पहिल्या महिन्यात गर्भपात होण्याची कारणे घ्यावयाची काळजी

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Abortion in First month of pregnancy Marathi information.

गरोदरपणाचा पहिला महिना आणि गर्भपाताचा धोका :

गरोदरपणात गर्भवती स्त्रीच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. कारण योग्य काळजीअभावी गर्भपात होण्याचा धोकाही वाढत असतो. अशावेळी पोटातील बाळ आणि माता या दोघांच्याही जिवाला धोका पोहोचू शकतो. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात गर्भाचे स्वरूप हे सर्वात जास्त अस्थिर असल्याने, या महिन्यात गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो.

पहिल्या महिन्यात गर्भपात होण्याची कारणे :

प्रामुख्याने होर्मोन्सच्या कमतरतेमुळे, रक्तातील दोषांमुळे, गर्भाशयाच्या रचनादोषामुळे, योग्य काळजीआभावी, औषधांच्या दुष्परिणामांमुळे आणि काही आजारांच्या संसर्गामुळेसुद्धा पहिल्या तीन महिन्यात गर्भपात होतो.

गर्भपात होण्याचा जास्त धोका हा गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात सर्वात जास्त असतो. गर्भपाताच्या बाबतीत योनीतून होणारा रक्तस्त्राव (ब्लीडींग) हे याचे प्रमुख लक्षण असते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

योनीतून रक्तस्त्राव होणे व गर्भपात :

साधारणपणे 20% ते 30% पर्यंत गरोदर स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यात योनीतून रक्तस्त्राव होत असतो. या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. काहीवेळा गरोदरपणात योनीतून रक्तस्त्राव होणे हे धोकादायक लक्षणही ठरू शकते. ह्यामुळे गर्भस्त्रावही होऊ शकतो. अशावेळेस आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाची तपासणी व उपचार करून घेणे गरजेचे असते.

योनीतून रक्तस्राव होत असल्यास गरोदर स्त्रीने विश्रांती घ्यावी, लैंगिक संबंध (सेक्स) टाळावे, जड वस्तू उचलू नयेत इ. सूचनांचे पालन करावे.

गर्भपात टाळण्यासाठी काय करावे..?

• गरोदर असल्याचे निश्चित झाल्यावर आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून निदान तपासणी करून घ्या.
• गर्भपाताच्या संभाव्य कारणे असल्यास तपासणी करून आपले डॉक्टर आपल्यासाठी योग्य तो औषधोपचार सुरू करतात.
• जर मागच्या वेळेस पहिल्या तीन महिन्यात रक्तस्राव होऊन गर्भपात झालेला असल्यास स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या करून त्यानुसार उपचार करून घ्यावेत.
• आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधे घ्या.
• गरोदर होण्यापूर्वी घेत असलेल्या डायबेटीस, ब्लडप्रेशर, थायरॉईड, वेदनाशामक अशा सर्व औषधांची कल्पना आपल्या डॉक्टरांना द्या.
• योग्य व संतुलित आहार घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्या.
• गरोदरपणात उपवास करू नका.
• बाहेरील उघड्यावरील माश्या बसलेले दूषित पदार्थ, चायनीज फास्टफूड, अर्धवट शिजलेले अन्न, शिळे अन्न खाणे टाळावे.
• थकवा आणणारी, जास्त कष्टाची कामे करणे, जड वस्तू उचलणे टाळावे. घरातील हलकी कामे करावीत.
• थकवा वाटत असल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी.
• जागरण करणे टाळावे. झोपेच्या वेळा नियमित असाव्यात. दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घ्यावी.
• मानसिक ताण, दगदग करू नये.
• डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत. सोपी योगासने व चालण्याचा व्यायाम करावा.
• दूरचा प्रवास करू नये. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.
• इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा.
• गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाल्यास लैंगिक संबंध (सेक्स) करणे शकतो टाळावेत.

One month pregnancy bleeding natural abortion problem Marathi information.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.