मधुमेहाची कारणे, लक्षणे, प्रकार, निदान आणि उपचार मराठी माहिती

Diabetes in Marathi, Diabetes causes, symptoms, diagnosis test, complications, Treatment and diabetes prevention in Marathi.

मधुमेह म्हणजे काय..?
Diabetes information in Marathi
डायबेटीस किंवा मधुमेहामध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.

यामुळे मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) मात्रा वाढते. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आपल्या देशातील तब्बल 7 कोटींच्या आसपासचे लोक हे मधुमेहाने त्रस्त आहेत.

शरीरातील उर्जेचा प्रमुख स्त्रोत हा ग्लुकोज आहे. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत म्हणजेच ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. ग्लुकोजमुळेच शरीराला उर्जा मिळते, शरीराची झीज भरुन काढली जाते तसेच शरीरास कार्य करण्यास या उर्जेमुळेच मदत होते. मात्र मधुमेहामध्ये ग्लुकोजचे योग्य पचन होत न झाल्याने, कोणत्याही कार्याशिवाय साखर मुत्रावाटे बाहेर टाकली जाते. यामुळे मधुमेहामध्ये ग्लुकोजचे उर्जेमध्ये रुपांतर होत नाही. आहारातील कर्बोदकांचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक अशी उर्जाही मिळत नाही.

इन्सुलिनचे कार्य कसे घडते..?
स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती झाल्यानंतर ते इन्सुलिन रक्त प्रवाहामध्ये जाते. तेथे जाऊन रक्त प्रवाहामधील साखरेला शरीरातील लाखो पेशींपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे पचन होते. रक्तातील साखरेचे पचन झाल्याने शरीराला उर्जा तर मिळतेच शिवाय रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून शरीरामध्ये इन्सुलिनचे अत्यंत महत्व असते.

मधुमेह डायबेटीस मराठीत माहिती, मधुमेह म्हणजे काय, मधुमेह होण्याची कारणे, डायबेटीसची लक्षणे, मधुमेह प्रकार, शुगर टेस्ट, मधुमेह उपचार, आयुर्वेदिक औषधे आणि मधुमेह, घरगुती उपाय माहिती, मधुमेह आहार तक्ता, काय खावे काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.

मधुमेहामध्ये शरीरात काय काय घडते..?
• स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती कमी प्रमाणात होते.
• ‎रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.
• ‎रक्तामधील साखरेची मात्रा वाढते.
• साखरेचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही.
• ‎वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.
• ‎मधुमेहाचा परिणाम रक्तवाहिन्या, किडन्या, हृदय, डोळे, मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) यावर सतत होऊ लागतो.

मधुमेहाचे प्रकार :
Diabetes types in Marathi
किती प्रकारचा असतो मधुमेह..?
मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
(1) टाइप-1 डायबिटीज
(2) टाइप-2 डायबिटीज
(3) गरोदरपणातील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज)

(1) टाइप-1 डायबिटीज –
Type 1 Diabetes in marathi
या प्रकारचे मधुमेही रुग्ण हे पुर्णपणे इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबुन असतात. म्हणून या प्रकारास इन्सुलिन डिपेन्डेंट डायबिटीज मेलिटस असेही म्हणतात. या प्रकारच्या डायबिटीजचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते. या प्रकारातील रुग्णांच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत नाही यासाठी बाहेरुन इन्सुलिन इंजेक्शनाद्वारे इन्सुलिनची गरज भागवली जाते. ह्या प्रकारातील रुग्ण मधुमेहापासून पुर्णपणे बरे होत नाहीत. रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यासाठी त्यांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. मधुमेहाचा हा प्रकार स्थायी आणि गंभीर स्वरुपाचा असतो. परिणामतः जन्मभर या मधुमेही रूग्णांना इन्सुलीनचं इंजेक्शन घ्यावेचं लागते.

(2) टाइप-2 डायबिटीज –
Type 2 diabetes in marathi
टाईप 2 प्रकारचेच रुग्ण अधिक असतात. हा प्रकारचा मधुमेह वयस्कामध्ये अधिक आढळतो. हा मधुमेह साधारणतः 30 वर्षं वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने अतिस्थुलतेमुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने हा प्रकार होतो.
या प्रकारास नॉन इन्सुलिन डिपेन्डेट डायबिटीज असे म्हणतात. टाइप-2 मधुमेहाचे बहुतांश रुग्ण हे योग्य आहार आणि नियमित व्यायाम या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. तसेच त्यांना गोळ्यांची किंवा इन्सुलिनचीही गरज भासू शकते.

(3) गरोदरपणातील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज) –
Gestational diabetes in marathi
गरोदरपणात रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास गर्भावस्थेतील मधुमेह होण्याची समस्या निर्माण होते. हा डायबेटीस प्रकार फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणाऱ्या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजे 24 ते 28 आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. यावर इन्सुलिनच्या इंजेक्शनद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
साधारण 80% गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. परंतु त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो. यासाठी त्यांनी दर सहा महिन्यांनी आपली ग्लुकोज तपासून घ्यावी. तर 20% स्त्रियांना कायमस्वरूपी मधुमेह होऊ शकतो. गरोदरपणातील मधुमेहविषयी अधिक माहिती वाचा..

प्री-डायबेटिस किंवा मधुमेहपुर्व अवस्था म्हणजे काय..?
What is prediabetes in Marathi
अनेकदा मधुमेहाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत मात्र बहुतांश रुग्णामध्ये डायबिटीज हा सुप्तावस्थेत असतो. सुप्तावस्थेत असलेल्या डायबिटीजला मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबेटिस) असे म्हणतात. मधुमेहपुर्व अवस्थेमध्ये जर रुग्णाने योग्य आहार, व्यायाम, औषधोपचारांचा अवलंब केल्यास मधुमेहापासून दूर राहता येते. मात्र मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबेटिस) असूनही अयोग्य आहार, विहाराचे अवलंब केल्यास कायमस्वरुपी मधुमेही रुग्ण होण्याचा धोका अधिक असतो.

सुप्तावस्थेतील मधुमेह लक्षणांवरून ओळखता येत नसल्यामुळे रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते. यासाठी प्रत्येकाने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा उपाशीपोटी आणि दीड ते दोन तासांनी जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण पाहावे. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण 126 मिलिग्रॅम व जेवणानंतर 200 मिलिग्रॅम पेक्षा जास्त असेल तर मधुमेह झाला आहे असे समजावे. आणि जर उपाशीपोटी 110 ते 126 मिग्रॅ व जेवणानंतर 140-200 मिलिग्रॅम या दरम्यान साखर असल्यास ती मधुमेहाची पूर्वावस्था आहे असे समजावे.

कोणकोणत्या कारणांमुळे होतो मधुमेह..?
Diabetes causes in Marathi
टाइप-1 मधुमेहाची कारणे :
टाइप-1 डायबिटीज हा प्रामुख्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे होतो.

टाइप-2 मधुमेहाची कारणे :
इन्सुलिन स्त्रावाच्या निर्मितीवर परिणाम झाल्याने हा प्रकार उद्भवतो. इन्सुलिन स्त्राव निर्मितीवर परिणाम करणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
लठ्ठपणा हे टाइप-2 मधुमेहाचे प्रमुख कारण ठरत आहे. आज वयस्कामध्ये तसेच मुलांमधील स्थुलतेमुळे इन्सुलिन निर्मितीस बाधा पोहोचून मधुमेहा होण्याचे प्रमाण वाढत आहे.
• ‎अनुवांशिकतेमुळे मधुमेह होऊ शकतो. कुटुंबातील आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण यांपैकी कुणालातरी मधुमेह असल्यास अनुवांशिकतेमुळे मधुमेह होऊ शकतो.
• ‎अयोग्य आहाराचे सेवन केल्यामुळे. जास्त कॅलरीयुक्त आहार, फास्टफूड, जंकफूड, मिठाई, बेकरीचे पदार्थ, शीतपेये, तेलकट पदार्थ यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे.
• ‎भरपेट जेवण करण्याच्या सवयीमुळे, भूक लागली नसतानाही सतत खात राहण्याच्या सवयीमुळे.
• ‎बैठी जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्ती.
• ‎व्यायामाचा अभाव.
• ‎मानसिक ताणतणाव.
• ‎ज्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह झाला असल्यास त्यांना पुढील पाच ते पंधरा वर्षांत मधुमेह होण्याची शक्यता असते.
• ‎जन्मतः 3.5 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता असते.

मधुमेहाची लक्षणे :
Diabetes symptoms in Marathi
मधुमेह हा आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येकवेळी लक्षणे दिसतीलचं असेही नाही. मधुमेहाची लक्षणे ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मधुमेहात खालील लक्षणे जाणवू शकतात.
• वारंवार लघवीला जावे लागणे,
• ‎वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
• ‎अचानकपणे वजन घटणे,
• ‎अशक्तपणा, चक्कर येणे,
• ‎अधिक भूक लागणे,
• ‎हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
• ‎डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
• ‎मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
• ‎जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे,
• ‎मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेहामध्ये जाणवू शकतात.

मधुमेहाचे निदान कसे करतात..?
Diabetes diagnosis and test in Marathi
रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून मधुमेहाचे निदान करण्यासाठी खालिल चाचण्या कराव्या लागतात.

Fasting sugar test (फास्टिंग शुगर टेस्ट) –
यामध्ये उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. ह्या चाचणीसाठी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासण्यापुर्वी किमान 8 तास उपाशी असणे गरजेचे असते.
• रक्तातील साखर 70 ते 99 mg/dL यामध्ये असल्यास नॉर्मल प्रमाण समजले जाते.
• ‎रक्तातील साखर 100 ते 126 mg/dL यामध्ये असल्यास मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबिटीज) असते.
• ‎रक्तातील साखर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.

Post Prandial test (पीपी शुगर टेस्ट) –
भोजन केल्यानंतर ही चाचणी केली जाते.
• जेवणानंतर 140 mg/dL च्या आत रक्तातील साखर असल्यास नॉर्मल प्रमाण समजावे.
• ‎जेवणानंतर 140-200 mg/dL या दरम्यान साखर असल्यास ती मधुमेहाची पूर्वावस्था आहे असे समजावे.
• ‎जेवणानंतर रक्तातील साखर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.

ग्लुकोमीटर आणि डायबेटीस :
डायबेटीसचा त्रास असल्यास साखर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. दरवेळी रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये जाणे योग्य ठरत नाही. यापेक्षा आपण घरच्याघरी ग्लुकोमीटरद्वारे शुगर तपासणी करू शकतो. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम :
Diabetes complications in Marathi
अधिक काळापर्यंत जर रक्तामध्ये साखर वाढलेल्या स्वरुपात राहिल्यास, साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास रक्तवाहिन्या, चेतासंस्था (नर्व्हस सिस्टीम) यांवर गंभीर परिणाम होतो. हृदय, डोळे, किडनी, मज्जातंतू, पाय हे अवयव मधुमेहात विशेष जपावे लागतात. याची चार प्रकारात विभागणी करता येईल.
(1) हृदय आणि मेंदूवरील परिणाम
(2) डायबेटिक नेफ्रोपॅथी
(3) डायबेटिक रेटिनोपॅथी
(4) डायबेटिक न्यूरोपॅथी

(1) हृदय आणि मेंदूवरील परिणाम –
हार्ट अटॅक येण्याचा, पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका मधुमेहामुळे वाढतो. हृद्याचे विविध विकार मधुमेहामुळे उदभवतात. उच्च रक्तदाबाची समस्या, धमनीकाठिन्यता हे विकार होतात. हृदयाशी संबंधित आजाराची शक्यता मधुमेहात दुपटीने वाढते आणि 75% मधुमेहींचा मृत्यू हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराने होतो.

