गरोदरपणातील लैंगिक संबंध (Sex During Pregnancy) :
गरोदरपणात लैंगिक संबंध किंवा सेक्स करू शकतो का, गरोदरपणात सेक्स करणे हे गर्भाच्या दृष्टीने सुरक्षित आहे की नाही असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. यासाठी येथे गरोदरपणात लैंगिक संबंध कधी ठेवू शकतो, अशावेळी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करू शकतो का..?
हो, प्रेग्नन्सीमध्येही आपण सेक्स करू शकता. जर स्त्रीची प्रेग्नन्सी सामान्य असल्यास आपण सेक्स करू शकता. तसेच गर्भवती स्त्री सेक्सच्या मूडमध्ये असल्यास प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करण्यास काहीच अडचण नसते.
गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवताना कोणती काळजी घ्यावी..? (Care tips)
गरोदरपणात सेक्स करताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते. पोटात गर्भाची वाढ होत असल्याने गरोदर स्त्रीचे पोट वाढलेले असते अशावेळी योग्य आरामदायक सेक्स पोझिशन निवडणे गरजेचे असते. विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या त्रैमासिकमध्ये सेक्सवेळी स्त्रीच्या पोटावर दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी.
गरोदरपणात किती वेळा सेक्स करू शकतो..?
सामान्य प्रेग्नन्सी असल्यास, कोणतीही विशेष आरोग्य समस्या नसल्यास आठवड्यातून दोनवेळा सेक्स करू शकता. जर आठवड्यातून तीन पेक्षा अधिकवेळा सेक्स केल्यास गरोदर स्त्रीच्या मूत्रमार्गात संसर्ग (UTI) होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यास त्यावर उपचार करणे आवश्यक असते. सेक्सनंतर UTI होऊ नये यासाठी संभोग केल्यानंतर लघवीला जावे व योनीमार्ग पाण्याने स्वच्छ धुवावा.
गरोदरपणात कितव्या महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठेवावेत..?
स्त्रीचे गरोदरपण सामान्य असल्यास व स्त्रीस कोणत्याही विशेष आरोग्य समस्या नसल्यास साधारण आठव्या महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठवू शकता.
गरोदर असताना कोणत्या महिन्यात सेक्स बंद करावा..?
नवव्या महिन्यात प्रसुतीची तारीख जवळ आल्यावर शेवटचे काही आठवडे सेक्स बंद करणे आवश्यक असते.
गरोदरपणात केंव्हा संभोग ठेवणे टाळावेत..?
गरोदरपणात स्त्रीला काही जटील आरोग्य समस्या असल्यास सेक्स करणे टाळणे आवश्यक असते. प्रामुख्याने खालील आरोग्य समस्या गर्भवतीमध्ये असल्यास लैंगिक संबंध टाळावेत.
• स्त्रीच्या गर्भाशयाचे तोंड कमजोर असल्यास तसेच त्याठिकाणी टाके घातलेले असल्यास,
• गरोदरपणात प्लेसेंटा प्रिवियाची स्थिती असल्यास,
• योनीतून रक्तस्राव येत असल्यास,
• पोटात अतिशय वेदना होत असल्यास,
• गर्भजलाची पिशवी फुटल्यास,
• गरोदर स्त्रीची इच्छा नसल्यास,
• तसेच जर पतीला लैंगिक आजार जसे जेनिटल हर्पीस वगैरे असल्यास गरोदरपणात सेक्स करणे टाळावे.
गरोदरपणात संबंध ठेवल्याने गर्भपात होतो का..?
गरोदरपणात गर्भ हा गर्भजलाच्या पिशवीमध्ये सुरक्षित राहत असतो. त्यामुळे गरोदरपणातही सेक्स केल्याने गर्भास विशेष असा धोका पोहचत नाही. मात्र जर आपल्या डॉक्टरांनी काही समस्या होणार असल्यास लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिल्यास सेक्स करणे टाळावे.
प्रेग्नन्सीत सेक्स केल्यास अकाली प्रसुती (प्री मॅच्युअर) होण्याची संभावना असते का..?
शेवटच्या तीन महिन्यामध्ये सेक्स केल्यास अकाली प्रसुती (प्री मॅच्युअर) होते की नाही यावर कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तरीही शेवटच्या काही दिवसात शक्यतो लैंगिक संबंध टाळावेत.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या
Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.