Fertility Tests for Men and Women in Marathi, Ovulation Tests in Marathi.

वंध्यत्व तपासण्या व निदान :

वंध्यत्व समस्येने त्रस्त असणाऱ्या जोडप्याच्या तपासण्या कधी सुरू कराव्यात या बाबतीत एकमत नाही. लग्नानंतर साधारण 2-3 वर्षे इच्छा असूनही गर्भधारणा न झालेल्या जोडप्यांची पूर्ण तपासणी सुरू करण्यास हरकत नाही. वाढते वय व तत्सम इतर कारणे असल्यास त्याआधीही तपासण्या सुरु करणे आवश्यक असते. प्रत्येक जोडप्याच्या तक्रारीचे स्वरूप व गरज लक्षात घेऊन तपासण्या सुरू केल्या जातात.

वयाचा आणि वंध्यत्वाचा संबंध :
स्त्रीच्या वाढत्या वयाबरोबर तिची प्रजननक्षमता कमी होत जाते. वयाच्या तिशीपर्यंत नियमित लैंगिक संबंध असलेल्या स्त्रीला एका महिन्यात गर्भधारणा होण्याची क्षमता साधारणत: 8 ते 10 टक्के इतकी असते. हीच क्षमता पस्तिशीनंतर 5 ते 6 टक्के इतकी कमी होते. पस्तिशीनंतर स्त्रीबीजाची गुणवत्ता कमी होत जाते. आणि म्हणूनच पस्तिशीनंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास विलंब होत असल्यास त्वरित वंध्यत्व तज्ज्ञांकडून उपचार चालू करणे आवश्यक ठरते.

दोघांचीही संपूर्ण वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे :
यामध्ये आपल्या डॉक्टरांकडून जोडप्यास त्यांच्या समस्या विचारल्या जातात. त्यांच्या शारीरीक संबंधाविषयी माहिती विचारली जाते, जसे- शारीरीक संबंध वेदनारहीत व पुरेसा वारंवार होतो का? आणि मासिक पाळीच्या कोणत्या कालावधीत होतो? इ. प्रश्न आपले डॉक्टर विचारतात. याशिवाय स्त्रीची मासिक पाळी, जननेंद्रियांचे पूर्वीचे व सध्याचे रोग, इतर मोठे रोग, शस्त्रक्रिया व अपघात, जवळच्या नातलगामध्ये विवाह झालेला आहे का? कुटुंबातील आनुवंशिकता आहे का? किंवा क्षयासारखे सांसर्गिक रोग झाले होते का? इ. गोष्टींची माहिती वंधत्वाच्या कारणाच्या निदानासाठी घेतली जाते. त्यानंतर दोघाची शारीरिक तपासणी केली जाते.

पुरुष वंध्यत्व निदान कोणकोणत्या तपासणीद्वारे करतात..?
जेव्हा एखादे दाम्पत्य वंध्यत्व तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे येते तेव्हा पुरुषाच्या तपासण्या आधी करणे हे सोयीस्कर असते. पुरुषाच्या तपासण्या स्त्रीच्या तपासण्यांपेक्षा कमी गुंतागुंतीच्या व पर्यायाने कमी खर्चिक असतात हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. परंतु, आजही मोठय़ा प्रमाणात पुरुष वंध्यत्व उपचारांबाबत कमालीचे उदासीन आढळतात.
डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी, गुप्तांगाची तपासणी केली जाते. यानंतर विशेष तपासणी केली जाते. यामध्ये, रक्त, लघवीची तपासणी गुप्तरोग व मधुमेहासाठी केली जाते, रक्त परिक्षणातून हॉर्मोनची स्थिती पाहिली जाते.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वीर्य तपासणी :
वीर्य परिक्षणातून वीर्याचे स्वरुप, संख्या, गती पाहिली जाते. याद्वारे पुरुषवंधत्वाचे निदान केले जाते. वीर्य तपासणी सोपी, बिनत्रासाची, कमी खर्चाची व वारंवार करता येण्यासारखी असते म्हणून वंधत्वाच्या सर्व जोडप्यांमध्ये प्रथम या तपाससणीवरून पुरुषाच्या जननक्षमतेचा अंदाज आल्याशिवाय स्त्रियांच्या तुलनेने अवघड, जास्त खर्चाच्या, बहुधा शस्त्रक्रियेची व भूल देण्याची आवश्यकता असलेल्या आणि म्हणून तुलनेने जास्त धोक्याच्या असलेल्या तपासण्या केल्या जात नाहीत.

