गरोदरपणातील दुसरा महिना – लक्षणे, आहार, तपासणी व काळजी

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Pregnancy second month Tips, 2nd month pregnancy in marathi.

गरोदरपणातील दुसरा महिना :

एखादी स्त्री गरोदर असल्याची निश्चिती पहिल्या महिन्यात होणे थोडे अवघड असते. त्यामुळे दुसऱ्या महिन्यात, गरोदर असल्याचे निश्चित निदान करता येते. मासिक पाळी चुकल्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यात गरोदर असल्याचे निश्चित निदान होते. दोन महिन्यांची गरोदर असताना हार्मोन्समधील बदलामुळे त्या स्त्रीमध्ये काळजी, भिती, आनंद किंवा उत्साह अशा संमिश्र भावना जाणवत असतात.

दुसऱ्या महिन्यातील गर्भाचा विकास : 

गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात, गर्भाचे तोंड, जीभ, नाक व कान यासारखे चेहऱ्याची वैशिष्ट्ये विकसित होत असतात. गर्भाच्या पापण्या जवळजवळ बंद होतात आणि पुढील कित्येक महिन्यांपर्यंत उघडत नाहीत. 

तसेच या महिन्यात गर्भ हा गर्भाशयातील कोणत्या भागात रुजला आहे, ते सोनोग्राफीने समजू शकते. त्यानुसार, पुढे निर्माण होणाऱ्या नाळेची (प्लेसेंटाची) जागा कळू शकते. त्यानुसार गर्भिणीला विशिष्ट काय काळजी घ्यायची आहे ते सांगता येऊ शकते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसऱ्या महिन्यात गरोदर स्त्रीमध्ये होणारे परिणाम :

दुसऱ्या महिन्यात काही स्त्रियांना उलटी, मळमळ होणे, चक्कर येणे, जास्त तहान लागणे, थकवा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, भूक कमी किंवा जास्त प्रमाणात लागणे, सतत झोप येणे, अशी लक्षणे दिसतात. गरोदरपणात ही लक्षणे स्वाभाविकचं असून थोडीफार औषधे व विश्रांती घेतल्यावर ही लक्षणे कमी होतात.

गरोदरपणात दुसऱ्या महिन्यात खालील लक्षणे जाणवू शकतात.
• गर्भवतीचा मूड बदलत राहणे,
• मॉर्निंग सिकनेस किंवा सकाळी उटल्यावर मळमळ व उलटी होणे,
• अन्न खाण्याची इच्छा न होणे,
• हात व पायांत थोडी सूज येणे,
• छातीत जळजळ आणि अपचन होणे,
• पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
• पोटात गॅस होणे, पोटफुगी होणे,
• थकवा जाणवणे, चक्कर येणे.

यासारखी लक्षणे 2 महिन्याच्या गर्भवतीमध्ये जाणवू शकतात. दुसऱ्या महिन्यात भुकेवर परिणाम होत असल्याने व उलटी सारखे त्रास होत असल्याने गरोदर असूनही वजन मात्र फारसे वाढलेले दिसत नाही. क्वचित प्रसंगी वजन कमी झालेलेही दिसते. तसेच काही वेळेस रक्तदाबही कमी झालेला दिसतो. त्यामुळेच अशक्तपणा वाटणे, चक्कर येणे ही लक्षणे असतात. तर काही वेळेस ओटीपोटात ओढल्याप्रमाणे दुखणे असेही लक्षण जाणवू शकते.

दुसऱ्या महिन्यातील आहार –

गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यातही ताजा व संतुलित आहार घ्यावा. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. आहारात पोळी, भात, डाळी, भाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. गरोदरपणात शरीराला ताकद देणारे प्रोटिन्सयुक्त पदार्थही आहारात असणे आवश्यक असते. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मटण, मासे, चिकन यांचा समावेश करावा.

आहारात आयोडिनयुक्त मीठचं वापरावे. आयोडिनमुळे बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते. मात्र मीठ अधिक प्रमाणात खाणे टाळावे. इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे. तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत. शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.

दुसऱ्या महिन्यातील औषधे –

आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या फोलिक अॅसिड यासारख्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात. ताप येणे, पोटदुखी, योनितून रक्तस्त्राव इत्यादि लक्षणे असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच जर मागच्या वेळेस पहिल्या तीन महिन्यात रक्तस्राव होऊन गर्भपात झालेला असल्यास स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या करून त्यानुसार उपचार करून घ्यावेत.

