केसतोड – Boils in Marathi :

केसतोड ही त्वचासंबंधीत एक समस्या आहे. यामध्ये त्वचेवर लालसर रंगाचा फोड येत असतो. फोड आलेल्या ठिकाणी काही दिवस अतिशय वेदना जाणवत असतात. या त्रासाला मराठीत केसतोडा तर हिंदीत बालतोड़ व english मध्ये Boils ह्या नावाने ओळखले जाते. केसतोड वर कोणते उपाय करावे याची माहिती येथे दिली आहे.

केसतोडा कारणे – Causes of Boils in Marathi :

  • स्टेफिलोकोकस ऑरियस (staphylococcus aureus) बैक्टीरियाचे हेअर फॉलिकलमध्ये इन्फेक्शन झाल्याने,
  • डायबेटीस रुग्ण,
  • रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने,
  • त्वचेची काळजी व स्वच्छता न ठेवणे यामुळे त्वचेवर केसतोडा होत असतो.

केसतोडाची लक्षणे – Boils symptoms :

साधारणपणे केसतोड हे शरीराच्या खांदा, मान, पाठ, पाय, जांघेत होत असतात. केसतोडा मध्ये त्वचेवर लालसर फोड येतो. फोड आलेल्याठिकाणी असह्य वेदना होतात. फोडाजवळ सूज असते.

फोड आलेल्या ठिकाणी काही दिवसांनी पु धरत असतो. हे फोड नखांनी फोडू नयेत कारण त्यातील इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरून दुसऱ्या ठिकाणी फोड येत असतात. काही लोकांना किसतोड आल्यावर ताप व अंगदुखी यासारख्या समस्याही होत असतात. साधारण चार ते पाच दिवसात किसतोड चा रंग पांढरट होऊन आलेली गाठ कमी होते.

केसतोड वर घरगुती उपाय हे आहेत :

केसतोड आलेल्या ठिकाणी गरम पाण्याचा शेक देणे, तेथे हळदीचा लेप लावणे किंवा लसूण पेस्ट लावणे किंवा एरंडेल तेल लावणे हे आयुर्वेदीक घरगुती उपाय केसतोडवर उपयुक्त ठरतात.

गरम पाण्याचा शेक –
केसतोडची समस्या झाल्यास गरम पाण्याच्या पिशवीने फोड आलेल्या ठिकाणी थोडावेळ शेक घ्यावा. या उपायांमुळे केसतोडावर आराम मिळतो तसेच वेदना व सूज कमी होण्यास मदत होते.

हळद –
चमचाभर हळदीत थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट किसतोड वर लावावी. हळदीतील आयुर्वेदिक आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे केसतोड समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.

लसूण –
लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्यांची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसतोडा वर लावावी. 15 मिनिटांनी पाण्याने त्याठिकाणी पुसून घ्यावे. केसतोड कमी होण्यास या उपायामुळे मदत होते.

कांदा व मध –
कांदा बारीक चिरून कांद्याची पेस्ट करून त्यात थोडे मध घालावे. ही पेस्ट केसतोड वर लावावी. 15 मिनिटांनी पाण्याने त्याठिकाणी पुसून घ्यावे. यामुळेही केसतोड बरी होण्यास मदत होते.

एरंडेल तेल –
एरंडेल तेलात कापसाचा बोळा भिजवून तो बोळा फोड आलेल्या ठिकाणी काहीवेळ ठेवावा. एरंडेल तेलात असणाऱ्या अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे केसतोड समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.

किसतोड आल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

घरगुती उपाय करूनही किसतोड समस्या कमी न झाल्यास डॉक्टरांकडे जावे. तसेच जर आपणास डायबेटीस असेल तर डॉक्टरांकडून यावर उपचार घ्यावेत.

अनेक लोकांना वरचेवर केसतोडाची समस्या होत असते. वर्षभरात 3 पेक्षा जास्तवेळा केसतोड आल्यास त्याला recurrent furunculosis असे म्हणतात. यावर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक असते.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
अंगावर पित्त उठणे याची कारणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Home Remedies for Boils in Marathi.