गरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Pregnancy problems and solutions in Marathi, how to care in pregnancy in Marathi.

गरोदरपणात अॅनेमिया (रक्त पांढरी) होणे :

रक्तातील लोह, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असे घडते. गरोदर स्त्रियांमध्ये अॅनेमियाचे बरेच प्रमाण दिसून येते. म्हणूनच त्यासाठी लोहाच्या, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. प्रत्येक गरोदर स्त्रीने निदान 100 दिवस तरी लोहाच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत म्हणजे अॅनेमियाचा धोका टाळता येतो.

बाळाच्या आरोग्यासाठी लागणारे लोह आईच्या रक्तातूनच मिळते. दोघांपुरते लोह आईला मिळाले नाही, तर तिचे रक्त फिक्के पडते. जीभ, नख, डोळे तपासल्यास ही रक्त पांढरी ओळखता येते. अॅनेमियामुळे खूप थकल्यासारखे वाटते, अशक्तपणा येतो, हात पाय दुखतात. यावर उपाय म्हणून लोहाच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. लोहाची गोळी घेतल्यास लोहाची कमतरता भरून निघून आई व बाळाला योग्य प्रमाणात लोह मिळेल. या लोहाच्या गोळ्या प्रत्येक आरोग्याच्या ठिकाणी आणि रुग्णालयात उपलब्ध असतात. बाळंतपणानंतरही 2-3 महिने या गोळ्या चालू ठेवाव्यात.

नाचणी, बाजरी, डाळी, मांस, गुळ व हिरव्या पालेभाज्या, फळे यात लोह असते त्यामुळे हे पदार्थ गरोदरपणात भरपूर खावेत. लोखंडी कढईचा दररोजचे जेवण बनविण्याकरीता वापर केला तर त्याद्वारेही जास्त प्रमाणात लोह मिळते. अशा प्रकारचे घरगुती उपाय देखील महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गरोदरपणात पाय व कंबर दुखणे :
आईच्या जेवणात कॅल्शियमची कमतरता असल्यास गरोदरपणात कंबर दुखणे, पाय दुखणे या समस्या होतात. दुध व दुग्धजन्य पदार्थ यांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यासाठी गरोदर स्त्रियांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, कडधान्ये इत्यादी कॅल्शियमयुक्त आहार घेतला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्याव्यात. या गोळ्या बाळंतपणानंतरही 6 महिने चालू ठेवाव्यात. कंबरदुखी, पाय दुखीकडे बऱ्याचदा स्त्रिया दुर्लक्ष करतात. कामामुळे झाले असेल अशी समजूत करून घेतात. परंतु गरोदरपणात मात्र अशी चूक करू नये. कारण त्याचा परिणाम बाळावर होत असतो.

गरोदरपणातील पायाच्या समस्या :
गरोदरपणात स्त्रियांचे वजन वाढते. या काळात वाढलेल्या वजनाचा भार हा त्यांच्या पायावर पडत असतो. म्हणूनच या प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना पायाच्या तक्रारी होऊ शकतात. पायाच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाय दुखणे, पायावर सूज येणे, पाय जड वाटणे, पाय आखडणे, पायात गोळा येणे वैगरे समस्या असतात. प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना पायातील शिरांमध्ये रक्त जमा होऊन त्या शिरा फुगतात आणि व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही होत असतो. अशावेळी मांडीवर, पायावर निळ्या रंगाच्या शिरा दिसू लागतात. यासाठी पायाच्या समस्यावर खालील उपाय करावेत,
• गरोदरपणातही शरीराला, पायांना योग्य व्यायाम आवश्यक असतो. आपल्या डॉक्टरांनी दिलेला हलका व्यायाम करावा. नियमित चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे असते.
• अधिक वेळ उभे राहणे टाळावे. त्यामुळे पायांवर जास्त ताण येणार नाही. तसेच बराच वेळ खुर्चीत बसून पाय खाली लोंबकळत ठेवू नका.
• कामाच्या ठिकाणी खुर्चीत बसणे आवश्यक असते अशावेळी सतत खुर्चीत बसण्याऐवजी अधूनमधून थोडे फिरावे.
• रात्री झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपावी.
• पायात गोळे येत असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• पायांना अचानक सूज येणे, पाय जास्त दुखत असल्यास दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदरपणात पायाला सूज येणे व उपाय :
गरोदरपणात रक्तदाब वाढल्यामुळे अशी सूज येऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास बाळ व आईच्या जीवाला धोका पोहचू शकतो. म्हणून शेवटच्या 4 महिन्यात रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
• पौष्टिक आहार घ्यावा. पायावर सूज येत असेल तर आहारातून मीठ कमी खावे.
• वारंवार चहा, कॉपी पिणे टाळावे.
• पोटेशियममुळे सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी केळी खाऊ शकता. केळ्यांत पोटेशियम मुबलक प्रमाणात असते.
• पुरेसे पाणी प्यावे. साधारण दिवसातून आठ ग्लास पाणी प्यावे त्यामुळे लघवीवाटे शरीरातील अनावश्यक घटक दूर होतात आणि सूज कमी होण्यास मदत होते.
• अचानक पायावर सूज येणे, ब्लड क्लॉट, उलटी होणे, चक्कर, तीव्र डोकेदुखी, मान दुखणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. वरील लक्षणे धोकादायक असून ती प्रीक्लैम्प्सिआ संबंधित असू शकतात.

