Dr Satish Upalkar’s article about Winter session diet tips in Marathi.
हिवाळ्यातील आहार :
हिवाळा हा स्वभावतःच शीत हवामानाचा असतो. त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये करणे गरजेचे असते. उष्ण वीर्यात्मक आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदिप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. हिवाळ्यामध्ये गुरु, स्निग्ध, उष्ण गुणात्मक आहार घ्यावा. हिवाळ्यातील आहार कसा असावा तसेच हिवाळ्यात काय खावे याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.
हिवाळ्यात काय खावे ..?
हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, मांसाहार, सुकामेवा (ड्रायफ्रूट) असे पदार्थ खावेत. हिवाळ्यात आहारात गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे. तूर, उडीद, मटकी, कुळीथ इ. कडधान्यांचा वापर करावा. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा.
हिवाळ्यात आहार कसा असावा ..?
दुग्धजन्य पदार्थ –
हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कैलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.
मांसाहार –
मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा. थंडीच्या दिवसात उकडलेले अंडे खाऊ शकता. मांसाहारी पदार्थातील चरबी मात्र खाऊ नये. तसेच अंड्यातील पिवळा बलक खाणे टाळावे.
मसाला –
विविध मसाल्याचे पदार्थ हे उष्ण वीर्याचे असतात. त्यामुळे आहारामध्ये तीळ, लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. मिरी, लसूण आणि तूप घालून चटणी करावी. हिंग, तुप, मोहरी, जीरे यांची ताकाला फोडणी देऊन ते ताक प्यावे. हिवाळ्यात आपल्या आहारात तिळाचे लाडू, तिळाची चटणी, तिळगुळ यांचा जरूर समावेश करा.
सुकामेवा –
बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुकामेवा स्निग्ध उष्ण वीर्यात्मक असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात खारीक पूड दुधात घालून पिऊ शकता. या दिवसात खजूर खाणेही चांगले असते.
पाणी –
हिवाळ्यात कोमट पाणी प्यावे. त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.
हिवाळ्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असतो. या काळाचा आरोग्याला पुरेपूर फायदा होण्यासाठी,
हिवाळ्यात योग्य आणि पोष्टिक आहार घ्यावा आणि त्याला व्यायामाची जोड सुध्दा द्यावी. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत तुमचे आरोग्य सुधारण्यास चांगली मदत होईल.
हे सुद्धा वाचा – हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Winter session diet in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.