प्रसूतीची लक्षणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते..?

8392
views

गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर (साधारणपणे 280 दिवस झाल्यानंतर) प्रसूतीची प्रक्रिया आपोआप सुरू होते. तसेचं प्रसूतीची प्रक्रिया सुरु झाल्याचे खालील लक्षणांवरून ओळखता येते.

पोटात सारख्या कळा येणे (प्रसुती कळा) –

प्रसुतिच्यावेळी गर्भाशयाचे स्नायू ठरावीक वेळाने आकुंचन पावल्यामुळे वेदना थोड्या थोड्या वेळाने येतात. ह्या कळा बरगड्यांच्या खाली, पाठीवरून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. त्या कळा ठरावीक वेळाने येतात व ओटीपोटात संपतात. सुरुवातीला दर 30-40 मिनिटांनी व साधारण 5-10 सेकंद जाणवणाऱया कळा यायला लागतात तर डिलिव्हरीच्या शेवटी त्या दर 2-3 मिनिटांनी व 30-40 सेकंदांपर्यंत जाणवणाऱ्या कळा यायला लागतात.
गर्भाशयाचे तोंड उघडायला सुरुवात होते –
बाळंतपण चालू असेल तर गर्भाशयाचे तोंड उघडायला सुरुवात होते.
लालसर रंगाचा चिकट स्राव – जेव्हा प्रसूतीची क्रिया सुरू होते, तेव्हा गर्भाशयाच्या तोंडाजवळील चिकट पांढरा भाग सुटून बाहेर येतो व थोडासा रक्तस्रावही व्हायला लागतो.

ही बाळंतपण सुरु झाल्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. जेव्हा वरील लक्षणे दिसून येतात तेव्हाच असे म्हणता येते की प्रसूतीची क्रिया सुरू झालेली आहे. वर सांगितल्याप्रमाणे प्रसूतीची लक्षणे दिसायला लागल्यावर गर्भिणीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे.

 

नैसर्गिक प्रसूती कशी होते..?
नैसर्गिक प्रसूतीचे मुख्यत: तीन टप्पे करता येतील –
पहिला टप्पा :
यामध्ये गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडते. गर्भाशयाचे तोंड साधारण 3-4 सेंटीमीटरपर्यंत उघडल्यानंतर येणाऱया कळा खूप जोराने व लवकर यायला सुरुवात होते. बाळ आईचं गर्भाशय सोडायला लागले की, आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. या नैसर्गिक प्रक्रियेतूनच कळा निर्माण होतात. या कळा पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून येतात. कळा येत गेल्या की, गर्भाशयाचा वरचा भाग कठीण होत जातो व गर्भाशयाचे तोंड उघडले जाते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसरा टप्पा :
गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडल्यापासून बाळ पूर्णपणे बाहेर येणे याला दुसरा टप्पा असे म्हणतात. या टप्प्यामध्ये बाळ गर्भाशयातून बाहेर येण्यासाठी आई प्रयत्न करत असते.

तिसरा टप्पा :

बाळ पूर्णपणे बाहेर आल्यानंतर थोड्याच वेळात वार (Placenta) आणि नाळ ही गर्भाशयापासून अलग होते व पूर्णपणे बाहेर पडते. गर्भाशयाचे स्रायू संपूर्णपणे आकुंचन पावतात आणि रक्तस्राव मर्यादित प्रमाणात होतो.

प्रसूतीनंतरचे सुरवातीचे 2-3 तास मातेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात जर गर्भाशयाचे आकुंचन कमी झाले तर खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. तसेच इतरही काही गंभीर धोके उद्भवू शकतात. म्हणूनच या काळात सतत वैद्यकीय देखरेख आवश्यक असते.

ह्या तीन टप्यानुसार नैसर्गिक प्रसूती होते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.