Dr Satish Upalkar’s article about Fracture treatments in Marathi.

हाड मोडणे – Fracture in Marathi :

अपघात, उंचावरून पडणे, पाय घसरून पडणे किंवा मारामारी अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे अनेकदा हाड मोडण्याचे प्रकार घडतात. काहीवेळा पडण्यामुळे जखम किंवा रक्तस्त्राव होत नाही मात्र आतल्या आत मार लागून हाड मोडत असते. हाड मोडणे याला अस्थिभंग किंवा फ्रॅक्चर असेही म्हणतात. हाड मोडण्याची लक्षणे व हाड मोडणे यावरील उपाय याची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

हाड मोडल्यावर कोणते उपचार करतात याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

आपली हाडे मजबूत नसल्यास हाडे ठिसूळ होऊन अगदी छोट्याशा अपघाताने सुध्दा हाड मोडू शकते. विशेषतः वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत अशा घटना अधिक घडतात. कारण वाढत्या वयाबरोबर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ बनत असतात. याशिवाय वृद्ध व्यक्तींमध्ये मोडलेली हाडे जुळून येण्यासाठी बराच काळ लागत असतो.

हाड मोडणे याची कारणे –

हाडांना मार बसल्याने जसे अपघात, खूप उंचावरून खाली पडणे, पाय घसरून खाली पडणे, तोल जाऊन पडणे, खेळताना होणाऱ्या दुखापती, मारामारी अशा कारणांनी हाड मोडते.

हाड मोडल्याची लक्षणे –

  • हाड मोडल्याच्या ठिकाणी अतिशय तीव्र वेदना होतात.
  • हाड मोडल्याच्या जागी सूज येते.
  • जखमी भागाला स्पर्श केल्यास, तेथे दाब दिल्यास अधिक दुखू लागते.
  • जखमी भाग वेडावाकडा दिसू लागतो.
  • जखमी भागाची हालचाल करणे कठीण होते.
  • मोडलेल्या अवयवाची हालचाल झाल्यास त्यातून कडकड असा आवाज येतो.
  • पाठ, कंबर, पाय अशा ठिकाणचे हाड मोडले असल्यास उठून बसणे किंवा चालणे अवघड बनते. अशी हाड मोडल्याची लक्षणे असतात.

फ्रॅक्चरचे प्रकार –

फ्रॅक्चरचे अनेक प्रकार असतात. त्यातही क्लोज्ड फ्रॅक्चर आणि ओपन फ्रॅक्चर हे दोन मुख्य प्रकार आहेत.

1) क्लोज्ड फ्रॅक्चर –
यामध्ये हाड मोडते परंतु त्वचेवर कुठेही जखम किंवा रक्तस्त्राव होत नाही.

2) ओपन फ्रॅक्चर –
यामध्ये हाड मोडल्यामुळे त्वचेला जखम होते, त्यातून रक्तस्त्राव येतो तसे काहीवेळा मोडलेले हाड त्वचेतून बाहेर येते. अशाप्रकारच्या ओपन फ्रॅक्चरमुळे जखमेतून इन्फेक्शन होऊन ते इन्फेक्शन हाडांमध्ये खोलवर जाण्याचा धोका असतो.

हाड मोडल्याचे निदान –

दुखापतीची तपासणी करून हाड मोडले असल्याचे निदान डॉक्टर करू शकतात. याशिवाय दुखापत झालेल्या भागाचा एक्स-रे काढून हाड मोडले आहे की नाही ते तपासले जाते. काहीवेळा याच्या निदानासाठी सिटी स्कॅन, एमआरआय किंवा बोन स्कॅन अशा तपासण्या सुध्दा कराव्या लागू शकतात.

हाड मोडणे यावर प्रथमोपचार –

हाड मोडणे ही वैद्यकीय इमर्जन्सी असते. फ्रॅक्चर गंभीर असेल तर त्यामुळे जखमेत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तासेच रक्तवाहिन्या, नाड्या यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे फ्रॅक्चर झाल्यास हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक आहे.

  • हाडे मोडल्यच्या गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णाला तातडीने दवाखान्यात दाखल करावे. जवळपास वाहन नसल्यास 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
  • दुखापत झालेल्या भागाची जास्त हालचाल करू नये.
  • जखमी भागास छोटी काठी, पट्टी किंवा कापड बांधून आधार देऊ शकता. त्यामुळे त्या भागाची हालचाल कमी होते.
  • ओपन प्रकारचे फ्रॅक्चर झाले असल्यास जखमेतून बाहेर आलेले तुटके हाड आत ढकलण्याचा प्रयत्न करू नये.
  • हाड मोडले आहे की नाही हे पाहण्यासाठी जखमी भाग हलवून पाहू नये, तसेच त्यातून कडकड असा आवाज येतो का ते पाहू नये.

हाड मोडल्यावर उपचार –

कोणत्या ठिकाणचे हाड मोडले आहे, फ्रॅक्चरचा प्रकार, स्वरूप यानुसार हाड मोडल्यावर उपचार ठरतात. उपचारामध्ये हाडे व्यवस्थित बसवली जातात. त्यानंतर मोडलेली हाडे जुळण्यासाठी प्लास्टर घातले जाते. तसेच मोडलेले हाडे जुळवण्यासाठी काहीवेळा प्लेट्स, स्क्रू, रॉड वापरले जाते.

हाडे मोडल्यास अतिशय वेदना होत असतात. अशावेळी वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या औषधे (पेनकिलर्स) दिली जातात. तसेच काहीवेळा वेदना कमी करण्यासाठी ट्रॅक्शनचा वापर करतात. ओपन फ्रॅक्चर्स झाले असल्यास जखमेतून इन्फेक्शन होऊ नये यासाठी तेथे जंतुनाशक औषधे लावावी लागतात.

मोडलेली हाडे जुळण्यसाठी काही आठवडे ते महिने लागू शकतात. यावर प्रामुख्याने वय आणि फ्रॅक्चरचा प्रकार अशा गोष्टी अवलंबून असतात. वृद्ध व्यक्तींमध्ये मोडलेली हाडे जुळून येण्यासाठी बराच काळ लागत असतो. तर लहान मुलांची हाडे लवकर जुळून येतात. हाडे जुळल्यानंतर तेथील मांसपेशी मजबूत करण्यासाठी फिजियोथेरपी सारखे व्यायाम करायला सांगितले जातील.

हाड मोडणे यावर उपाय –

घरगुती उपायांनी मोडलेली हाडे जुळवण्यासाठी मर्यादा येतात. हाड मोडल्यावर त्यावर अस्थीरोग तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते.

  • हाड मोडल्यावर काही घरगुती उपायांनी होणाऱ्या वेदना कमी करू शकता.
  • दुखापत झालेल्या भागाची जास्त हालचाल करू नका.
  • तेथील सूज कमी करण्यासाठी कापडात बर्फाचे तुकडे गुंडाळून त्याने शेक द्यावा.
  • हाड मोडले असल्यास प्लास्टर वैगेरे घातल्यानंतर आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लोह, व्हिटॅमिन सी, व प्रोटीन्सयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत.
  • आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, तीळ, गूळ, मांस, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, फळे, केळी, संत्री, कडधान्ये यांचा समावेश करावा.

हाड मोडल्यास असे उपाय करू शकता.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – हाडे मजबूत करण्यासाठी उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

In this article information about Fracture Symptoms, Causes, Diagnosis, First aid, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...