नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी मराठीत माहिती (Baby care in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Baby care in Marathi, 0 to 12 Months baby care tips in Marathi

बालसंगोपन माहिती (बाळाचे संगोपन) :

बाळाचं वजन किती असते..?
जन्मत: बाळाचं वजन हे अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होतं आणि 1 वर्षाने तिप्पट होतं. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.

अपूर्ण वाढीचे मूल म्हणजे काय..?
बाळंतपण 37 आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन 2 किलो पेक्षाही कमी तर उंची 18 इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणं गरजेच असते.

बाळाचे वजन कमी असल्यास कोणती काळजी घ्यावी..?
आईने बाळाला स्तनपान नीट व काळजीनं करावे. स्तनपान दर दोन तासांनी (थोडया-थोडया अंतरानं) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. तसंच त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे.

बाळाची नाळ किती दिवसांनी पडते..?
साधारणपणे 6-7 दिवसांनी बाळाची नाळ पडते. पहिले 3-4 दिवस त्यातून थोडा स्त्राव येतो. त्यामुळे तिथे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

ब-याच नवजात बालकाना कावीळ का होते..?
सुमारे निम्म्या नवजात बालकाना जन्मल्यावर तिसऱ्या दिवशी कावीळ होते व 5-6 दिवसांनी ती कमी होते किंवा आपोआप नाहीशी होते. आईच्या रक्तपेशी बाळाच्या रक्तात बाळाच्या रक्तात असतात. त्यांचा नाश झाल्यामुळे कावीळ होते. त्याबद्दल फारशी काळजी करू नये. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते. पण जन्मल्यानंतर लगेच कावीळ दिसल्यास किंवा 7-8 दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकल्यास मात्र डॉक्टरांना दाखवणं आवश्यक असते.

जन्मल्यानंतर बाळ शी-शू कधी करते..?
पहिल्या 12 तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी 3-4 दिवस होते. बहुतेक मुले एक-दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे. कपडे ओले होतात की नाही ते पहावे. लघवीची धार व्यवस्थित असेल तर मुत्रमार्गाला काही अडचण नाही असं समजावं. शू केला नाही तर डॉक्टरांना दाखवावं.

बाळाच्या टाळूची काळजी कशी घ्यावी..?
टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. टाळू तेलाने थापला नाही तरीही टाळू दीड वर्षांत आपसूकच भरून येतो. मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात.
टाळू जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर मात्र डॉक्टरांना त्वरित दाखवावे.

बाळाला आंघोळ कशी घालावी..?
बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कानात, गुदद्वारात तेल सोडणे चुकीचे आहे. किंचित कोमट खोबरेल तेलाची हळुवार मालीश हाता-पायांना करावी. आंघोळीआधी तेल लावले तर ते सौम्य साबणाने धुऊन टाकले पाहिजे. आंघोळीसाठी डाळीचे पीठ, साय वगैरे वापरू नये. काही जण पिठाने रगडून बाळाच्या अंगावरची नाजूक लव काढण्याच्या प्रयत्नात बाळाच्या त्वचेला (Skin) इजा करतात.
आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. आंघोळ झाल्यावर मऊ स्वच्छ फडक्याने बाळाचे अंग टिपावे. जोरात पुसू नये.
आंघोळीनंतर बाळाला काजळ घालण्याचे काहीच कारण नाही. काजळाने डोळे मोठे होतात, डोळे स्वच्छ राहतात, दृष्ट लागत नाही हे सारे चुकीचे आहे. उलट काजळ घातल्याने काजळाने किंवा अस्वच्छ बोटांमुळे जंतूसंसर्ग निर्माण होऊ शकतो.

बाळाचे कपडे कसे असावेत..?
बाळाचे कपडे स्वच्छ धुऊन वाळवलेले, सैल व सुती असावेत. थंडीच्या दिवसात गरम कपडे असावेत पण ते आतून मऊ असावेत. टेरिकॉट, नायलॉनचे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ओले केलेले कपडे त्वरित बदलावेत.

बाळ झोपत नाही, सारखे का रडत असते..?
काही वेळेस बाळं संध्याकाळी किंवा रात्री रडतात. काही मिनिटं किंवा तास हे रडणं चालू शकतं. त्याची निश्चित कारणं देता येत नाहीत. बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत. बाळाला कुशीत घेऊन जोजवणं, थोपटणं, हाच उपाय. बाळ तीन महिन्याचं झालं की ही समस्या कमी होते.

बाळ बोटं चोखते म्हणजे भूक लागली असेल का..?
सर्वच बाळ हाता-पायाची बोटं तोंडात घालून चोखतात. पण याचा अर्थ बाळाला भूक लागली आहे असंच नव्हे.

बाळ आजारी पडल्याचं पहिलं लक्षण कोणतं..?
बाळ आजारी पडल्याचं पहिलं लक्षण आहे बाळ अंगावर प्यायला मागत नाही.
काही बाळं झोपल्यावर श्वास घेताना आवाज येतो. बाळाची छाती भरली म्हणून आई लगेच घाबरते. तसेचं तान्ह्य़ा बाळांना उचकी येणं स्वाभाविक आहे. ती तोंड उघडं ठेवतात. त्यामुळं घसा सुकतो व उचकी लागते. अंगावर प्यायल्यावर उचकी थांबते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

बाळाचे पाय वाकडे वाटतात..?
सर्वच बाळांचे पाय किंचित वाकलेले असतात. बाळ चालू लागले म्हणजे पाय आपोआप सरळ होतात. अशावेळी नवजात बाळांचे पाय दाबून सरळ करण्याची गरज नाही.
तसेचं नुकतंच बसायला शिकलेली बाळं, स्वत:ला बॅलन्स करण्यासाठी किंचित पुढे झुकतात. याचा अर्थ तो कुबड काढून बसतो असा नव्हे.

वॉकर किंवा पांगुळगाडा केंव्हापासून वापरावा..?
दहा-अकरा महिन्याचं बाळ होईपर्यंत वॉकरमध्ये घालू नये. त्यानंतर घातलं तर बाळ आपोआप मजेने चालायला शिकतं. पांगुळगाडय़ाने बाळ पडण्याची शक्यता असते.

बाळाच्या आरोग्यासाठी खालील उपयुक्त माहितीही वाचा..
0 ते 6 महिन्याच्या बाळाचा आहार
6 ते 2 वर्ष वयाच्या बाळाचा आहार
बाळाची वाढ व विकास कसा होतो
बाळासाठी आवश्यक लसीकरण तक्ता