रक्ती मुळव्याध वर घरगुती उपाय जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

रक्ती मुळव्याध (Bleeding piles) :

बैठी जीवनशैली आणि पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे अशी अनेक कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरतात. मूळव्याधमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते. त्याठिकाणी भयंकर वेदना होणे, आग होणे, खाज येणे अशी लक्षणे असतात. रक्ती मुळव्याध वर घरगुती उपाय याविषयी माहिती खाली दिली आहे.

याबरोबरच अनेकांना मूळव्याधीत रक्त पडण्याचा त्रासही असतो. अशाप्रकारे मूळव्याधमध्ये रक्त अधिक दिवस जात असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावर होतो. यामुळे ऍनिमियाची स्थितीही निर्माण होऊ शकते. यासाठी येथे मूळव्याधमध्ये रक्त पडणे किंवा रक्ती मुळव्याध यावर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार यांची माहिती दिली आहे.

आयुर्वेदानुसार मूळव्याधीचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे शुष्क अर्श आणि दुसरा म्हणजे रक्तार्श. शुष्क अर्श यामध्ये मूळव्याधमध्ये कोंब येतात, त्याठिकाणी वेदना, आग होणे आणि खाज ही लक्षणे असतात. पण या प्रकारात रक्त पडत नाही. तर रक्तार्श किंवा रक्ती मुळव्याध या प्रकारात वेदना, आग होणे यासारख्या लक्षणाबरोबर मूळव्याधमुळे रक्तसुद्धा पडत असते.

मूळव्याधमध्ये रक्त पडण्याची कारणे :

मूळव्याधीत गुदाच्या शिरांना सूज आलेली असते. तसेच त्याठिकाणी खाज व जळजळ होत असते. अशावेळी शौचाच्याठिकाणी खाजवल्यास त्या शिरांमधून रक्त येत असते. तसेच मूळव्याधीत बद्धकोष्ठता किंवा मलाचा खडा धरत असल्यास शौचाच्यावेळी मल पुढे सरकताना त्याठिकाणी सूज आलेल्या शिरांवर जास्त दाब पडतो त्यामुळेही मूळव्याधमध्ये रक्त पडत असते.

रक्ती मुळव्याधवर कोणती काळजी घ्यावी..?

मूळव्याधमध्ये रक्त पडण्याचा त्रास असल्यास काही काळजी घेणे आवश्यक आहे. मूळव्याधमध्ये शौचाच्या ठिकाणी खाज किंवा जळजळ होत असल्यास बोटांनी खाजवणे टाळावे. नखे वेळच्यावेळी कमी करावीत. जेणेकरून नखे लागून त्याठिकाणी जखम होऊन रक्तस्राव होणार नाही.

तसेच पोट साफ न होण्याची समस्या असल्यास त्यावर उपाय करावेत. फायबर्सयुक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा आहारात समावेश असावा. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

मूळव्याध रक्त पडणे उपाय व रक्ती मूळव्याधवरील उपचार :

लोणी व खडीसाखर –
रक्ती मूळव्याध असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी. रक्ती मुळव्याध वर हा उपाय खूप उपयोगी ठरतो.

कांदा –
रक्ती मुळव्याध असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.

साजूक तूप –
मूळव्याधमध्ये बद्धकोष्ठताचा त्रास होत असल्यास व त्यामुळे शौचाच्यावेळी रक्त जात असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.

त्रिफळा चूर्ण –
नियमित पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

एरंडेल तेल –
पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे. एरंडेल तेल गुदभागी लावल्याने त्याठिकाणी आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

मनुके –
रोज रात्री झोपण्यापूर्वी कपभर पाण्यात थोडे मनुके भिजत घालावे. सकाळी उटल्यावर ते पाणी प्यावे व मनुके खावेत. यामुळेही सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच यामुळे हिमोग्लोबिन वाढून रक्ती मूळव्याधमुळे होणारा ऍनिमियाही दूर होण्यास मदत होईल.

तज्ञ डॉक्टरांकडून रक्ती मुळव्याध वर औषध आणि उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.