दुसऱ्या महिन्यातील तपासण्या व टेस्ट –

दुसऱ्या महिन्यात सोनोग्राफी तपासणी, रक्तगट, हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, लघवीची तपासणी, HIV टेस्ट, Hepatitis B या तपासण्या करणे जरुरीचे असते.

दुसऱ्या महिन्यातील महत्त्वाच्या सूचना –

दुसऱ्या महिन्यात गर्भाचे स्वरूप हे अस्थिर असल्याने, जास्त काळजी घ्यावी लागते.
• ताजा व संतुलित आहार घ्यावा.
• एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा.
• इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.
• तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत.
• जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत.
• जड वस्तू उचलू नयेत.
• लैंगिक संबंध (सेक्स) करणे शकतो टाळावेत.
• दूरचा प्रवास करू नये. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.
• मानसिक ताण, दगदग, जागरण करू नये.
• इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा.
• डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.

दुसऱ्या महिन्यात जाणवणाऱ्या समस्या :

मॉर्निंग सिकनेस व त्यावर उपाय – 
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात सकाळच्या वेळेस मळमळ आणि उलट्या होण्याची समस्या होत असते. गरोदरपणात होणारी ही एक सामान्य समस्या असून याला ‘मॉर्निंग सिकनेस’ असेही म्हणतात.

मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी, संतुलित आहार घेणे आवश्यक असते. यासाठी तेलकट व मसालेदार पदार्थांपासून दूर रहावे आणि रिकामे पोट राहू नये यासाठी दिवसातून वरचेवर थोडेथोडे जरूर खावे. तसेच शरीर हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणीही प्यावे. सकाळी आपण जेव्हा झोपेतून उठता तेंव्हा रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत करण्यासाठी अंथरुणावरुन खाली जाण्यापूर्वी काही साधे बिस्किटे किंवा टोस्ट खावीत. यामुळेही मळमळ व उलट्या कमी होण्यास मदत होईल. मात्र जर उलटी सतत होत असेल, पाणीही उलटून पडत असेल तर आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

थकवा येणे –
गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाबही कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशयात वाढणाऱ्या छोट्याशा बाळाला वाढविण्यासाठी आईच्या शरीरातील बरीच ऊर्जा वापरली जाते. यांमुळे गरोदरपणी थकवा येत असतो. सुरवातीच्या दोन महिन्यात थकवा जास्त जाणवतो त्यामानाने तीसऱ्या महिन्यापर्यंत थकवा व अशक्तपणा कमी होत जातो.

थकवा जाणवत असल्यास अशावेळी योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. यासाठी दिवसा विश्रांती घेणेही उपयुक्त असते. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळेही थकवा जाणवू शकतो. अशावेळी डॉक्टरांनी दिलेली लोह वाढीसाठीची औषधे नियमितपणे घेणे आवश्यक असते.

पोटात दुखणे –
स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत असल्याने, गर्भाशयाचे स्नायु खेचले जातात त्यामुळे ओटीपोटातही दुखू शकते. गरोदरपणात ओटीपोटात दुखणे ही एक सामान्य बाब आहे. अशावेळी थोडी विश्रांती घ्यावी. ज्या बाजूला दुखत असेल त्याच्या विरुद्ध बाजूवर झोपून आराम करावा. मात्र अधिक तीव्रतेने ओटीपोटात दुखत असल्यास, योनीतुन रक्तस्त्राव किंवा पाणी जात असल्यास आपल्या स्त्रीरोगतज्ञांचा तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे.

योनीतून ब्लीडींग किंवा रक्तस्राव होणे –
साधारणपणे 20% ते 30% पर्यंत गरोदर स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यात योनीतून रक्तस्त्राव होत असतो. या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. दुसऱ्या महिन्यात जर गर्भ हा गर्भाशयाच्या खालच्या भागात रुजला असेल तर, नाळेची (प्लेसेंटाची) जागा खाली असू शकते. याला placenta previa असे म्हणतात. अशावेळी, गरोदर स्त्रीला योनिगत रक्तस्त्राव होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

योनीतून रक्तस्राव होत असल्यास गरोदर स्त्रीने विश्रांती घ्यावी, लैंगिक संबंध (सेक्स) टाळावे, जड वस्तू उचलू नयेत इ. सूचनांचे पालन करावे. गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधामुळे (म्हणजे सेक्स केल्यामुळे) रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय इतर कारणांनीही, या महिन्यात योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो.

काहीवेळा गरोदरपणात योनीतून रक्तस्त्राव होणे हे धोकादायक लक्षणही ठरू शकते. ह्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. अशावेळेस आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाची तपासणी व उपचार करून घेणे गरजेचे असते.

precautions during second month of pregnancy in Marathi information.