सेंद्रिय गुळ (Organic Pure Jaggery) –
आजकाल सेंद्रिय गुळाचे महत्व अनेकांना पटल्यामुळे सेंद्रिय गुळ खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. पण गुळ खरेदी करताना तो सेंद्रिय आहे की सामान्य आहे हे कसे ओळखावे याविषयी अनेकांना माहिती नसते.
सेंद्रिय गुळ म्हणजे काय..?
सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायने किंवा केमिकल्स वापरली जात नाहीत. सेंद्रिय गूळ हा रसायने असणाऱ्या सामान्य गुळापेक्षा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. तसेच अधिक गुणवत्तापूर्ण सेंद्रिय गुळ बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीतील उसाचा वापर केला जातो.
सामान्य गुळात कोणते केमिकल्स घालतात..?
सामान्य गुळ हा आरोग्यासाठी फारसा चांगला नसतो. कारण सामान्य गुळ तयार करताना त्यात विविध केमिकल्स वापरली जातात. यामध्ये गंधक (सल्फर), सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट या रसायनांचा वापर केला जातो.
सामान्य गुळात केमिकल्स का वापरली जातात..?
केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकावा यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फरची पावडर) मिसळली जाते. यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता थोडा काळसर असलेला सेंद्रिय गूळच खाण्यासाठी वापरला पाहिजे.
सेंद्रिय गुळ कसा ओळखावा..?
सेंद्रिय गुळ चविस अधिक गोड व स्पर्शास मऊ असतो.
- सेंद्रिय गुळाचा रंग तांबूस, काळसर किंवा तपकिरी (red-dark brown color) असतो.
- केमिकल असणाऱ्या गुळाचा रंग पिवळसर असतो.
- गुळाच्या पॅकिंगवरही उत्पादकाने गुळ केमिकलयुक्त आहे की Organic किंवा केमिकल फ्री आहे ते दिलेले असते.
- सेंद्रिय गुळ हा सामान्य गुळापेक्षा थोडा महाग असतो.
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे होणारे फायदे :
अनेक पोषकतत्वे असतात..
सेंद्रिय गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक असतात. सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात.
हिमोग्लोबिन वाढवते..
सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी ऍनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गुळ खाणे फायदेशीर असते.
रक्तदाब नियंत्रित ठेवतो..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
मांसपेशी बळकट बनवतो..
सेंद्रिय गुळामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियमचे प्रमाण असते. यामुळे मांसपेशी बळकट होण्यासाठी मदत होते.
पचनशक्ती सुधारते..
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे आपल्या यकृताच्या यकृतातील अपायकारक विषारी घटक दूर होण्यास (लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होण्यास) मदत होते.
केमिकल्सचे अनेक वाईट दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. सेंद्रिय गुळ तयार करताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही. त्यामुळे अशा केमिकल फ्री असणाऱ्या सेंद्रिय गुळाचे आरोग्यदायी महत्व पटल्यामुळे आज सेंद्रिय गुळाला प्रचंड मागणी आहे. सेंद्रिय गुळाबरोबरच त्याची पावडरही बाजारात आहे ती सुद्धा अशीच उपयुक्त असते.
हे सुध्दा वाचा –
गुळाचा चहा पिण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या.
Read Marathi language article about how to identify organic pure jaggery. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.