डाव्या बाजूला डोकेदुखी –
डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात.
डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण आहे का ..?
अनेक कारणांमुळे डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. प्रामुख्याने मायग्रेन डोकेदुखी, टेन्शनमुळे होणारी डोकेदुखी यामुळे डाव्या बाजूला डोके दुखू लागते. कोणत्याही डोकेदुखीमध्ये होणाऱ्या वेदना ह्या काही तासांतच कमी होत असतात. अशावेळी काळजीचे कारण नसते. परंतु जर डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होत असल्यास किंवा होणाऱ्या वेदना कमी होत नसल्यास ते काळजीचे कारण असू शकते. यावेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
डाव्या बाजूचे डोके कशामुळे दुखते ..?
खालील कारणांमुळे डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते.
- मायग्रेन डोकेदुखीमुळे डाव्या बाजूचे डोके दुखू लागते.
- कामाचा ताण किंवा मानसिक ताण,
- अतीप्रवास,
- अपुरी झोप,
- मद्यपान, सिगारेट या व्यसनांमुळे,
- तिखट, मसालेदार पदार्थ, फास्टफुड सतत खाण्यामुळे
- उपाशी राहिल्याने,
- सर्दी पडसे झाल्यामुळे,
- वेदनाशामक औषधांचा अतिवापर,
- डोक्याला मार लागल्याने डाव्या बाजूचे डोके दुखू शकते.
तसेच काहीवेळा उच्च रक्तदाब, ब्रेन ट्युमर, पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक), काचबिंदू (Glaucoma) ह्या कायमचे अंधत्व येणारा आजार अशा गंभीर कारणांमुळे डोक्यात डाव्या बाजूला दुखत असते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते. ..?
डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होत असल्यास किंवा होणाऱ्या वेदना कमी होत नसल्यास ते काळजीचे कारण असू शकते. यावेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. तसेच डाव्या बाजूला डोके दुखणे याबरोबरच खालील लक्षणे जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
धोकादायक लक्षणे –
- डोक्यात डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे,
- डोळे अतिशय दुखणे,
- डोळ्यांनी अंधुक व अस्पष्ट दिसणे,
- डोळ्यांनी डबल दिसणे,
- उलट्या होणे,
- कानांनी कमी ऐकू येणे,
- बोलण्यास त्रास होणे,
- हातापायात किंवा चेहऱ्यावर मुंग्या येणे,
- हातापायात किंवा चेहऱ्यावर कमजोरी जाणवणे,
- चालण्यास त्रास होणे,
- तोल सांभाळता न येणे,
- झटके येणे,
चक्कर येणे
यासारखी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक), ब्रेन ट्युमर, काचबिंदू अशा धोकादायक आजारांशी संबंधित असू शकतात.
डाव्या बाजूचे डोके दुखणे आणि उपचार –
डोकेदुखी कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. डोकेदुखी सामान्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषध (पेनकिलर्स) घेऊ शकता.
डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय –
उपाय क्रमांक 1 –
डाव्या बाजूला डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे डोकेदुखी कमी होते.
उपाय क्रमांक 2 –
डाव्या बाजूचे डोके दुखत असल्यास काही लवंगा तव्यावर गरम करून रुमालात गुंडाळून त्यांचा वास हुंगावा.
उपाय क्रमांक 3 –
डोक्याच्या डाव्या बाजूला बर्फाचा शेक दिल्यामुळेही डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते.
उपाय क्रमांक 4 –
आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोकेदुखी लगेच कमी होईल.
उपाय क्रमांक 5 –
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी पुरेसे पाणी प्यावे. युमुळे डोकेदुखी थांबून, आराम मिळण्यास मदत होईल.
डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ नये यासाठी काय करावे ..?
- संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
- दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
- दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
- मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
- स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
- वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
- तंबाखू, गुटखा, सिगरेट, मद्यपान अशी व्यसन करणे टाळा.
हे सुध्दा वाचा – मायग्रेन डोकेदुखीची माहिती व उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about left side headache Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.