(2) डायबेटिक नेफ्रोपॅथी –
मधुमेहावर योग्य उपचारांनी नियंत्रण न ठेवल्यास किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असे म्हणतात. यामुळे किडन्या निकामी होऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रांस्प्लांटेशन करण्याची गरज निर्माण होते.

(3) डायबेटिक रेटिनोपॅथी –
अनियंत्रित मधुमेहामुळे डोळ्यांची प्रचंड हानी होते त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. मधुमेहामुळे डोळ्यांचे विविध गंभीर विकार उद्भवतात. मोतीबिंदू (Cataract), काचबिंदू (Glaucoma) हे डोळ्यांचे विकार होतात. आज मधुमेह हे अंधत्व येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. बहुतांश मधुमेही रुग्णांमध्ये 15 वर्षांनंतर डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याची शक्यता असते. डोळ्यांसमोर अंधारी येणं अथवा अस्पष्ट दिसणं, डोकेदुखी, चष्म्याचा नंबर बदलणं, दृष्टी कमजोर होणं ही लक्षणे डायबेटिक रेटिनोपॅथीची आहेत. यासाठी प्रत्येक मधुमेही रुग्णाने दरवर्षी न विसरता डोळ्यांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

(4) डायबेटिक न्यूरोपॅथी –
मधुमेहाच्या दुष्परिणामामुळे नाड्या प्रभावित होतात. त्यामुळे डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर हे विकार उद्भवतात. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये शरीरातील मज्जातंतूंची हानी होते त्यामुळे स्नायूंची ताकद कमी होते, हातापायात बधिरपणा, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, वेदना होतात, मूत्रविसर्जनावर ताबा राहत नाही. संवेदना कमी झाल्यामुळे पायाचे अल्सर होऊ शकतात, जे बरे व्हायला त्रासदायक असतात. कित्येक वेळा पाय गमवायचीसुद्धा वेळ येऊ शकते.

म्हणजे मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास हे दुष्परिणाम भोगावे लागतील..
हार्ट अटॅक येणे.
• ‎धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब समस्या निर्माण होते.
• ‎हृदयाचे विविध विकार होतात.
‎पक्षाघात (स्ट्रोक) येणे.
• ‎अंधत्व येणे.
• ‎मधुमेहामुळे डोळ्यांचे विविध गंभीर विकार उद्भवतात.
• ‎किडन्या निकामी होतात.
• ‎डायबेटिक न्यूरोपॅथी होऊन पाय गमावणे, हातापायाची शक्ती कमी होणे.

हे गंभीर परिणाम मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्याने होतात. त्यासाठी प्रत्येकाने नियमित रक्तातील साखरेची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह असल्यास तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत. जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रताणात राहून वरील गंभीर दुष्परिणामापासून दूर राहता येईल.

मधुमेह उपचार मार्गदर्शन :
Diabetes Treatment in Marathi
मधुमेहावरील उपचाराचे चार प्रमुख उद्देश आहेत –
• रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे.
• ‎डायबिटीजच्या दुष्परिणामापासून रुग्णाचा बचाव करणे.
• ‎वजन आटोक्यात ठेवणे.
• ‎उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे विकार होऊ न देणे यासाठी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे.

योग्य आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचारामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी मधुमेही रुग्णांनी त्यांचे आहार, व्यायाम आणि उपचारांचे नियोजन पुढीलप्रमाणे ठेवावे.

