माझी कन्या भाग्यश्री योजनेची मराठीत माहिती (Mazi Kanya Bhagyashree yojana)

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

Mazi Kanya Bhagyashree yojana in Marathi

माझी कन्या भाग्यश्री योजना :
देशाची, राज्याची लोकसंख्या वाढत आहे. परंतु काही जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याचे दिसून येते. ही सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब आहे. राज्यामध्ये एक हजार मुलाच्या मागे मुलींची संख्या 894 इतकी आहे. यानुसार मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात व्हावी, मुला-मुलींमध्ये भेदभाव न ठेवता मुलांप्रमाणेच मुलींला वाढविले जावे, तिला शिक्षणाची संधी मिळावी, मुलींचे बालविवाह रोखणे हा उद्देश ठेवून राज्यात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सुरु केलेली सुकन्या योजना समाविष्ट करुन शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरु केली आहे.

सुकन्या योजनेत राज्यातील दारिद्र्यरेषेखाली कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीचा जन्म झाल्यापासून एक वर्षांच्या आत प्रत्येक मुलीच्या नावे 21 हजार 200 इतके आयुर्विमा महामंडळात गुंतवणूक करण्यात येत होती. मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रुपये 1 लाख एवढी रक्कम प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली होती. नवीन माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुकन्या समाविष्ट करुन ही योजना राज्यातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील कुटूंबात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत दोन प्रकारे लाभ देण्यात येणार आहेत. पहिल्या प्रकारात एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे, अशी मुलगी तर दुसऱ्या प्रकारात एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, अशा दोन्हीही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विविध टप्प्यात लाभ :
माझी कन्या भाग्यश्री या योजनेत विविध टप्प्यात मुलींना लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सुरुवातीला मुलगी व तिच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडण्यात येईल. यामध्ये रुपये 1 लाख अपघात विमा व रुपये 5 हजारापर्यंत ओव्हरड्राफ्ट घेता येईल. मुलीच्या नावे एलआयसीमध्ये 21 हजार 200 रुपयांचा विमा उतरण्यात येईल. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रुपये 1 लाख विम्याची रक्कम देण्यात येईल. मुलींच्या नावे ठेवण्यात आलेल्या रुपये 21 हजार 200 या रकमेतून रुपये 100 प्रत्येक वर्षी विमा हप्ता जमा करुन यामधून मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाणार आहे.

या विम्याअंतर्गत पुढीलप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.
1)अपघात/ मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू रुपये 30 हजार,
2) अपघातामुळे मृत्यू झाल्यास रुपये 75 हजार,
3) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रुपये 75 हजार,
4) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास रुपये 37 हजार 500,
5) आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा, सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला रुपये 600 इतकी शिष्यवृत्ती प्रति सहा महिने इयत्ता 9 वी पासून ते 12 पर्यंत शिकत असताना मुलीला दिली जाईल.

मुलीचे वय पाच वर्षे होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी रुपये दोन हजार प्रतिवर्षीप्रमाणे एकूण 10 हजार रुपये पाच वर्षाकरिता देण्यात येईल. दोन्ही मुली असतील तर प्रत्येक मुलीसाठी रुपये 1 हजार याप्रमाणे पाच वर्षांसाठी रुपये 10 हजार देण्यात येतील. मुलगी इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या टप्प्यात रुपये 2 हजार 500 याप्रमाणे पाच वर्षासाठी रुपये 12 हजार 500 देण्यात येतील. दोन्ही मुली असतील तर प्रत्येकी 1 हजार 500 याप्रमाणे रुपये 15 हजार पाच वर्षांसाठी देण्यात येतील. माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंत रुपये 3 हजार दरवर्षी प्रमाणे एकूण 21 हजार रुपये सात वर्षांकरिता देण्यात येतील. दोन्ही मुली असतील तर प्रत्येक मुलीला प्रत्येकी रुपये 2 हजार प्रतिवर्षी याप्रमाणे एकूण रुपये 22 हजार देण्यात येतील. मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर रुपये 1 लाख देण्यात येतील. यापैकी रुपये 10 हजार मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या आजी-आजोबाला सोन्याचे नाणे (रुपये 5 हजार कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र) देण्यात येणार आहे.

अपेक्षित परिणाम :
कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला जातो. तसाच मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. आर्थिक मदत दिल्यामुळे मुलींच्या पालनपोषणासाठी त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे तसेच त्या मुलीस करावयाचे लसीकरण व इतर खर्च करण्यासाठी कुटुंबास मदत होईल. इयत्ता 1 ली ते 5 वी व इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंत या आर्थिक मदतीचा उद्देश मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करावे हा आहे. जेणेकरुन पुढची येणारी मातांची पिढी ही शिक्षित होईल, असा उद्देश आहे. आई शिक्षित असल्यामुळे त्यांना होणारी मुलेही आरोग्य संपन्न असतील व त्या माता मुलगा-मुलगी असा भेदभाव करणार नाहीत. मुलींची संख्या वाढविण्यास मदत होईल. वयाच्या 18 व्या वर्षी या आर्थिक मदतीचा उद्देश मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे हा आहे. शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण माता या आरोग्य संपन्न मुलास जन्म देतील आणि त्यांच्या मुलांना शिक्षित करतील. सासू-सासरे यांच्याकडून मुलगाच पाहिजे असा दबाव टाकला जातो. यासाठी सासू-सासरे मुलगा व्हावा अशी अपेक्षा न करता आपल्या सुनेस एकाच मुलीनंतर कुटुंब नियोजनास प्रोत्साहन देतील. अशा बाबींमुळे त्या कुटुंबाचा समाजात आदर वाढेल आणि बाकीचे कुटुंबही आपल्या कुटुंबात एक मुलगी असावी यासाठी प्रोत्साहित होतील.

गावासाठी पारितोषिके :
ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारापेक्षा जास्त असेल अशा गावास महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत रुपये 5 लाखाचे पारितोषिक दिले जाईल. ज्यामुळे समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म व्हावा याबाबत प्रोत्साहन मिळेल. तसेच सदरची रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक राहिल.

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढावी, त्यांना सन्मान मिळावा, त्यांचे शिक्षण चांगले व्हावे, सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे हा यामागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.

mazi kanya bhagyashree yojana online form mulinsathi yojana in marathi mazi kanya sukanya yojana lek ladki yojana maharashtra bhagyalaxmi yojana marathi

© Healthmarathi.com
कॉपीराईट विशेष सूचना -
वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.