वीर्य तपासणीत एका वेळी मिळालेल्या एकूण वीर्याचे प्रमाण, शुक्राणू संख्या, शुक्राणूंची हालचाल, त्यांची रचना व एकूण शुक्राणूंत पूर्ण वाढीच्या व प्राकृत रचनेच्या शुक्राणूंचे प्रमाण या गोष्टी पाहिल्या जातात. या सर्वांत शुक्राणू घनता (एक मिली. वीर्यातील शुक्राणूंची संख्या) जास्त महत्त्वाची ठरते. ती सहा ते दहा कोटींपर्यंत असल्यास चांगली समजली जाते; परंतु एक कोटी इतकी कमी असलेलीही पुरेशी ठरू शकते. त्यातील प्राकृत रचनेच्या व चांगली हालचाल असलेल्या शुक्राणूंचे प्रमाण 50 ते 75 टक्क्यांपर्यंत असणे पुरेसे समजले जाते.

टेस्टीक्यूलर बायोप्सी :
वीर्यात दोष आढळला तर अंडबीजाच्या तुकड्याची तपासणी केली जाते. वारंवार केलेल्या वीर्य-तपासणीत शुक्राणू न आढळल्यास किंवा अत्यल्प प्रमाणात आढळल्यास ही तपासणी केली जाते. त्यावरून वीर्यातील शुक्राणूंच्या अभावाचे कारण समजण्यास मदत होते.
वृषणात शुक्राणू उत्पादन न आढळल्यास त्याचे कारण शुक्राणू उत्पादक नलिका प्राकृत असूनही (अंतःस्त्रावी ग्रंथींच्या व इतर दोषांमुळे) अनुत्तेजित आहेत का त्याच (वाढ न झाल्याने किंवा रोगग्रस्त असल्याने) अकार्यक्षम आहेत हे ठरविता येते. तसेच वृषणातील शुक्राणू उत्पादन प्राकृत आढळल्यास पुढील जननमार्गातील वाहिन्यांत अडथळा असल्याचे निदान करता येते.

व्हासोग्रफी :
जननमार्गातील वाहिन्यांत अडथळा आहे का? हे पहाण्यासाठी व्हासोग्रफी तपासणी करतात.

वीर्य तपासणीत जर काहीही दोष आढळला नाही तर मग पत्नीच्या तपासण्यास सुरुवात केली जाते.

स्त्री वंध्यत्व निदान कोणकोणत्या तपासणीद्वारे करतात..?
डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणीबरोबरच जननेंद्रियांच्या तपासणीवर मुख्य भर दिला जातो. यानंतर विशेष तपासणी केली जाते.

