आमवात – Rheumatoid arthritis :

आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध्यांमध्ये सूज व अतिशय वेदना होत असतात. आमवात हा आर्थराइटिसचा एक प्रकार असून याला ‘रुमेटाइड आर्थराइटिस’ या नावानेही ओळखले जाते.

आमवात हा कोणत्याही वयातील व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार अधिक आढळतो. तसेच आमवाताचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आहे. आमवात हा गंभीर आणि आयुष्यभर त्रासदायक ठरणारा आजार असून याचे वेळीच निदान व त्यावर योग्य उपचार होणे आवश्यक असते.

आमवात होण्याची कारणे (Causes of Rheumatoid arthritis) :

आमवात नेमका कशामुळे होतो याविषयी कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत. आमवात हा इम्यून सिस्टीम संबंधित आजार असून रोग प्रतिकारशक्तीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने हा आजार होत असतो. खालील घटक आमवात आजारासाठी कारणीभूत असतात.

  • कुटुंबात आमवाताची अनुवंशिकता असणे,
  • जेनेटिक फॅक्टर,
  • हार्मोन्समधील बदल,
  • सांध्यांच्या ठिकाणी आघात किंवा दुखापत होणे,
  • अति लठ्ठपणा,
  • सिगारेट, धूम्रपानाचे व्यसन,
  • थायरॉईड समस्या असणे,
  • पीरियडॉन्टल रोगाशी संबंधित बॅक्टेरियामुळे,
  • एपस्टिन-बार ह्या व्हायरसचे इन्फेक्शन होणे, अशी कारणे आमवात होण्यासाठी जबाबदार असू शकतात.

आमवाताची लक्षणे (Rheumatoid arthritis Symptoms) :

रुमेटाइड आर्थराइटिसमुळे शरीराच्या कोणत्याही सांध्यावर परिणाम होऊ शकतो, तरीही प्रामुख्याने हात आणि पाय यांच्या सांध्यामध्ये अधिक परिणाम दिसतो. आमवाताच्या त्रासात खालील लक्षणे असतात.

  • सांध्यांमध्ये सूज येणे,
  • सूज आलेल्या ठिकाणचे सांधे लालसर होणे,
  • सांध्यांच्या ठिकाणी अतिशय वेदना होणे,
  • सांध्यांच्या ठिकाणी सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे.
  • सांधे जखडणे,
  • सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटणे,
  • सांध्यांची हालचाल करणे अवघड होणे अशी प्रमुख लक्षणे आमवातमध्ये असतात.

आमवताचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये दोन्ही बाजूच्या समान सांध्यांमध्ये वेदना होत असतात. म्हणजे जर उजव्या हाताच्या सांध्यात वेदना होत असल्यास डाव्या हाताच्या सांध्यातही वेदना असतात. तर संधीवातात केवळ एका बाजूकडील संध्यातही वेदना असू शकतात. त्यामुळे अशाप्रकारे डॉक्टर लक्षणांवरून संधीवात आहे की आमवात ते ठरवू शकतात.

आमवताचे निदान (diagnosis) :

रुग्णाला होणारे त्रास, असलेली लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून डॉक्टर आमवताचे निदान करतील. याशिवाय निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी काही लॅब टेस्ट कराव्या लागतील.

ब्लड टेस्ट करून रक्तातील रुमेटाइड फॅक्टरची लेव्हल तपासण्यात येते. या टेस्टला RF टेस्ट असेही म्हणतात. चाचणीत जर रुमेटाइड फॅक्टरचे प्रमाण अधिक आढळल्यास आमवाताचे निदान होते. याशिवाय anti-CCP, C-reactive प्रोटीन टेस्ट, ESR टेस्ट आणि अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी टेस्ट या रक्ताच्या चाचण्याही कराव्या लागू शकतात.

आमवाताचा त्रास आटोक्यात आहे की नाही हे तपासण्यासाठी C-reactive प्रोटीन टेस्ट केली जाते. त्रास वाढत असल्यास सी-रिअॅक्टिव प्रोटिन्सची लेव्हलसुद्धा वाढलेली आढळते. तसेच काहीवेळा आमवात निदानासाठी MRI स्कॅन, CT स्कॅन, X-ray या तपासण्यासुद्धा केल्या जातील.

