मूळव्याध वरील घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बैठी जीवनशैली आणि पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, सततचा प्रवास ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत असतात. आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे.

मूळव्याधच्या त्रासात गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. त्याठिकाणी भयंकर वेदना होणे, आग होणे, खाज येणे, शौचाच्या वेळेस रक्त पडणे अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे या प्राणास हैराण करून सोडणाऱ्या त्रासावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. यासाठी याठिकाणी मूळव्याध वरील घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार याविषयी माहिती खाली सांगितली आहे.

मूळव्याध वरील घरगुती औषध उपचार :

जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.

कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणे हा मूळव्याधवरील एक उपयुक्त घरगुती उपचार आहे. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. तसेच किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याध वर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

लिंबू आणि सैंधव मीठ –
सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणेही मूळव्याधवरील चांगला उपाय आहे. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा मूळव्याधवरील घरगुती उपाय केल्यास त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.

सुरण कंदमुळ –
आयुर्वेदानुसार सुरण हे कंदमुळ मूळव्याधवरील एक उत्तम असे औषधचं मानले आहे. सुरण वाफवून ते आहारात घ्यावे. सुरण बरोबरच ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याध वरील हा उपायही लाभदायक ठरतो.

लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.

साजूक तूप –
मूळव्याध असल्यास व पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल.

ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही मूळव्याधचा त्रास लवकर कमी होतो.

मूळव्याध वरील आयुर्वेदिक औषध :

एरंडाची दोन पाने थोडे मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवून ती पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. मूळव्याधवरील हे गुणकारी व खात्रीशीर आयुर्वेदिक औषध आहे.

तज्ञ डॉक्टरांकडून मूळव्याध वरील आयुर्वेदिक औषध उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.