे प्रोटिन्सयुक्त पदार्थही आहारात असणे आवश्यक असते. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मटण, मासे, चिकन यांचा समावेश करावा. आहारात आयोडिनयुक्त मीठचं वापरावे. आयोडिनमुळे बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते. मात्र मीठ अधिक प्रमाणात खाणे टाळावे. तसेच गरोदरपणात तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.

गरोदरपणात तिसऱ्या महिन्यातील औषधे –
आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. गरोदरपणात लोहवाढीसाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला दररोज लोहाची गोळी घ्यायला सांगू शकतात. अशा गोळ्या किंवा औषधे घेणे गरोदर माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.

गरोदरपणात तिसऱ्या महिन्यातील तपासण्या –
गरोदरपणात बऱ्याचशा तपासण्या ह्या तिसरा महिना झाल्यानंतर केल्या जातात. तसेच ज्या गरोदर स्त्रीचे वय 35 च्या पुढे असेल व त्यांचे हे पहिलेच गर्भारपण असेल किंवा ज्यांना आनुवंशिक आजाराची पाश्र्वभूमी असल्यास अशा गर्भिणी स्त्रीच्या, रक्ताची एक तपासणी (Double Marker associated with ultrasonography) तिसऱ्या महिन्याचा शेवटी केली जाते. यातून आपल्याला गर्भाला, जीवावर बेतणारे कोणते आजार नाहीत ना? हे समजून घेण्यास मदत होते.

गरोदरपणात तिसऱ्या महिन्यातील कामे व विश्रांती –
गरोदरपणात तिसऱ्या महिन्यातही थकवा आणणारी कामे टाळावित. गरोदरपणात जड वस्तू उचलणे-ढकलणे, शिडीवर चढणे अशी कुठलीही कामे करू नयेत. घरातील हलकी कामे, स्वयंपाक करणे अशी कामे करावीत.

गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा जाणवतो त्यामुळे शक्य तेव्हा थोडासा आराम जरूर करावा. गरोदरपणात तिसऱ्या महिन्यात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी रात्री 8 ते 9 तास शांत झोप मिळाली पाहिजे. याशिवाय दुपारीही 1 ते 2 तास झोप किंवा विश्रांती घेतली पाहिजे.

प्रवास आणि गरोदरपणाचा तिसरा महिना –
पहिल्या तीन महिन्यामध्ये अधिक प्रवासामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. त्यांमुळे लांबचा प्रवास करणे टाळावे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.

वैयक्तिक स्वच्छता आणि गरोदरपणाचा तिसरा महिना –
गरोदरपणात सुरवातीपासुनच वैयक्तीक स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी. यासाठी दररोज अंघोळ करावी. स्नान करताना स्तन आणि गुप्तांगांना स्वच्छ पाण्याने धुवावेत. तसेच स्तनास चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे म्हणजे बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.

गरोदरपणात सैलसर, हलके, आरामदायी, स्वच्छ वस्त्रे घालावीत. पोट, स्तन यावर वस्त्रांचा दाब येणार नाही याची दक्षता घ्यावी तर उंच टाचांच्या चपला घालू नये. याशिवाय जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा.

व्यायाम आणि गरोदरपणाचा तिसरा महिना –
आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत. चालण्याचा व्यायाम जरूर करावा. याशिवाय काही सोपी योगासनेही करू शकता.

तसेच गरोदरपणात मानसिक ताण येण्याची अधिक शक्यता असते. यासाठी कोणताही ताण घेऊ नये. ताण घालवण्यासाठी संगीत ऐकणे, विविध पुस्तके वाचणे, प्राणायाम-ध्यान धारणा करणे असे उपाय करू शकता.

व्यसने आणि गरोदरपणाचा तिसरा महिना –
अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू यासारखी व्यसने करू नयेत. तसेचं सेकंडहँड स्मोक अर्थात दुसरी व्यक्ती स्मोकिंग (धूम्रपान) करीत असताना त्या सिगारेटच्या धुरामध्ये राहू नये.

शारिरीक संबंध किंवा सेक्स आणि गरोदरपणाचा तिसरा महिना –
गरोदरपणात सेक्स करू शकतो का? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. गरोदरपणात शारिरीक संबंध (सेक्स) करणे शक्यतो टाळावेत कारण, पहिल्या तीन महिन्यामध्ये सेक्स करण्याने गर्भपाताचा धोका अधिक असतो.

तिसऱ्या महिन्यात जाणवणाऱ्या समस्या :

थकवा येणे –
गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाबही कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशयात वाढणाऱ्या छोट्याशा बाळाला वाढविण्यासाठी आईच्या शरीरातील बरीच ऊर्जा वापरली जाते. यांमुळे गरोदरपणी थकवा येत असतो. सुरवातीच्या दोन महिन्यात थकवा जास्त जाणवतो त्यामानाने तीसऱ्या महिन्यापर्यंत थकवा व अशक्तपणा कमी होत जातो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

थकवा जाणवत असल्यास अशावेळी योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. यासाठी दिवसा विश्रांती घेणेही उपयुक्त असते. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळेही थकवा जाणवू शकतो. अशावेळी डॉक्टरांनी दिलेली लोह वाढीसाठीची औषधे नियमितपणे घेणे आवश्यक असते.

पोटात दुखणे –
स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत असल्याने, गर्भाशयाचे स्नायु खेचले जातात त्यामुळे ओटीपोटातही दुखू शकते. गरोदरपणात ओटीपोटात दुखणे ही एक सामान्य बाब आहे. अशावेळी थोडी विश्रांती घ्यावी. ज्या बाजूला दुखत असेल त्याच्या विरुद्ध बाजूवर झोपून आराम करावा. मात्र अधिक तीव्रतेने ओटीपोटात दुखत असल्यास, योनीतुन रक्तस्त्राव किंवा पाणी जात असल्यास आपल्या स्त्रीरोगतज्ञांचा तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे.

3 Months Pregnant – Pregnancy Symptoms, Diet plan, Baby Growth information.