Dr Satish Upalkar’s article about White hair home remedies in Marathi.

केस पांढरे होणे :

आजकाल अगदी तरुण मुला-मुलींचे केस कमी वयातही पांढरे होत आहेत. मेलानिन हे रंगद्रव्य केसाचा रंग काळा ठेवण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. तसेच पोषकतत्वांचा अभाव, अयोग्य आहार, धूळ-प्रदूषण, तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे अकाली केस पांढरे होऊ लागतात. यासाठी पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे याची माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे आपले केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.

केस पांढरे होण्याची कारणे :

मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागते त्यामुळे केस पांढरे होतात. मेलेनिन हा असा घटक आहे की जो त्वचेचा आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यास मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो.

वयानुसार केस पांढरे होणे ही सामान्य बाब असते मात्र जर अगदी तिशी-पस्तीशीतच केस पांढरे होण्याच्या समस्या असल्यास त्याला अकाली केस पांढरे होणे असे म्हणतात.

अकाली केस पांढरे होण्यास अनेक घटक जबाबदार असतात यामध्ये जेनेटिक फॅक्टर, आनुवांशिक कारणे, हार्मोन्सचे असंतुलन, पोषकत्वाची कमतरता, अयोग्य आहार, धूळ व प्रदूषण, ताणतणाव, थायरॉईड प्रॉब्लेम आणि विविध केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा चुकीचा वापर यासारख्या अनेक कारणामुळे केस पांढरे होत असतात.

पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी घरगुती उपाय :

घरगुती उपायांनी अकाली केस पांढरे होण्याची समस्या आपण दूर करु शकतो. यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.

आवळा..
आवळा हा केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. पांढऱ्या केसांपासून सुटका करण्यासाठी आवळा उपयुक्त असतो. केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून रहावा यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात उकळवा. आवळ्याचा रंग काळा झाल्यानंतर या तेलाने केसांना मालिश करा. हे गुणकारी तेल दररोज आपल्या केसांना लावावे. त्यामुळे केस गळणे, केस पांढरे होणे ह्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कोरफड..
केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. केसांना कोरफडीचा गर लावल्यास केस गळणे आणि पांढरे होणे या समस्या दूर होतात. कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत.

किंवा केस धुण्यापूर्वी कोरफड जेल लावा आणि मसाज करा. त्यानंतर केस धुवा यामुळे आपले केस काळे आणि दाट होतील.

कडीपत्ता..
कडीपत्ता खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्यावे व हे तयार केलेले तेल रोज आपल्या केसांना लावून मसाज करावा. यामुळे आपले केस काळे आणि दाट राहतील. तसेच हे तेल रोज दाढी आणि मिशीच्या केसांवरही लावल्यास केस काळे राहण्यास मदत होते.

केस पांढरे होण्यावर हा उपयुक्त उपाय असून नियमित कडीपत्ता घातलेले ते केसांना वापेल्यास लवकरच चांगले परिणाम दिसू लागतात. याशिवाय ग्लासभर पाण्यात कढीपत्ता टाकून ते पाणी उकळून घ्यावे. हे पाणी रोज पिल्यानेही केस लवकर पांढरे होत नाहीत.

भृंगराज..
भृंगराज किंवा माका ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती केसांच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते. भृंगराजपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होणे, केस गळणे किंवा केसात कोंडा होणे ह्यासारख्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

चहापावडर..
चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथ्याने पांढरे झालेले केस धुतल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते.

कांदा..
पांढरे केस रोखण्यासाठी कांद्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. यासाठी कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबू रस घालावा. ही घट्ट पेस्ट केसांच्या मूळांना आणि पांढऱ्या केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर याचा चांगला उपयोग होतो.

लिंबू रस..
रोजच्या वापराच्या खोबरेल तेलात लिंबाचा रस घाला. हे तेल दररोज डोक्याला लावून हलक्या हाताने मालिश करावी. त्यामुळे पांढरे केस काळे आणि चमकदार होण्यास मदत होते.

दही व ताक..
अकाली केस पांढरे होण्याची समस्या असल्यास, एका वाटीत ताक घेऊन त्यामध्ये कडिपत्त्याच्या पानांचा रस घालावा. हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी यामध्ये थोडे दही घालावे. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावून चांगल्या पद्धतीने मसाज केल्यास केसांचा रंग बदलण्यास मदत होते. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेऊन नंतर केस धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फायदेशीर ठरतो.

अकाली केस पांढरे होऊ नयेत म्हणून कोणता आहार घ्यावा..?

केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात खालील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

  • शरीरामध्ये प्रोटीन, लोह, विटामिन बी12 अशा पोषक तत्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांचा समावेश करा. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे यासारखी अनेक पोषकतत्वे असतात.
  • केसांच्या आरोग्यासाठी प्रोट्रीनयुक्त आहार खावा. आहारात दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्ये, बदाम, अक्रोड, मासे यांचा समावेश करावा.
  • आहारात कढीपत्याचा समावेश असावा कारण कढीपत्ता हा केस अवेळी पांढरे होण्यापासून रक्षण करत असतो. याशिवाय कढीपत्ता केसांची मुळे मजबूत करतो, केस दाट करतो त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्ता आहारात वापरणेही चांगले असते.
  • आवळ्यात मोठ्या प्रमाणात केसांसाठीचे आवश्यक पोषकघटक असतात. त्यामुळे दररोज सकाळी आवळा खाणेही केसांच्या आरोग्यासाठी चांगला असते.
  • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊन केसांची मुळे घट्ट होतील.
  • आहारात मीठाचा जास्त वापर करू नये.
  • फास्टफूड, जंकफूड, तळलेले पदार्थ, स्नॅक्स वगैरे खाणे टाळावे.
  • चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिण्याचे टाळावे.
  • धुम्रपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

केस पांढरे होऊ नयेत यासाठी केसांची काळजी कशी घ्यावी..?

    केसांना नेहमी स्वच्छ धुवावेत. यामुळे केसांना चिकटलेली धूळ, मळ निघून जाते. तसेच केस नेहमी कंगव्याने विंचरले पाहीजेत.

  • ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
  • जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
  • कोमट केलेले तेल केसांना लावावे. मात्र जास्त गरम तेल केसांना लावू नका.
  • नियमित व्यायाम करावा. त्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होईल.
  • शिर्षासनासारखी योगासने करा. शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
  • सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. असे केल्याने शरीरास आणि केसांनाही व्हिटॅमिन-D मुबलक मिळेल.
  • मानसिक ताणतणाव, डिप्रेशन यापासून दूर राहावे.

आणि शेवटचे महत्त्वाचे म्हणजे, खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. बाजारातील नवनवीन प्रोड्क्टसचा आपल्या केसांवर प्रयोग करणे टाळा.

केस गळत असल्यास करायचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about White hair reason & solutions in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube