कसा असावा बाळाचा वरचा आहार

13132
views

कसा असावा बाळाचा वरचा आहार :
बाळाला वरचे दूध पाजताना :

बाळाला वरचे दूध चमच्याने पाजावे. दुधाच्या बाटलीने पाजू नये. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे.

बालकास द्यावयाचे दूध ताजे, स्वच्छ असावे. दूध तयार करण्यापुर्वी आपले हात स्वच्छ साबनाने धुवून घ्यावेत. दुध करावयाची भांडी स्वच्छ धुवून वापरावी. दूध व पाणी योग्य प्रमाणामध्येच मिसळावे.
दूधात मिसळण्याचे पाणी हे उकळून घेतलेलेच असावे.
बालकास अतिशय गरम किंवा अतिशय थंड दूध कधीही देऊ नये. दूध कोमट करुनच द्यावे.

दुधात पाण्याचे प्रमाण किती असावे :
बालकासाठी वरचे दूध सुरु करताना त्यात पाणी घालावे.
या पाण्याचे पुढील प्रमाणे प्रमाण असावे.
– जन्मापासून पहिल्या पाच दिवसांपर्यंत – 1 भाग दूध व 2 भाग पाणी मिसळावे.
– सहाव्या दिवसापासून एक महिन्यापर्यंत – अर्धाभाग दूध व अर्धाभाग पाणी मिसळावे.
– दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत – दोन भाग दूध व एक भाग पाणी मिसळावे.
– चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत – तीन भाग दूध व एक भाग पाणी मिसळावे.
– सहा महिन्यानंतर दूधात पाणी घालून देण्याची आवश्यकता नसते.
सुरवातीस अशक्त बालकासाठी दुधात पाणी जास्त प्रमाणात मिसळावे लागते. आणि त्याची पचनशक्ती सुधारल्यावर मग, दुधाचे प्रमाण वाढवावे लागते.

दुधात साखरेचे प्रमाण किती असावे :
बाळाला देण्यात येणाऱ्या दुधाला मधूर चव यावी, बाळ दुध आवडीने पिण्यासाठी दुधात साखर मिसळून द्यावी.
सामान्यता 25 ml दुधामध्ये एक चमचा साखर मिसळावी.
तसेच बाळास मलावष्टंभचा त्रास होत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे. आणि जुलाब होत असल्यास साखरेचे प्रमाण कमी करावे.

बाटलीने दूध पाजण्याची पद्धत :
बाटलीने दूध पाजताना बाळाला मांडीवर घ्यावे. बाळाचे डोकं डाव्या कोपऱ्यावर थोडेसं उंच ठेवावे. शक्यतोवर बाळाला मांडीवर दूध पाजावे. बाटली अशा तऱ्हेने धरावी की बुचामध्ये दूध भरलेलं असेल. दूध फार गरम असू नये. दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा. बाळाने ढेकर दिल्यावर त्याला झोपवावे. ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. बुचाचे छिद्र बरोबर नसल्यास ( लहान किंवा फार मोठे ) बाळाला दूध पिण्यास त्रास होतो. बुचाचं छिद्र मोठे असल्यास बाळाला ठसका लागण्याचा संभव असतो. दुधाची भरलेली बाटली जात उलटी केली तर दूध थेंबाथेंबाने गळले पाहिजे. त्याची धार लागता कामा नये.

बाटलीने दूध देताना घ्यावयाची काळजी :
उकळून थंड केलेले दूध बाटलीत घ्यावे. बाळाला कुशीत घेऊन बाटली आपल्या हातात धरून, बालकाचे डोके थोडे उचलून घेऊन दूध घालावे.
दूध पाजल्यानंतर बाटली व बुच गरम पाण्यात उकळून घ्यावे. नंतर ते ब्रशने स्वच्छ धुवून घ्यावे.

बाळाचा सुरुवातीचा वरचा आहार :
सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला वरचे दूध, भाताची पेज, वरणाचे पाणी, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी असा पातळ आहार दयावा. त्यानंतर मऊ भातामध्ये तुप, वरण किंवा भाजीचे पाणी घालून दयावे. उकडलेला बटाटा, अंड्याचा पिवळा बलक, हेही अधून मधून द्यावं. पुढे-पुढे सर्व प्रकारची फळे, भाताची-गव्हाची खीर, भाकरी, पोळी, पालेभाज्या, मोड आलेली उसळ, उकडलेले अंडे असा आहार दयावा. वर्षभरात इतरांप्रमाणे सर्व आहार बाळाला मिळाला पाहिजे. बाहेरचे पदार्थ देणे टाळावे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.