गर्भपात होणे म्हणजे काय व गर्भपाताची कारणे, लक्षणे आणि प्रकार जाणून घ्या..

गर्भपात होणे -Miscarriage or abortion :

गरोदरपणात अचानक गर्भपात (गर्भस्त्राव) झाल्यास त्या स्त्रीसाठी तो भयानक धक्का पचवणे खूपचं कठीण असते. गर्भपाताचा आघात तिच्या शरीर आणि मनावर होत असतो. प्रत्येक आईची इच्छा असते की तिचे बाळ निरोगी आणि कोणत्याही समस्येशिवाय या जगामध्ये यावे, परंतु काहीवेळा गर्भपात झाल्याने तिच्या आनंदावर विरजण पडत असते.

गर्भपात म्हणजे काय..?

जेव्हा गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यापूर्वी गर्भाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला गर्भपात किंवा गर्भस्त्राव होणे असे म्हणतात. गर्भपात हा पूर्ण किंवा अपूर्णही होऊ शकतो. पूर्ण गर्भपातमध्ये मृत गर्भ हा योनीतून पूर्णपणे बाहेर पडत असतो. तर अपूर्ण गर्भपातात मृत गर्भाचा काही भाग बाहेर येऊ शकतो तर काही गर्भाशयात राहू शकतो.

गर्भपात प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो.
1) नैसर्गिक गर्भपात (गर्भस्त्राव)
2) कृत्रिम गर्भपात (वैद्यकीय कारणांसाठी केलेला गर्भपात)

1) नैसर्गिक गर्भपात :

यामध्ये गरोदर स्त्रीमध्ये काही जटील आरोग्य समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम पोटातील गर्भावर होऊन गर्भाचा 20 व्या आठवड्यापूर्वी नैसर्गिकरित्या मृत्यू होतो. याला नैसर्गिक गर्भपात असे म्हणतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

नैसर्गिकरित्या आपोआप होणाऱ्या गर्भपाताची लक्षणे :

गर्भपाताची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ओटीपोटात वेदना आणि योनीतून रक्तस्त्राव होणे ही असतात. त्यामुळे गरोदरपणात अशी काही लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

योनीतून रक्तस्त्राव होणे –
योनीतून रक्तस्त्राव होणे हे गर्भपाताचे महत्वाचे लक्षण असू शकते. यावेळी योनीमार्गातून स्पॉटिंग, रक्ताच्या गुठळ्या किंवा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. तसेच हा रक्तस्त्राव तपकिरी किंवा गडद लाल रंगाचा असू शकतो.

ओटीपोटात दुखणे – 
गरोदरपणात ओटीपोटात तीव्र वेदना होणे हे देखील गर्भपाताचे लक्षण असू शकते.

कंबर व पाठदुखी –
गरोदरपणात पाठदुखीचा त्रास सामान्य आहे, परंतु जर पाठीत असह्य वेदना होऊ लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण हे सुद्धा गर्भपात होण्याचे लक्षण असू शकते.

तसेच अनेकवेळा कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. मात्र जेंव्हा गर्भवती स्त्री ही नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे जाते तेव्हा तपासणीत गर्भपात झाल्याचे लक्षात येऊ शकते.

नैसर्गिकपणे आपोआप गर्भपात होण्याची कारणे :

गर्भपात होण्याची अनेक कारणे असू शकतात.
• हार्मोनल असंतुलनामुळे,
• गुणसूत्रमधील विकृतीमुळे, Molar प्रेग्नन्सीमुळे,
• थायरॉईड किंवा मधुमेह सारख्या समस्येमुळे,
• आईला पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असल्यामुळे,
• गर्भाशयामध्ये कोणतीही समस्या झाल्यास जसे गर्भाशयाचे तोंड कमजोर असल्यामुळे,
• योनीमार्गातून इन्फेक्शन झाल्याने,
• मातेचे वय अधिक असल्यामुळे,
• धूम्रपान, अल्कोहोल अशा व्यसनांमुळे,
• गरोदरपणात जास्त प्रवास करण्यामुळे,
• गरोदरपणात पोटावर आघात किंवा दुखापत झाल्यामुळे,
• तसेच काही औषधांच्या साईड इफेक्टमुळेही गर्भपात होऊ शकतो.

2) कृत्रिम गर्भपात –

जर गर्भात काही व्यंग किंवा गंभीर आरोग्य समस्या असल्याचे निदान झाल्यास किंवा गर्भ पुढे वाढण्यामुळे आईचे आरोग्य धोक्यात येणार असल्यास किंवा होत असलेली गर्भधारणा नको असल्यास किंवा इतर वैद्यकीय कारणांसाठी कृत्रिमरित्या गर्भ नष्ट केला जातो. याला कृत्रिम गर्भपात असे म्हणतात. अर्थात ही एक कायदेशीर बाब असते. एम.टी.पी. कायद्याच्या अंतर्गत गर्भधारणेच्या केवळ 24 आठवड्यापूर्वीच याला कायदेशीर परवानगी असते आणि डॉक्टर असा गर्भपात ‘केवळ वैद्यकीय कारणांसाठी’ घडवून आणतात.

गर्भपात आणि MTP ऍक्ट 1971 –
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्‍ट (MTP act) ह्या कायद्याच्या अंतर्गत कृत्रिम गर्भपाताची प्रक्रिया पार पाडली जाते. कृत्रिम गर्भपातामध्ये MTP act नुसार अधिकारप्राप्त डॉक्टर हे गर्भपात घडवून आणतात.

कोणकोणत्या स्थितीमध्ये कृत्रिम गर्भपात केला जातो..?
• जर एखाद्या स्त्रीस गर्भधारणा झाली आणि होणाऱ्या बाळास काही गंभीर व्यंग असल्यास ,
• पोटात वाढणाऱ्या बाळामुळे आईच्या जीवास धोका होत असल्यास,
• बलत्कारपीडित स्त्रीमध्ये गर्भधारणा झाल्यास,
• एखाद्या स्त्रीस गर्भधारणा झाल्यानंतर पोटात वाढणारे बाळ नको असल्यास कृत्रिम गर्भपात केला जतो.
मात्र यासाठी त्या गरोदर स्त्रीने 24 आठवड्याच्या आत MTP act नुसार गर्भपात करून घेण्यासाठी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पूर्वी अशाप्रकरच्या गर्भपातासाठी 20 आठवड्यांची मर्यादा होती. नुकतीच या कायद्यात सुधारणा केली असून आत्ता याची मर्यादा 24 आठवडे करण्यात आली आहे. गरोदर स्त्रीची परवानगी असल्याशिवाय असा गर्भपात करता येत नाही. तसेच 20 आठवड्यांच्या आत गर्भपातासाठी एका वैद्यकीय तज्ज्ञाची संमती आवश्‍यक असते, तर 24 आठवड्यांच्या गर्भपातासाठी दोन वैद्यकीय तज्ज्ञांची संमती घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे.

म्हणजे पोटात वाढणारा गर्भ नको असल्यास 24 आठवड्याच्या आत अशाप्रकारे गर्भपात करता येतो. मात्र जर 24 आठवड्यानंतर गर्भपात केला गेल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो. सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या औषधे किंवा शस्त्रक्रिया याद्वारे कृत्रिमरित्या गर्भपात घडवून आणतात.

Information about Miscarriage or abortion in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


© लेखक- डॉ. सतीश उपळकर
वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..