(1) मधुमेही रुग्णांसाठी आहार नियोजन –
Diabetes Diet plan in marathi
मधुमेही रुग्णांनी कोणता आहार घ्यावा..?
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणता आहार घ्यावा, कोणता घेऊ नये यासाठीचे डायट चार्ट बनवून घ्यावे.
• ‎डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा.
• ‎वेळेवर आहार न घेतल्यास मधुमेही रुग्णांमध्ये ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता असते. यासाठी आहाराच्या वेळा पाळणे मधुमेहींसाठी अत्यंत गरजेचे असते.
• ‎मधुमेही रुग्णांनी दर चार तासांनी थोडे-थोडे खाणे आवश्यक असते. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा.
• ‎कमी कॅलरीजचा आहार घ्यावा. आहारात गरजेपेक्षा जास्त उष्मांक असल्यास त्यांचं रूपांतर चरबीत होते. यामुळे लठ्ठपणा होऊन इन्सुलिन निर्मितीस बाधा येते.
• ‎हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ती मधुमेहामध्ये जास्त उपयुक्त ठरतात.
• ‎मधुमेही रुग्णांनी साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, रताळी इ.), जास्त गोड फळे (आंबा, फणस, चिक्कू, केळी इ.) आणि खारट पदार्थ खाऊ नयेत.

(2) मधुमेह आणि व्यायाम –
Diabetes and Excercise workout tips in Marathi
• डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम नियमितपणे करावा.
• ‎नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
• ‎व्यायामामध्ये चालणे, पळणे (जॉगिंग), सायकलिंग यासारखे व्यायाम करू शकता.
• ‎दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
• ‎व्यायाम करताना शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
• ‎व्यायामामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
• ‎रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
• ‎सततची बैठी जीवनशैली टाळावी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे.
• ‎मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
• ‎धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

(3) मधुमेह उपचार माहिती –
Treatment and Diabetes control management in marathi
• मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.
• ‎स्वतःच्या स्वतः ऐकीव माहितीवर किंवा जाहिरात पाहून घरगुती उपाय करत बसू नका.
• ‎मधुमेहावरील उपचारासाठी आपले डॉक्टर रुग्णाची प्रकृती, मधुमेहाचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण विचारात घेऊन मधुमेहावरील गोळ्या किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन देतील.
• ‎डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्यावीत.
• ‎नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
• ‎डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..?
Diabetes prevention tips in Marathi
टाईप 1 डायबिटीजवर प्रतिबंध करता येत नाही. तर टाईप 2 डायबिटीज होण्यापासून प्रतिबंधात्मक उपायांद्वारे दूर राहता येते. यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते.
• संतुलित आहाराचा घ्यावा.
• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा समावेश अधिक असावा. यामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह, हार्ट अटॅक, पक्षाघात, कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत होते.
• ‎आहारावर नियंत्रण ठेवावे. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा. तीन वेळा थोडे थोडे जेवण करावे. त्यामुळे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होईल.
• ‎साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, बिट, रताळी इ.), आणि खारट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
• ‎वजन आटोक्यात ठेवावे. वजन आटोक्यात कसे ठेवावे हे जाणून घ्या..
• ‎नियमित व्यायाम करावा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, मैदानी खेळ, योगासने यासारखे व्यायाम करावेत.
• ‎शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे, बैठ्या जीवनशैलीपासून दूर राहा. लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
• ‎रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
• ‎मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
• ‎धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
• ‎सुप्तावस्थेतील मधुमेह लक्षणांवरून ओळखता येत नसल्यामुळे रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते. यासाठी प्रत्येकाने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
• ‎मधुमेहाची आनुवंशिकता असल्यास अधिक जागरूक राहावे.
• ‎डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
म्हणजेचं योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी यांची आदर्श जीवनशैली आयुष्यभर आचरणात आणल्यास मधुमेह होण्यापासून निश्चितच दूर राहता येईल.

मधुमेहसंबंधित खालील आजारांचीही माहिती वाचा..
हार्ट अटॅक मराठीत माहिती
पक्षाघात, लकवा
किडन्या निकामी होणे
उच्च रक्तदाब माहिती व उपचार

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

Diabetes upay, Madhumeha lakshane, karane, upchar, nidan marathi mahiti, Madhumeha in Marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.