केसातील कोंडा – Dandruff :
केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकजण यामुळे त्रस्त असतात. केसातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक गळूही लागतात. त्यामुळे केसातील कोंडा कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी येथे केसातील कोंडा निघून जाण्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले आहेत.
केसातील कोंडा घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
लिंबाचा रस –
केसातील कोंडा जाण्याकरिता लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. यासाठी खोबरेल तेलात थोडा लिंबाचा रस घालावा. हे तेल केसांना लावून मालिश करावी आणि थोड्यावेळाने केस चांगले धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता.
दही –
केसातील कोंडा घालवण्यासाठी दह्याचा वापर करणेही फायदेशीर असते. एक कप दह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळावा. हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी लावावा. काही दिवसातच केसातील कोंडा निघून गेलेला दिसेल.
कडुलिंब आणि तुळस –
कडुलिंब आणि तुळसची पाने पाण्यात घालून ते पाणी चांगले उकळावे. निम्मे पाणी शिल्लक राहिल्यावर ते पाणी गाळून घ्या व थंड होऊ द्या. नंतर या पाण्याने आपले केस धुवा. हा घरगुती उपायसुद्धा केसातील कोंडा घालवण्याचे कार्य करतो.
मेथीच्या बिया –
एक चमचा मेथीच्या बिया बारीक वाटून घ्याव्यात. दोन कप गरम पाण्यात त्या बारीक केलेल्या बिया घालाव्यात व रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करून अंघोळीपूर्वी केसांना लावावे व 20 मिनिटानंतर आंघोळ करताना केस धुवावेत.
मुलतानी माती –
एक कप मुलतानी मातीत थोडे पाणी घालून पेस्ट बनवावी व त्यात 2 ते 3 चमचे लिंबू रस घालावे. हा लेप केसांच्या मुळांना लावावा व 20 मिनिटांनी हर्बल शॅम्पूचा वापर करून केस धुवावेत. ह्यामुळेही केसात असलेला कोंडा निघून जाण्यास मदत होईल.
कोरपडीचा गर –
अंघोळ करण्यापूर्वी 15 मिनिटे आधी केसांच्या मुळांना एलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत. या घरगुती उपयानेही केसातील कोंडा निघून जातो.
हे सुद्धा वाचा..
केस घनदाट होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.