शाळेतील मुलांसाठी आवश्यक आहार

8167
views

मुलांची खाण्याच्या बाबतीत तक्रार असल्यास डॉक्टरांकडे जाऊन टॉनिक, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणणे असले उद्योग सुरू होतात. मुलांच्या योग्य वाढीसाठी, त्यांच्या सर्वागीण विकासासाठी असे कृत्रिम उपाय योजण्यापेक्षा योग्य आहारातूनच त्यांना आवश्यक असलेली पोषक द्रव्यं मिळावीत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मुलांना बाहेरची चटकदार भेळ, पिझ्झा वगरे खाणं आवडतं, असे चमचमीत पदार्थ घरातही खायला मिळावेत, असं त्यांना वाटतं. पण हे दररोज शक्य नसल्यामुळे मुलं बाहेरील खाद्य पदार्थाकडे आकर्षिली जातात. पर्यायानं मुलांच्या आरोग्याची हानी होण्यास सुरुवात होते. मुलांनी चवीनं जेवावं यासाठी रोजचेच पदार्थ थोडेसे बदलून, त्यांच्या चवीत फरक करून मुलांना खाऊ घातले तर ते आवडीनं खातील.

शिशुअवस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंत मुलांचा शारीरिक विकास अधिक गतीने होत असतो व युवावस्थेपर्यंत तो पूर्णात्वास जातो. या वाढत्या वयातच मुलांचे योग्य पोषण होणे गरजेचे असते. याच वयात हाडांच्या मजबुती व तंदुरुस्तीकरिता योग्य आहाराची तसेच व्यायामाची मुलांना आवश्यकता असते. या वयातील योग्य पोषणाने भविष्यात उद्भवणारे अनेक आजार- जसे की संधिवात, फ्रॅक्चर्स आपणास टाळता येऊ शकतात.

म्हणूनच तुमच्या मुलांच्या हाडांच्या मजबुतीकरिता व तंदुरुस्तीकरिता सकस आहार, योग्य प्रमाणात सत्त्व आणि क्रियाशील जीवनशैली मिळणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हाडं ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीननेच बनलेली असतात आणि त्यामुळे ही घटकद्रव्ये मूलभूत प्रमाणात मिळाली, तर आपण हाडांची ताकद आणि स्थिरता सांभाळू शकतो.

मुलांच्या मागे सारखे ‘खा.. खा..’ म्हणून लागू नका. जेंव्हा त्यांना भूक लागेल तेंव्हा ते आपणहून सांगतील, त्यावेळी त्यांना खायला द्या.वयोमानानुसार त्या वयातील जास्त हालचालींमुळे मुलांना भूक लागतेच. खूप वेळा अनेक माता आपली मुलगी वा मुलगा जाड होईल, म्हणून त्याला जास्त खाऊ नकोस म्हणून टोकत असतात. पण हे चुकीचं आहे. बालवयातच मुलांच्या शरीराची वाढ होत असते. सर्व अवयव विकसित होत असतात. त्याचवेळी मुलं खूप खेळत असतात. त्यासाठी त्यांना भरपूर ऊर्जेची आणि ताकदीची गरज असते. हे सर्व त्यांना योग्य पौष्टिक आहारातूनच मिळते आणि तसा आहार मिळाला तर त्यांचा शारीरिक विकासही योग्य रितीनंच होतो. मुलांना जेवढी भूक असते, तेवढंच अन्न मुलं खातात. जास्तही खात नाहीत आणि कमीही खात नाहीत. त्यांचं वजन प्रमाणाबाहेर वाढू नये, असं जर वाटत असेल तर बेकरी प्रॉडक्ट्स, वेफर्स, शेव, चिवडा अशा शेलक्या पदार्थापासून त्यांना दूर ठेवा. म्हणजे आहारात त्यांचं प्रमाण अगदी कमी ठेवा. पण आपलं रोजचं जेवण त्यांना मनाप्रमाणंच घेऊ द्या.

जेवायच्या वेळी मुलांना फक्त आणि फक्त जेवणच द्या. त्या वेळी स्नॅक्स म्हणजे वेफर्स, शेव, चिवडा, लाडू, चॉकलेट वगरे काही मागितले तर अजिबात देऊ नका. याचं कारण म्हणजे भुकेच्या वेळी सटरफटर काही खाल्लं की भूक मरते आणि जेवायची इच्छा होत नाही. शाळेतून आल्यानंतर चहा, दुधाबरोबर त्यांना काय खाऊ खायचा ते खाऊ दे, पण जेवायच्या वेळी जेवणच करायची सवय त्यांना लावा.

मुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत. वयानुसार शरीराची पौष्टिक पदार्थांची गरज बदलत असते.
मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो.

शाळेतील मुलासाठी आवश्यक आहाराचे प्रमाण
प्राथमिक शाळेतील मुलासाठी आहार :

वयोगट – ५ते ९ वर्षे
आवश्यक कॅलरीज – १२०० ते १७०० कॅलरीज
रोज सुमारे २ ग्लास दूध, ३ भाजी, १/२ कप डाळ आणि आवश्यक (भुकेप्रमाणे) भात भाकरी पोळी असा दिवसभराचा आहार असावा.
शाळेत जाणा-या मुलांना प्रथिनांची आवश्यकता असते. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. मुलांना काकडी, गाजर खाऊ घाला. दूध, दही आणि पनीरमधून कॅल्शियमची गरज पूर्ण होते.

माध्यमिक शाळेतील मुलासाठी आहार :
वयोगट – १० ते १५ वर्षे
आवश्यक कॅलरीज – १७०० ते २५०० कॅलरीज
किशोरवयीन मुलांना जंकफूड आवडते, पण त्याने वजन वाढते. हार्मोन्समध्ये बदल होतात. मुलांना टाइप टू मधुमेह होऊ शकतो. मुलांना चौरस आहार उदाहरणार्थ भाजी, पोळी, वरणभात, सॅलड, दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडे, मांस-मासे असा आहार असावा.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.