PCPNDT Act – गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, 1994

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

What is PCPNDT Act, 1994 in Marathi..?

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची माहिती जाणून घ्या..
मुलगाच जन्माला यावा, मुलगी नको ह्या मानसिकतेतून सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाचे लिंग माहीत करून घेण्याचे आणि त्यातूनच स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे बेकायदेशीर कृत्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारांमुळे मुलगा आणि मुलगी यातील गुणोत्तराचे प्रमाण बिघडत आहे तसेच मुलगा आणि मुलगी हे भेदभाव वाढीस लागत आहे. याचे गांभीर्य विचारात घेऊन भारतात Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994 अर्थात PCPNDT Act लागू करण्यात आला आहे.

या कायद्यानुसार गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्याने गुन्हा आहे. हा कायदा ‘गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा किंवा PCPNDT Act या नावाने ओळखला जातो. गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा भारतात 1994 ला संमत झाला. त्यानंतर 2003 मध्ये पुन्हा त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या.

PCPNDT Act मधील तरतुदी :

1) गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी करण्याकरिता तिची लेखी संमती घेणे बंधनकारक आहे.
2) पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी या तपासणीवर कायद्याने पूर्णपणे बंदी आहे. पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगणे हा सुद्धा गुन्हा आहे.
3) गर्भ माहीत करून घेऊन गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा आहे.
4) गर्भचिकित्सा करून मिळेल, गर्भपात करून मिळेल, अशा आशयाची जाहिरात, भित्तीपत्रके यांवर बंदी घालण्यात आली आहे.
5) अशी बेकायदेशीर गर्भपात केंद्रे असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते.

सोनोग्राफीसाठी कायद्याप्रमाणे आवश्यक बाबी कोणत्या आहेत..?

1) सोनोग्राफी केली जाते ते ठिकाण, सोनोग्राफी मशीन, सोनोग्राफी करणारे डॉक्टर यांची कायदेशीर नोंदणी आवश्यक असावी लागते.
2) सोनोग्राफी मशीन, डॉक्टरांचे नोंदणी प्रमाणपत्र, सोनोग्राफीसाठी परवाना, ही सर्व प्रमाणपत्रे सोनोग्राफी सेंटरमध्ये दर्शनी भागामध्ये लावावीत.
3) वेटिंगरूम, ओपीडी, सोनोग्राफी करतो त्या खोलीमध्ये, गर्भचिकित्सा केली जात नाही, याचा मराठी व इंग्रजी भाषेतील फलक लावावा.
4) सोनोग्राफी मशीन वापराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे संबंधित डॉक्टरांकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
5) डॉक्टरांना या कायद्याविषयी माहिती असणे गरजेचे, तसेच डॉक्टरांकडे या कायद्याचे पुस्तकही असणे आवश्यक आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

PCPNDT Act and Punishment :

या गुन्ह्यात शिक्षा काय होते..?
या कायद्याविरुद्ध कुणी डॉक्टर अथवा सामान्य व्यक्ती गर्भचिकित्सा करत असतील वा करण्यास भाग पाडत असतील अशा व्यक्तीला कायद्याप्रमाणे 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 10,000 रुपये दंड होतो. ही शिक्षा 10 वर्षे ते 50,000 रुपये दंड इतकीही वाढू शकते. हा गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र आहे.

बेकायदेशीरपणे कोणी लिंगनिदान करीत असल्यास त्याची तक्रार कोठे करावी..?

गर्भ लिंगनिदान करणे हा गुन्हा असूनही जर कोणी डॉक्टर किंवा हॉस्पिटल ते करीत असल्यास त्याबद्दलची तक्रार आपण 18002334475 या टोल फ्री नंबरवर फोन करून देऊ शकता. तक्रार करणाऱ्याचे नाव, पत्ता गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून जर आपणास अशा बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्या सेंटरची माहिती असल्यास ती वर दिलेल्या फोन नंबरवर द्यावी. किंवा आपल्या भागातल्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

Get information about PCPNDT 1994 Act in Marathi.