आमवताचे प्रकार (Types of Rheumatoid arthritis) :

सेरोपोजिटिव्ह RA –

यामध्ये RF टेस्ट पॉझिटिव्ह येते. ह्या प्रकारचे रुग्ण अधिक असतात. सेरोपोजिटिव्ह RA हा सर्वात त्रासदायक असा आमवाताचा प्रकार आहे. यामध्ये सकाळी उठल्यावर सांधे जखडल्यासारखे वाटणे, विविध सांध्यांत सूज व वेदना होणे, ताप येणे, अशक्तपणा, रक्ताल्पता, वजन कमी होणे यासारखी लक्षणे यात असतात.

सेरोनिगेटिव्ह RA –

यामध्ये RF टेस्ट आणि anti-CCP निगेटिव्ह येते. मात्र तरीही यामध्ये आमवाताची लक्षणे असतात. तसेच कालांतराने सेरोनिगेटिव्ह RA चे रूपांतर सेरोपोजिटिव्ह RA मध्ये होऊ शकते.

Juvenile idiopathic आर्थराइटिस (JIA) –

हा प्रकार 17 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये आढळतो. यामध्येही आमवाताप्रमाणे लक्षणे दिसून येतात. तसेच यामध्ये डोळ्यांनाही सूज आलेली आढळते.

आमवातामुळे होणारे दुष्परिणाम :

आमवातावर उपचार न करता, बरेच दिवस दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होत असतात. त्याविषयी माहिती खाली दिली आहे.

  • आमवातामुळे सांध्यांच्या आतील भागातील सूज असल्यामुळे सांध्यांची गादी (कार्टीलेज) आणि हाडे या दोन्हीचे नुकसान होऊ शकते. परिणामी, हाडांचा व सांध्यांचा आकार वेडावाकडा होऊ शकतो.
  • ‎आमवातामुळे सांध्याच्या हालचाली कमी किंवा बंद होऊ शकतात.
  • हातपाय सुन्न पडणे किंवा तेथे मुंग्या येतात.
  • ‎फुफ्फुस, हृदय, रक्तवाहिन्या, डोळे अशा महत्वाच्या अवयवांना सूज येऊ शकते.
  • हृदयविकार होऊ शकतात.

आमवातावर हे आहेत उपचार (Treatment) :

आमवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. कारण हा त्रास दिवसेंदिवस वाढतच असतो. त्यामुळे सांधे वेडीवाकडी होतात, सांध्यांची हालचाल करणे कठीण होते, रुग्णाचे अगदी चालणे फिरणेही अवघड होते. आमवातावर आयुर्वेदिक औषध उपचार खूप उपयुक्त ठरतात.

आमवात आणि आहार पथ्य :

आमवाताच्या रुग्णांनी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी खाली आमवातातील आहार पथ्य व अपथ्य याविषयी माहिती दिली आहे.

आमवातातील पथ्य –
आमवात रुग्णाच्या आहारात ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर्स, सेलेनियम, व्हिटॅमिन A, C आणि E यासारखी पोषकतत्वे असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुखमेवा, अक्रोड, बदाम, लसूण, सुंठ, आले, एरंडेल, कोमट पाणी यांचा समावेश करावा. जवस, अक्रोड, मासे यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक असते. थोड्या प्रमाणात मांसाहार करू शकता.

आमवातातील अपथ्य –
आमवात असल्यास चरबी वाढवणारे पदार्थ खाऊ नये. त्यामुळे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, फ्रिजमधील थंडगार पदार्थ खाणे टाळावे. कोल्ड्रिंक्स, फ्रिजमधील पाणी पिणे टाळावे. स्मोकिंग, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.

आमवात व घरगुती उपाय :

  • सूज आलेल्या ठिकाणी गरम किंवा थंड शेक द्यावा.
  • आमवात असल्यास दररोज आल्याचा 2 ते 3 तुकडे चावून खावेत.
  • सुंठ मिसळलेले पाणी प्यावे.
  • रोज झोपण्यापूर्वी गरम दुधात चमचाभर हळद घालून ते दूध प्यावे.
  • सैंधव मीठ अंघोळीच्या गरम पाण्यात घालून त्याने अंघोळ करावी.
  • आमवात असल्यास एरंडेल तेलाबरोबर गरम भाकरी किंवा चपाती खावी.

Read Marathi language article about Rheumatoid arthritis causes, symptoms & treatments. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024 .

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.