गरोदरपणात पोटात दुखणे :
गरोदरपणात पोटात दुखणे ही सामान्य समस्या असली तरीही अनेकदा काळजीचे कारण असू शकते. गरोदरपणातील पोटदुखी ही अपचन, एक्टॉपिक प्रेगन्सी ते गर्भपात या कारणासंबंधित असू शकते.
पहिल्या तीन महिन्यात पोट दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते. प्रामुख्याने गर्भाची होणारी वाढ, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता), ऍसिडिटी यामुळे पहिल्या तिमाहीत पोटात दुखत असते. अशावेळी फारशी काळजी करण्याचे कारण नसते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत होणारी पोटदुखी ही काळजीचे कारण असते. तिसऱ्या तिमाहीत पोटातील खालचे स्नायु आकुंचन व प्रसरण पावल्याने अचानक वरचेवर पोटातुन कळा येत असतात. तसेच हाय ब्लडप्रेशरमुळे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या Preeclampsia या गंभीर अवस्थेमुळेही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

पोटदुखीसोबत कोणती लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे..?
• जर पोटदुखीमध्ये मासिक पाळीप्रमाणे गरोदरपणात रक्तस्त्राव होणे, वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे. कारण ही लक्षणे मिसकॅरेज (गर्भपात) संबंधित असू शकतात.
• याचप्रमाणे प्रेगन्सीच्या सहा ते दहा आठवड्यामध्ये पोटदुखी आणि स्पॉटींग किंवा ब्लीडिंग असल्यास ते एक्टॉपिक प्रेगन्सी किंवा ट्युबमध्ये गर्भधारणा झाल्याचे लक्षण आहे. अशावेळीही तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
• कधीकधी 37 आठवडे होण्याआधीच ओटीपोट ताणले जाते व पोटदुखी होऊन प्रीटर्म लेबरची (वेळेआधीच प्रसूती) लक्षणे जाणवतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
• नाळ गर्भाशयापासून सुटून वेगळी झाल्यानेही प्रेग्नन्सीमध्ये जोरात पोटदुखी होऊ शकते. त्या नाळेद्वारेच गर्भाशयातील बाळाचे पोषण होत असते त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
• मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्याने म्हणजेचं UTI मुळेही पोटदुखी होऊ शकते. पोटदुखीसोबत लघवीला जळजळ होणे, आग होणे ही लक्षणे अशावेळी असू शकतात. मूत्रमार्गातील इन्फेक्शन गर्भाशयाकडे पसरू नये यासाठी अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या :
प्रेग्नन्सीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होते. हाय ब्लडप्रेशरचा प्रतिकूल परिणाम आई व बाळावर होऊ शकतो. रक्तदाब वाढल्यामुळे आईला झटके येणे, किडनी निकामी होणे, अतिरक्तस्राव होणे, गर्भाशयापासून गर्भवार (नाळ) वेगळी होणे, गर्भाच्या वाढीवर परिणाम होणे, वेळेआधीच बाळाचा जन्म होणे, सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागू शकते, मृत बाळ जन्माला येणे या समस्या यांमुळे होऊ शकतात. गरोदर स्त्रीमध्ये उच्च रक्तदाबामुळे प्रीएक्लप्मेशिया हा गंभीर आजार उद्भवू शकतो. प्रीएक्लप्मेशियामुळे बाळामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्याविषयी अधिक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरोदरपणातील मधुमेह (डायबेटीस) समस्या :
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात गरोदरपणातील मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाच्या प्रकारास Gestational Diabetes असे म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये साखर वाढलेली असल्यास आई व बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणातील मधुमेह समस्येविषयी अधिक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

प्रेग्नन्सी संबंधित मराठीत उपयुक्त माहिती देणारे खालील लेखही वाचा..
‎कसा असावा गरोदरपणातील आहार
‎गरोदरपणात कोणत्या तपासण्या कराव्या लागतात
‎गर्भाची वाढ कशी होते ते जाणून घ्या
‎कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..?
‎प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्स मराठीत
‎गरोदरपणातील काळजी कशी घ्यावी
‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..

Common pregnancy problems and solutions in Marathi. common pregnancy health problems, including constipation, sickness, headaches, cramp, pelvic pain, and vaginal discharge and bleeding, Anemia in pregnancy,