हार्ट अटॅक वरील प्राथमिक उपाय –

दरवर्षी जगात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 17 दशलक्ष मृत्यू होतात. अनेकवेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने संबंधित व्यक्तीवर मृत्यू ओढावतो. वेळेत योग्य उपचार मिळाल्याने हे प्रमाण निश्‍चितच कमी होईल.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर होणारी रुग्णाची बिकट अवस्था, नातेवाइकांचे गोंधळून जाणे आणि प्रथमोपचार करून रुग्णाला रुग्णालयात कसे घेऊन जावे, हे नीट समजून घेतले पाहिजे.

अचानक हृदयक्रिया बंद पडली की, मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद होतो. पुढील चार-पाच मिनिटांत मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला नाही तर मेंदूचे कार्य पूर्ण बंद होते आणि मेंदू मृत अवस्थेत जातो. म्हणूनच मेंदूचा मृत्यू होऊ नये, यासाठी कोणतीही उपकरणे किंवा साधने हाती नसताना सर्वसामान्य नागरिकांनी काय-काय करायचे आणि त्या रुग्णाला रुग्णालयात पुढील उपचार करण्यासाठी कसे दाखल करावे, हे सर्वांना समजावे म्हणून ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चा कार्यक्रम जाणून घेणे आवश्यक आहे.

कोणताही रुग्ण आपल्यासमोर अचानक कोसळून खाली पडला तर त्याची हृदयक्रिया सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी अजिबात वेळ न घालवता पुढील क्रिया कराव्यात.

(1) मोठय़ा आवाजात त्या रुग्णाला हाक मारावी. फक्त दोनच वेळा हाक मारूनही तो रुग्ण जागा झाला नाही, तर तो बेशुद्ध झाला आहे असे गृहीत धरावे.

(2) त्या रुग्णाचा श्‍वास नैसर्गिकरितीने सुरू आहे की नाही, हे पाहावे. छाती आणि पोट हालत नसल्यास श्‍वास बंद झालाय हे गृहीत धरावे.

बेशुद्ध अवस्था आणि श्‍वास बंद असल्यास निश्‍चित समजावे की, रुग्णाची हृदयक्रिया बंद पडली आहे. हे निदान निश्‍चित करण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात. नाडी तपासणे, बी. पी. तपासणे, कांदा लावणे, चपलाचा वास देणे हे करण्यात अती महत्त्वाचा वेळ वाया घालवू नये. पुढील क्रिया सुरू कराव्यात.

हार्ट अटॅक आल्यावर काय करावे..?

  • स्वत:ची सुरक्षितता पाहून दुसर्‍यांना मदतीसाठी जोराने साद (हाक) घालावी.
  • रुग्णाच्या अंगावरचे घट्ट कपडे सैल करावेत.
  • 108 या नंबरला फोन लावून रुग्णवाहिकेला तात्काळ बोलावून घ्यावे किंवा चारचाकी, रिक्षामधून जवळच्या रुग्णालयात न्यावे.
  • रुग्णाला चालत दवाखान्यात नेणे किंवा दुचाकीवरून नेणे टाळावे.
  • जवळपास वाहन किंवा हॉस्पिटल नसल्यास आपल्याकडे अॅस्पिरीनची गोळी असल्यास ती रुग्णाच्या जिभेखाली ठेवावी. यामुळे रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते.
  • आणि जर जवळपास वाहन, हॉस्पिटल किंवा अॅस्पिरीनची गोळी नसल्यास खालील CPR उपाय सुरू करावेत आणि रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णाला दवाखान्यात घेऊन जावे.

छातीवर दाब देणे :
रुग्णाला जमिनीवर झोपवून त्याचे कपडे सैल करून पाय थोडे उंचावर ठेवून त्याच्या खांद्याजवळ आपल्या गुडघ्यावर उभे राहून रुग्णाच्या छातीवरील मधल्या हाडावर आपल्या उजव्या हाताची टाच ठेवावी. त्यावर डाव्या हाताची टाच ठेवावी. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवावी आणि छातीच्या बरगड्यांना स्पर्श करणार नाहीत, अशी ठेवावीत. थोडे पुढे झुकावे. कोपराच्या सांध्यात हात ताठ ठेवावेत आणि आपले दोन्ही हात जमिनीशी काटकोनात सरळ करून आपल्या शरीराच्या वजनाचा वापर करून 100 प्रति मिनिटप्रमाणे छाती दाबायला सुरुवात करावी.

हा दाब प्रभावी होण्यासाठी 4 ते 5 cm खोल दाबावा. अजिबात व्यत्यय न आणता सातत्याने, प्रभावी दाब दिल्यास हृदयाचे कप्पे व्यवस्थित भरून हृदयाच्या स्नायूला आणि मेंदूला प्राणवायूचा पुरवठा सुरू होतो आणि रुग्ण शुद्धीवर येतो आणि श्‍वासही घेऊ शकतो.

श्‍वसन मार्ग मोकळा करणे :
बेशुद्ध झाल्यामुळे सर्व शरीराबरोबरच रुग्णाची जीभ सैल आणि शिथिल होऊन घशात पडते आणि श्‍वसन मार्ग बंद होतो. श्‍वसन मार्ग खुला करण्यासाठी खालील पद्धती क्रमाने कराव्यात.

  • रुग्णाच्या कपाळावर डावा हात ठेवून डोके तिरके करावे.
  • उजव्या हाताच्या बोटांनी रुग्णाची हनुवटी वर उचलावी.
  • या क्रियेमुळे घशात शिथिल होऊन पडलेली जीभ वर उचलली जाते आणि अडथळा दूर झाल्याने श्‍वसन मार्ग खुला होतो आणि रुग्ण श्‍वास घेऊ शकतो.

किंवा कृत्रिम श्‍वास देणे :
वरीलप्रमाणे करूनही रुग्ण श्‍वास घेऊ शकला नाही, तर कृत्रिम श्‍वास देणे गरजेचे असते.
खोल श्‍वास घेऊन स्वत:ची छाती फुगवून घ्यावी.
रुग्णाचे नाक डाव्या हाताच्या बोटांनी बंद करावे. आपले तोंड रुग्णाच्या तोंडावर घट्ट ठेवून रुग्णाच्या छातीत हवा भरावी. छाती फुगत असल्याचे निरीक्षण करावे.

30 वेळा छाती दाबल्यानंतर 2 वेळा कृत्रिम श्‍वास द्यावा. (30:2 प्रमाणे छाती दाबणे आणि कृत्रिम श्‍वास देणे ही क्रिया सातत्याने सुरू ठेवावी.

CPR केव्हापर्यंत सुरू ठेवावी..?
रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत आणि स्वत:हून श्‍वास घेईपर्यंत. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत आणि आपण थकत नाही तोपर्यंत CPR सुरू ठेवावे.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.