गरोदरपणात कोणती काळजी घ्यावी..? (Pregnancy Care Tips in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Pregnancy Care Tips and Instructions in Marathi

गरोदरपणातील आहारासंबंधी (Diet) विशेष सूचना :उपवास व डाएट करणे टाळा :
गरोदरपणात उपवास व डाएट करणे टाळावे. यामुळे तुम्ही तसेच तुमचे बाळ व्हिटामिन, लोह व फॉलीक ऍसिड, खनिजे यासारख्या अत्यावश्यक पोषकद्रव्यापासून दूर रहाल. याचा विपरित परिणाम आपल्या व बाळाच्या आरोग्यावर होईल.

प्रवास (Travelling) आणि गर्भावस्था :
गरोदरपणात प्रवास करावा का अशाही अनेकजणींचा प्रश्न असतो. गरोदरपणात लांबचा प्रवास करणे टाळावे. पहिल्या तीन महिन्यामध्ये अधिक प्रवासामूळे गर्भपाताचा धोका वाढतो तर शेवटच्या तीन महिन्यामध्ये अधिक प्रवासामुळे अकाली प्रसव (प्री-मॅच्युअर) होण्याचा धोका वाढतो. दुचाकीवरुन प्रवास करणे शक्यतो टाळावे.

गरोदरपणातील कामे व विश्रांतीसंबधी सूचना :
गरोदरपणात हलकी फुलकी कामे करायला काहीच हरकत नाही. स्वयंपाक करणे, झाडलोट करणे अशी सहज करता येण्याजोगी पण कमी श्रमाची कामे करावीत.
• घरातील सामान्य कामे करावित.
• ‎थकवा आणणारी कामे टाळावित. गरोदरपणात जड वस्तू उचलणे – ढकलणे, शिडीवर चढणे अशी कुठलीही कामे करू नयेत.
• ‎अवजड वस्तू उचलू नये. जड ओझी वाहू नयेत.
• ‎पाण्याचा हंडा वर उचलणे किंवा डोक्यावरून आणणे टाळावे.
• ‎सारासार विचार करून अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कामे टाळावीत.
• ‎पायऱ्‍या वारंवार चढणे किंवा उतरणे टाळावे.
• ‎वारंवार खाली वाकू नये.
• ‎अशक्तता जाणवल्यास आराम करणे गरजेचे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आराम, झोप आणि गर्भावस्था :
• गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
• गर्भारपणात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा जाणवतो त्यामुळे शक्य तेव्हा थोडासा आराम करावा.
• गरोदरपणात रात्री 8 ते 9 तास शांत झोप मिळाली पाहिजे. जागरण करु नका.
• ‎शेवटच्या काही महिन्यात गर्भाचा दाब जठारावर पडतो. त्यासाठी डोक्याशी उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दाब पडणार नाही व झोपही चांगली लागेल.
• ‎दुपारीही 1 ते 2 तास झोप किंवा विश्रांती घेतली पाहिजे. या काळात झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे.

वैयक्तिक स्वच्छता आणि गरोदरपणाची काळजी :
गर्भावस्थेत दररोज अंघोळ करण्याने ताजेतवाने वाटते.
मात्र अतिशय गरम पाण्याने स्नान करणे टाळा. यामुळे तुम्हाला डी-हायडरेशनचा त्रास व थकवा जाणवू शकतो परिणामी बाळाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.
स्तन आणि गुप्तांगांना स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची काळजी घेण्यासाठी ते विशेषत्वानं आवश्यक आहे. तसेच स्तनास चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे म्हणजे बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.
नवजात बालक हा सर्वस्वी मातेच्या दुधावर अवलंबून असल्याने गर्भावस्थेतच स्तनांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी स्तनांची स्वच्छता ठावावी. आपल्या डॉक्टरांकडून यासंदर्भात विशेष मार्गदर्शन घ्यावे.
सैलसर, हलके, आरामदायी, स्वच्छ वस्त्रे घालावित. पोट, स्तन यावर वस्त्रांचा दबाव येणार नाही याची दक्षता घ्यावी तर उंच टाचांच्या चपला घालू नका.

