किडनी स्टोन आणि आहार :
मुतखडा किंवा किडनी स्टोन झाल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आहारामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या क्षार घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडे होत असतात.
मुतखडा झाल्यास काय खावे..?
1) पुरेसे पाणी प्यावे.
मुतखडा असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय शहाळ्याचे पाणी, उसाचा रस,
2) कुळथाचे कढण प्यावे.
कुळथाचे कढण (सूप) पिणेही मुतखड्यावर उपयुक्त असते.
3) हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत.
मुतखडा असल्यास आहारात फायबर्सयुक्त पदार्थ अधिक असावेत. यासाठी हिरव्या पालेभाज्या, विविध फळे समाविष्ट करावीत. आहारात चाकवत भाजी, कारले, मुळा, गाजर, कांदा यांचा आवर्जून समावेश करावा.
केळी, डाळींब, टरबूज, संत्री, जांभूळ ह्यासारखी फळे खावीत. केळी, टरबूज, द्राक्षे यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असल्याने मुतखड्यावर विशेष उपयोगी ठरतात. डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.
मुतखडा झाल्यावर काय खाऊ नये..?
हाय प्रोटीनयुक्त पदार्थ, खारट पदार्थ आणि कॅल्शियम ऑक्सलेटचे पदार्थ अधिक खाण्यामुळे मुतखडे होऊ शकतात. त्यामुळे मुतखड्याच्या त्रासात यांचे कमी करणे आवश्यक असते.
किडनी स्टोनमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट असलेले पदार्थ खाणे कमी करावे. बटाटा, बीट, चॉकलेट, सुखामेवा, पालक, स्ट्रॉबेरी, चहा आणि गव्हाच्या कोंडामध्ये ऑक्सलेट अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे मुतखड्यामध्ये वरील पदार्थ खाणे टाळावे.
मुतखडा झाल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. विशेषतः पापड, लोणची, वेफर्स यासारखे खारट पदार्थ खाणे टाळावे. लघवीत मिठाचे (सोडिअमचे) प्रमाण अधिक असल्यास कॅल्शियमचे मुतखडे होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे मुतखड्याचा त्रास असल्यास मिठाचे प्रमाण कमी करावे.
हाय प्रोटीन्सयुक्त पदार्थ अधिक खाण्यामुळे लघवीत युरिक ऍसिडचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे यूरिक ऍसिडचे मुतखडे तयार होऊ शकतात. यासाठी युरिक ऍसिड वाढवणारे प्युरीनयुक्त पदार्थ म्हणजे, मांस, मासे, झिंगा, कोळंबी, खेकडा, अंडी यांचे प्रमाण मुतखडा असल्यास कमी करावे.
याशिवाय किडनी स्टोन असल्यास टोमॅटोच्या बिया, वांगी, भेंडी, वाटाणा, फ्लॉवर, अळूची भाजी, कोबी खाणे टाळावे. तसेच कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, खाण्याचा सोडा असलेले पदार्थही खाणे टाळावेत.
Read Marathi language article about Kidney stone diet plan. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.