लॉकडाऊनमधील अनुभव :

2020 साल हे आपणा सर्वांसाठीच भयानक असे होते. कारण 2020 मध्ये जगभरात सर्वत्रचं कोरोना विषाणूने थैमान घातले होते. कोरोना संसर्गाची लागण होऊन जगभरात लाखो लोक मृत्यूमुखीसुद्धा पडले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध घातले. लॉकडाऊन मधील दीड महिन्याचा काळ हा सर्वांसाठीच अत्यंत कसोटीचा असा होता. अनेकांनी या काळात वेगवेगळे अनुभव अनुभवले. हे अनुभव मात्र जीवनाच्या पुढील काळातही निश्र्चितच उपयोगी पडतील.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने कोविड19 ही जागतिक महामारी म्हणून घोषित केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी आणीबाणी लागू केली. यावेळी वाहतूक, उद्योग, कंपन्या, व्यवसाय, शैक्षणिक संस्था, विविध कार्यक्रम असे सर्वच बंद करण्यात आले. यालाच ‘लॉकडाऊन’ असे म्हणतात.

कोविड19 म्हणजेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणे हाच
लॉकडाऊनचा मुख्य उद्देश होता. कारण कोरोना व्हायरसचा संसर्ग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध घालण्यात आले.

आपण अनुभवलेला लॉकडाऊन – Lockdown experience in Marathi :

भारत सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्च 2020 रोजी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लागू केला. तर 24 मार्चपासून सुरवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर पुन्हा 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यानंतर पुढे 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. कोरोनाचा बऱ्यापैकी फैलाव रोखण्यास या लॉकडाऊनमुळे मदत झाली.

जनता कर्फ्यू असो किंवा लॉकडाऊन, यांच्या तारखा जरी लक्षात आल्या तरी जसाच्या तसा या काळातील सर्व अनुभव आपल्या सर्वांच्या समोर उभा राहतो. पहिल्या दिवशी जनता कर्फ्यू जाहीर केल्यावर सर्वचजण आपापल्या घरी राहिले. रस्त्यावर, बाजारात सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. त्या दिवशी रस्त्यावरून वाहनांचा आवाज ऐकू येत नसल्याने पक्षांचा किलबिलाट कानावर पडत होता. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी त्या दिवशी संध्याकाळी आपापल्या घरच्या गच्चीवर, अंगणात जाऊन मिळेल ते साहित्य घेऊन पाच वाजता वाजवायला सुरुवात केली..!

त्यानंतर 24 तारखेला पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून 21 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकांच्या पाठीशी नोटबंदीचा व जनता कर्फ्यूचा अनुभव असल्याने लोकांनी रात्रीपासूनच किराणा दुकानासमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या..

त्यानंतर सकाळपासून लॉकडाऊन सुरू झाला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी समजावून सांगितले तसेच प्रसंगी ‘प्रसाद’ही दिला. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांकडून ‘प्रसाद’ वाटपाचे काम पुढील दीड महिन्यापर्यंत अविरत सुरू होते. अनेकांना ‘प्रसाद’ मिळाला. काहींच्या गाड्या जप्त केल्या. मॉर्निंग वॉकचे निमित्त करून बाहेर फिरणाऱ्या लोकांकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कवायतीही करून घेतल्या..

लॉकडाऊन मध्ये जनता घरीच अडकली होती. सोबतीला इंटरनेटही होता. सर्वच सोशल मीडियावर लोकांच्या जत्रा जमू लागल्या. त्यावेळी टिकटॉक व्हिडिओ ॲप खूपच जोमात होते. सर्वांनी या सर्व डिजिटल साधनांचा वापर या काळात मनोरंजनासाठी केला.

लोक घरात थांबून राहावे यासाठी सरकारच्या सूचनेनुसार जुन्या व प्रसिद्ध मालिका प्रसारित करण्यात आल्या. त्याबरोबरच दिवसभर न्युज चॅनलवर कोरोना अपडेट चालू असायच्या. अमुक भागात इतके कोरोना रुग्ण सापडले, दिवसभरात इतके रुग्ण दगावले वैगेरे.. बातम्या ऐकून लोक आणखीनच तणावाखाली येत होते. आणि त्या मोबाईलमधील कोरोना कॉलर ट्यूनबद्द्ल तर बोलायलाच नको..

मुळात हा काळ मार्च-एप्रिलचा म्हणजे मुलांच्या परीक्षांचा काळ होता. अनेकांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग याचा अभ्यासासाठी केला. इंटरनेद्वारे YouTube वैगेरे माध्यमातून ऑनलाईन अभ्यास चालू ठेवला. तसेच काहीजणांना असाही विश्वास होता की, परीक्षा काही होणार नाहीत त्यामुळे अभ्यास करण्यात काही अर्थ नाही, त्यांनी मात्र इंटरनेटवर टिकटॉक, सोशल मीडियावर आपला वेळ घालवला.

लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेचे मात्र अतोनात हाल झाले. विशेषतः ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे, कारण काम केले तरच त्यांच्या पोटाला मिळते. लॉकडाऊन काळात घरी बसून त्यांचे पोट भरेल का?? लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या. मजूर आपापल्या गावी परत जाऊ लागले. वाहतुकीची साधने बंद असल्याने एका राज्यातून आपल्या दुसऱ्या राज्यात हजारो मैल अंतर पायी प्रवास करीत परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर चालू झाले. गरिबीचे भयानक वास्तव आपण या निमित्ताने पाहिले.

लॉकडाऊनमुळे घरात अडकून राहिल्याने व्यवसाय, नोकरी बंद असल्याने अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्वचजण मानसिक ताणाखाली आले. 21 दिवसांचे लॉकडाऊन संपत असतानाच पुन्हा 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले. यावेळी शहरी भागात अडकलेले चाकरमानी जिवाच्या आकांताने मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतू लागले.

त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होऊ लागला. अमक्या भागात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडला, अमुक एरिया क्वॉरन्टाईन केला गेला. साधा खोकला, सर्दी आली तरी लोक संशयाने वागू लागले. घरोघरी प्रत्येकजण घरगुती डॉक्टर बनला. जो तो घरगुती उपायाने सर्दी, खोकला घालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागला. कारण संशय वाढला तर कोरोना टेस्ट करतील व कोरोना सेंटरमध्ये दिवस काढावे लागतील म्हणून..

लॉकडाऊनमध्ये दीड महिना राहिल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत होता तसेच आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवणे हे अर्थव्यवस्थेलाही परवडणारे नसल्याने सरकारने 18 मे नंतर हळूहळू लॉकडाऊन उठवला. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अशाप्रकारे लोकांनी दीड महिने लॉकडाऊनमध्ये घालवले. अशाप्रकारे अनेक बरेवाईट अनुभव लोकांना या काळात आले.