घसा बसणे – Hoarseness in Marathi :

घसा बसतो म्हणजे आपल्या सामान्य आवाजामध्ये फरक पडून आवाज घोगरा बनत असतो. अनेक कारणांनी घसा बसत असतो. आवाज बसणे किंवा गळा बसणे या आजारास english मध्ये Hoarseness या नावाने ओळखले जाते.

आवाज बसण्याची कारणे :

• बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो.
• घशात इन्फेक्शन झाल्यामुळे,
• सर्दी किंवा खोकला झाल्यामुळे,
• थंडगार पदार्थ खाण्यामुळे,
• तेलकट पदार्थ अधिक खाणे यामुळे,
• सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,
• याशिवाय थायरॉईड समस्या किंवा घशाचा कर्करोग यांमुळेही गळा बसू शकतो.

घसा बसणे ह्यावर हे करा घरगुती उपाय :

आले –
घसा बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. घसा बसणे यासाठी हा आयुर्वेदिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. कारण आले व मधामुळे घशातील कफ, इन्फेक्शन आणि सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी घसा बसल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आले व मध खावे. त्यामुळे आवाज मोकळा होण्यास मदत होते.

मध –
घसा बसणे यावर मध खूप उपयुक्त ठरते. घसा बसल्यावर वरचेवर चमचाभर मधाचे चाटण करावे.

काळी मिरी –
ग्लासभर गरम पाण्यात दोन चमचे मध व अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालावी. हे मिश्रण पिण्यामुळे घशाला आराम मिळून घसा बसणे समस्या दूर होते. याशिवाय अर्धा चमचा काळ्या मिरीची पावडर एक चमचा मधाबरोबर एकत्र करून हे मिश्रण चाटण करणेही उपयुक्त ठरते.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या –
गळा बसल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व आवाज बसणे दूर होते.

लिंबाचा रस –
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळेही घसा बसणे दूर होते. तसेच लिंबू पाण्याच्या गुळण्या करणेही उपयुक्त ठरते.

लसूण –
घसा बसल्यास एक ते दोन लसूण पाकळी चावून खाल्याने उपयोगी ठरते. 

गळा बसल्यास काय करावे..?

• घसा बसल्यास घशाला आराम द्यावा.
• घशाला ताण देऊन बोलणे टाळावे.
• थंड पदार्थ खाणे टाळावे.
• जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये.
• घसा बसल्यास तंबाखू, सिगारेट, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
• गरम द्रव्यपदार्थ प्यावेत.
• घसा बसणे यावर घरगुती उपाय करूनही आठवड्यात फरक न पडल्यास आपल्या डॉक्टरांकडून घशाची तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत.

घशाला सूज आल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)