कुपोषण मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Malnutrition in maharashtra information.

कुपोषणाची समस्या :

भारतातील सुमारे 40% बालके कुपोषित आहेत.
महासत्ता होऊ पाहणाऱया आपल्या देशातील 40% बालके कुपोषणग्रस्त असताना भविष्यात देश बलवान कसा बनेल. कुपोषणाचा प्रश्न हा दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासीभागात मोठ्या प्रमाणावर आढळतो. कुपोषण आणि बालमृत्यु यासारख्या समस्यांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुपोषण निर्मुलनाच्या विविध योजना गरजू मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे.

कुपोषणाची कारणे :

अयोग्य-अपुरा आहार, दारिद्र्य, अनारोग्य, बालविवाह आणि सरकारी यंत्रणेची अनास्था ही महाराष्ट्रातील कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत. एकीकडे सकस अन्नाअभावी मुलांची “कोवळी पानगळ” सुरु आहे तर समाजात दुसरा घटक असा आहे की त्यांच्या मुलांसमोर लठ्ठपणाचा प्रश्न भेडसावत आहे. एकाच समाजाची ही कुपोषण आणि अतिपोषणाची दोन चित्रे देशाचे वास्तव दर्शवतात. शरीराला योग्य आणि संतुलित आहार उपलब्ध झाला नाही तर कुपोषण होते. गरोदरपणी स्त्रीने योग्य पोषक आहार न घेतल्यास तिच्या होणार्‍या बाळालादेखील पोषणतत्वे मिळत नाही. त्यामुळे कुपोषित बालकांचे आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

त्याचप्रमाणे अनारोग्य हेसुद्धा कुपोषणाचे प्रमुख कारण आहे. आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जात असला तरी तो किती पोकळ आहे हे सांगायला नको. उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स नाहीत. औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. बालरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ नाहीत. सोनोग्राफी, रक्तपेढींची सुविधा नाही. येथील बाळंतपणाचे प्रमाण अजूनही दहा ते वीस टक्क्यांवर गेलेले नाही. आदिवासी भागात 10 ते 19 वयोगटातील 72 टक्के मुली कुपोषित असल्याचे 2013 च्या एका सर्वेक्षणात लक्षात आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम झाली तरच “कोवळी पानगळ” थांबण्यास मदत होईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

कुपोषणाची आकडेवारी व प्रमाण :

महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्हे हे आदिवासीबहुल जिल्हे आहेेत. नंदुरबार, अमरावती, गडचिरोली, पालघर या चार जिल्ह्यांतच कुपोषण जास्त आहे. मेळघाटात कुपोषणाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या भागात गेल्या 25 वर्षात 14 हजारावर बालकांचा कुपोषणाने जीव गेला. दरदिवशी एक बालक मृत्यूच्या दाढेत जात असल्याचे विदारक चित्र आहे. याशिवाय माता मृत्यूचीही समस्या आहे.

कुपोषण समस्या उपाययोजना :

कुपोषणचा प्रश्न हा काही आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाने या आदिवासी भागात अक्षरश: थैमान घातले आहे. यावर नियंत्रणासाठी शासनाने काहीच केले नाही, असेही म्हणता येणार नाही. अनेक योजना राबविल्या, कोट्यवधींचा निधी दिला. पण तरीही कुपोषणातून मुक्तता मात्र होऊ शकली नाही. उलट त्यात वाढच होत असल्याचे दिसून येते. कुपोषण समस्या दुर व्हायची असल्यास सर्वानीच आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. सरकारी यंत्रणा तळागाळात पोहोचली पाहिजे, आरोग्य यंत्रणा सक्षम झाली पाहिजे आणि आदिवासी भागातील मुलांपर्यंत, गरोदर मातापर्यंत पोषक आहार पोहोचला तरच महाराष्ट्र कुपोषणमुक्त होण्यास मदत होईल.

Malnutrition in Children’s information in Marathi.