लॅप्रोस्कोपी :
पोट, उदर, गर्भाशयासारख्या अवयवांच्या आतील स्थिती जाणून घेण्यासाठी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या तपासणीस लॅप्रोस्कोपी असे म्हणतात. गर्भाशयाच्या लॅप्रोस्कोपी तपासणीसाठी बेंबीजवळ एक सूक्ष्म छीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून गर्भाशयात बघतात. यामुळं गर्भाशय पिशवी, तिचा आकार, स्थिती जाणून घेतात. गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ओव्हरीजची स्थिती कळण्यास मदत होते. या तपासणीमुळे स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होते की नाही? अंडवाहिन्यांचा खुलेपणा व बंद असल्यास अडथळ्याचे स्थान यांचे स्पष्ट निदान होते. तसेच रोगग्रस्त व अकार्यक्षम अंडवाहिन्या, अंडवाहिन्यांभोवतीचे बंध, गर्भाशयातील अर्बुदे व बंध, गर्भाशयाच्या विकृती इत्यादींचेही निदान होते. स्त्री वंधत्वासंबधी ही कारणे लॅप्रोस्कोपीमूळे समजण्यास मदत होते. लॅप्रोस्कोपीमुळे एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते. गर्भनलिका म्यूकसमुळे बंद असेल, तर लॅप्रोस्कोपीमुळे गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते. लॅप्रोस्कोपीवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन करण्यात येते. तसेचं लॅप्रोस्कोपी करताना आतील अवयवांमध्ये जे जे दिसते त्याचा इंडोस्कोपिक फोटोग्रॉफीच्या सहाय्यानं फोटो काढून ठेवता येतात. त्यानंतर ते फोटो बघून त्यात असलेला दोष सांगता येतो. आणि लॅप्रोस्कोपी एका दिवसातचं पुर्ण होत असल्याने रूग्णाला त्याच दिवशी घरी जाता येतं.

क्युरेटिंग :
ही क्रिया येणाऱ्या मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात केली जाते. वंध्यत्वासाठी उपचार म्हणून क्युरेटिंग ही उपयुक्त ठरत असली, तरी ती मुख्यत्वे तपासणी म्हणून केली जाते. यात गर्भाशयाचं तोंड मोठं करून क्युरेटिंग करतात. गर्भाशयाचा आतील भाग खरवडून मिळणारे अंतःस्तरीय ऊतक पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवले जाते. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही? हा निष्कर्ष काढता येतो. तसेचं गर्भाशयाच्या पिशवीला क्षयरोगासारखा गंभीर विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो. एरवी निरोगी भासणाऱ्या स्त्रियांत अंतःस्तराचा किंवा श्रोणीभागातील क्षयरोग हे वंध्यत्वाचे बऱ्याच वेळा आढळणारे कारण आहे.

हवा भरणे :
या तपासणीत विशिष्ट साधनांच्या व उपकरणांच्या साहाय्याने गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात हवा भरली जाते. किमान एक किंवा दोन्ही अंडवाहिन्या मोकळ्या असल्यास ही हवा त्यांच्या दुसऱ्या तोंडातून उदरगुहेत शिरते. उपकरणातील हवेच्या दाबातील बदल, या दाबाचा आलेख, स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने पोटावर श्रवण केल्यास हवा उदरगुहेत शिरताना येणारे बुडबुड्यांसारखे आवाज, मध्यपटलाखाली हवा वा वायू दर्शविणारी क्ष-किरण तपासणी यांवरून किमान एक अंडवाहिनी मोकळी असल्याचे निदान करता येते. ही तपासणी बाह्य रुग्ण विभागात व भूल दिल्याशिवाय करता येण्यासारखी असली, तरी शक्यतो भूल देऊन व संपूर्ण जंतुविरहित परिस्थितीत केली जाते; परंतु खुलेपणा दोन्ही अंडवाहिन्यांच्या बाबतीत असल्याचे ठरविणारी ही खात्रीशीर तपासणी नसल्याने, चुकिच्या निकालांचे प्रमाण यात खूप असल्याने, अंडवाहिन्यांचा निरोगीपणा ठरविता येत नसल्याने व इतर धोक्यांमुळे सध्या ही तपासणी सहसा केली जात नाही

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

याशिवाय गर्भाशयाचा फोटो घेऊनसुद्धा परिक्षण करतात.
हार्मोन्सची तपासणी करून हॉर्मोनची स्थिती पाहिली जाते.इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, F.S.H., L.H. या आंतस्त्रावांंचे परिक्षण केले जाते. ह्या विविध तपासण्यांद्वारे स्त्रियांसंबंधी वंधत्वाचे निदान होण्यास मदत होते.

वंध्यत्व म्हणजे काय, वंध्यत्व कारणे, स्त्रीबीज तयार न होणे, मुल न होण्याची कारणे, वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार याविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

Infertility causes, treatment, Tests and diagnosis in Marathi