गिलोय वनस्पतीचे मराठीतील नाव व अर्थ :

गिलोय ही अनेक रोगांवर प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गिलोय याचा मराठी अर्थ गुळवेल असा आहे तर आयुर्वेदात गिलोयला गुडुची (Tinospora Cordifolia) असे नाव आहे. गुडुचीचे आयुर्वेदिक औषधामध्ये असाधारण महत्व आहे.

यातील उपयुक्त गुणांमुळे आयुर्वेदात या वनस्पतीला ‘अमृता’ असेही नाव देण्यात आले आहे. गुडुचीमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. त्यामुळेच गिलोय ही आपल्याला बर्‍याच मोठ्या आजारांपासून दूर ठेवते. याठिकाणी गिलोय खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

गुळवेल कसा ओळखावा..?

गिलोय किंवा गुळवेल ही वेल असून त्याची पाने विड्याच्या पानांच्या आकरासारखी असतात. याला पिवळ्या आणि हिरव्या रंगाची फुले गुच्छामध्ये येतात. औषधांसाठी गुडुचीच्या कांड व मुळांचा प्राधान्याने वापर केला जातो. गुळवेलीच्या कांड व मुळांपासून गुळवेल चूर्ण (गुडुची चूर्ण) केले जाते. कडुलिंबाच्या झाडावर चढलेली गुडुचीची वेल आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.

गुळवेल चा काढा कसा बनवावा..?

दोन कप पाणी एका भांड्यात घेऊन त्यात एक चमचा गुळवेल चूर्ण (म्हणजेच गुडुची चूर्ण) घालावे. हे मिश्रण मंद आचेवर उकळत ठेवावे. अधिक गुणकारी काढा होण्यासाठी यात आपण थोडीशी हळद, मिरी, आले घालू शकता. हे सर्व मिश्रण चांगले उकळू द्यावे.

त्यानंतर हा गुळवेल काढा थोडा थंड झाल्यावर सेवन करावा. अशाप्रकारे गुळवेलचा काढा तयार करावा. गुळवेलचा काढा चवीला कडू लागतो मात्र आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा आहे. गुडुची चूर्ण हे आपणास ऑनलाइन किंवा जवळच्या आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते.

गुळवेल चूर्ण खाण्याचे फायदे – Giloy benefits in Marathi :

रोग प्रतिकारशक्ती वाढवते –

गिलोय ही इम्यूनिटी बूस्टर म्हणूनही ओळखले जाते.  रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी गुळवेल खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी आणि Immune system मजबूत करण्यासाठी गिलोयचा वापर फायदेशीर आहे. यासाठी आपण दररोज गुळवेल चूर्ण किंवा गुळवेलचा काढा सेवन करून याचा फायदा मिळवू शकता.

संधिवात रुग्णांसाठी फायदेशीर –

गिलोयमध्ये सांध्यातील सूज व वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे गुळवेल ही संधिवात, वातरक्त अशा आजारात फायदेशीर ठरते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी नियमित गुळवेलचा काढा सेवन करावा.

डायबिटीस कंट्रोल करते –

गिलोय ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुपचं गुणकारी असल्याचे सिद्ध झालेले आहे. विशेषतः टाइप-2 प्रकारच्या मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर असते. गिलोय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते त्याबरोबरच शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवण्यासही मदत करते.

कफाचे आजार कमी करते –

श्वसनाशी संबंधित दमा, सर्दी, खोकला यासारखे कफाचे आजार दूर ठेवण्यासाठी गिलोयचे सेवन उपयोगी असते. यावेळी, आपण गिलोय चूर्ण किंवा गुळवेलीचा काढा करून पिल्यास या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते.

पाचक प्रणाली मजबूत करते –

गिलोय ही रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच आपली पाचक प्रणालीही मजबूत करते. गिलोयचे दररोज सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पोटातील समस्यांपासून मुक्तता मिळते. 

तापावर गुणकारी – 

आयुर्वेदात गिलोयचा वापर हा प्रामुख्याने तापामध्ये केला जातो. बदलत्या हवामानामुळे येणारे ताप, व्हायरल ताप किंवा डेंग्यू, स्वाइन फ्लू, मलेरियाचा ताप यामध्ये गिलोय प्रभावी कार्य करते.

तणावापासून मुक्तता –

आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात सर्वांवरच अनेकदा मानसिक ताण येत असतो. मात्र गिलोयच्या सेवनाने ताण कमी होण्यास मदत करते. गिलोयमध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे आपले मन शांत राहते आणि तणाव कमी करते. 

गिलोय ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच ताप, सर्दी व खोकला यांना रोखत असल्याने सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात गिलोय फायदेशीर ठरत आहे.

गिलोयचे तोटे व नुकसान –

आरोग्यासाठी गिलोयचे खुपचं फायदे असतात. त्यामानाने गिलोयचे तोटे व नुकसान खुपचं कमी आहेत. गिलोय ही आयुर्वेदिक औषधी आहे. त्यामुळे याचा वापर आयुर्वेदतज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने करावा. योग्य मात्रेत गिलोयचा वापर करणे आवश्यक असते. जर दररोज गिलोयचे चूर्ण खाण्यामुळे किंवा गुळवेलचा काढा पिण्यामुळे तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती स्त्रियांनी याचे सेवन करू नये.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
जवस खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about Health benefits and Meaning of Giloy in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.