लसीकरणासंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण (Immunization FAQ)

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

Immunization FAQ in Marathi, importance of immunization in marathi.

लसीकरण महत्त्व :

बालकांचं लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. 1 वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे.

बाळ आजारी असले तरी त्याला योग्यवेळी लसी दयाव्यात का?
बाळाला सर्दी, खोकला, ताप किंवा अतिसार असला तरी बाळाचे लसीकरण किरकोळ आजारात पुढे ढकलू नये. जर बाळ कुपोषित असले तर निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकते.

बाळाला एक वर्षाच्या आत कोणकोणत्या रोग प्रतिबंधक लसी देतात?
बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे. म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते. एक वर्षाच्या आत क्षयरोग प्रतिबंधक लास, त्रिगुणी लास, पोलियो प्रतिबंधक डोस, गोवराची लास या लसी द्यायला पाहिजेत. रक्त काविळीची लास पहिल्या दहा दिवसात देतात.

क्षयरोग प्रतिबंधक लस कधी टोचतात?
क्षयरोग प्रतिबंधक लसीला बी.सी.जी. लस म्हणतात. ती डाव्या खांदयावर कातडीमध्ये टोचतात. बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. 15 दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्याठिकाणी थोडासा व्रण एक ते दिड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील 3-4 महिन्यात कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते.

त्रिगुणी लस कधी टोचावी?
बाळ दिड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा दयावा.

पोलियो प्रतिबंधक लस बाळाला कधी दयावी?
बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियो प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियो पासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षाने आणखी एक बूस्टर डोस दयावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस दयावा लागतो.

गोवर प्रतिबंधक लस कधी टोचतात ?
गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस बाळाला 9 ते 12 महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते.

बाळाला ‘अ’ जीवनसत्त्वाचे डोस कधी पाजतात ?
सहा महिने ते 3 वर्ष या वयात ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळतो. म्हणून या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजावेत व तसेच त्याच्या आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्या असे पदार्थही असावेत.

लसीकरण तक्ता मराठीत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© Healthmarathi.com
कॉपीराईट विशेष सूचना -
वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.