बद्धकोष्ठता – कारणे, लक्षणे आणि उपचार

10665
views

बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते.

बद्धकोष्ठता लक्षणे :

 • बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे अनियमित मलविसर्जन. कधी कधी दोन-तीन दिवस शौचास न होणे.
 • शौचास होताना त्रास होणे, कधी कधी गाठ किंवा खडा तयार होऊन रोग्याला शौचास जोर द्यावा लागतो.
 • पोट गच्च होणे, सतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे, तोंडाचा उग्र वास येणे, छातीवर दाब पडण्यासारखा वाटणे, डोके दुखणे, अस्वस्थता, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे,
 • मानसिक ताण-तणाव वाढून रुग्ण चिडचिडा होतो.

बद्धकोष्ठतेची कारणे :
पचनशक्तीच्या कार्यामध्ये झालेला बिघाड यापासून हा रोग होतो.
बैठे काम किंवा सेडेंटरी लाईफ स्टाईल या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.

अयोग्य आहारामुळे होते बद्धकोष्ठता –
मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते.

चुकिच्या सवयीमुळे होते बद्धकोष्ठता –
शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.

हे करा..

 • नेहमी अन्न चावून बारीक करून खावे.
 • पाणी भरपूर प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या.
 • साधा आणि नैसर्गिक आहार हाच बद्धकोष्ठतेवरचा उत्तम उपचार आहे.
 • भरपूर ताजी फळे, सर्व प्रकारच्या फळभाज्या, तसेच पालेभाज्या, कोशिंबीर, दही, ताक यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ ठेवण्यास मदत करते.
 • नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
  बैठा व्यवसाय असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू बळकट होतात आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
 • तळलेले, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ टाळावेत.
 • गडबडीत, पटपट खाणे टाळावे.
 • सर्व प्रकारची व्यसने टाळावीत.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.