गर्भावस्था आणि व्यायाम :
गरोदरपणी थोडातरी व्यायाम रोज करावा त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल, मांसपेशी सक्रिय होतात, पाठदुखीपासून आराम मिळेतो तसेच तुम्ही शारीरिक बदलास सामोरे जाऊ शकाल. मात्र व्यायाम आपल्या डॉक्टरांच्या सुचनेनुसार सुरू करावा.
ज्यांना दिवसभर काही ना काही कामे करावे लागते त्यांना व्यायामाची फारशी आवश्यकता नसते ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ होण्याच्या दृष्टीने हलका-फुलका व्यायाम हा चांगला ठरतो. चालण्याचा व्यायाम, मोकळ्या हवेत फिरायला जाणे अधिक चांगले असते. काही सहज सुलभ योगासनेही तज्ञांच्या सल्ल्याने करता येतील.

शारिरीक संबंध (सेक्स) आणि गर्भावस्था :
गरोदरपणात सेक्स करू शकतो का? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. गरोदरपणात शारिरीक संबंध (सेक्स) करणे शक्यतो टाळावेत कारण, पहिल्या तीन महिन्यामध्ये शारिरीक संबंध (सेक्स) करण्याने गर्भपाताचा धोका अधिक असतो. शेवटच्या तीन महिन्यामध्ये सेक्स केल्यास अकाली प्रसुती (प्री मॅच्युअर) होते तसेचं गर्भाशयात इन्फेक्शन होण्याचाही धोका वाढतो.

नियमित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे :
प्रसूतीपूर्व नियमित चेकअप केल्याने गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवता येते व भविष्यातील धोके टाळण्यास मदत होते. गरोदरपणात तिसऱ्या महिन्यापासून नियमितपणे दवाखान्यात तपासणी डॉक्टरांकडून करून घ्यावी. सातव्या महिन्यानंतर दर पंधरा दिवसांनी दाखवावे व शेवटच्या महिन्यात दर आठ दिवसांनी दाखवावे हे अतिशय चांगले.
सातव्या, आठव्या आणि नवव्या महिन्यात तर तपासणी खूपच आवश्यक आहे. कारण हे महिने जास्त नाजूक अवस्थेचे असतात.

गर्भावस्था आणि इतर औषधे :
गर्भावस्थेपुर्वी जर आपण निद्रादायक, चिंताहर, वेदनाहर औषधांचे सेवन करत असल्यास, आपल्या डॉक्टरांना त्या औषधांची कल्पना देणे गरजेचे आहे.
अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (फूड ऍँड ड्रग ऑथॉरिटी FDA) औषधांचे वर्गीकरण गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले आहे. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे गर्भावर दुष्यरिणाम होऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात.
यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणे टाळा. कारण त्या औषधांचा दुष्परिणाम गर्भावर होण्याची शक्यता अधिक असते. औषधांच्या अतिसेवनाचाही गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषध दिलेल्या प्रमाणामध्येचं घ्या.

मद्यपान, धुम्रपान यासारखी व्यसने करू नका :
मद्यपान (Alcohol) आणि धुम्रपानामुळे (Smoking) बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो तसेच बाळाच्या अकाली जन्माची (pre-mature) शक्यता वाढते.
धुम्रपानाच्या सवयीमुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजाताचे वजन कमी होत जाते.
गर्भवतींनी इतरांकडून त्यांच्याकडे येणारा सिगारेटचा धूरदेखील (सेकंडहँड स्मोक) टाळावा कारण त्यामुळेही गर्भावर असेच घातक परिणाम होऊ शकतात.

प्रेग्नन्सी संबंधित मराठीत उपयुक्त माहिती देणारे खालील लेखही वाचा..
‎कसा असावा गरोदरपणातील आहार
‎गरोदरपणात कोणत्या तपासण्या कराव्या लागतात
‎गर्भाची वाढ कशी होते ते जाणून घ्या
‎कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..?
‎प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्स मराठीत
‎गरोदरपणातील विविध समस्या आणि उपाय
‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.