शीतपित्त : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती

3183
views

Urticaria in Marathi, Shitpitta information in Marathi, Skin Diseases Marathi Tvacharog information.

शीतपित्त सामान्य माहिती व शीतपित्त म्हणजे काय..?
शीतपित्त यामध्ये अंगावर खाज सुटते व लहान-मोठ्या गांधी उठतात. शीतपित्त हा आजार Urticaria, hives अशा नावानेही ओळखला जातो.
अंगावर गांधी उठणं हा एक अतिशय सामान्य आजार असून हे त्वचेवर पित्ताची गांधी उठण्यामागे मुख्य कारण ज्या पदार्थाचे अ‍ॅलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिसटामीन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून लालसरपणा येणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात.

शीतपित्ताची लक्षणे :
• अंगावर अचानक खाज सुटते,
• ‎अंगावर पित्ताच्या गांधी उठतात,
• ‎सुरवंट अंगावरून फिरल्यावर जशा गांधी उठतात तशाच या गांधी असतात,
• ‎त्वचेवर लालसर सूज दिसणं,
• ‎सुजलेल्या त्वचेवर अगदी छोटे छोटे खड्डे दिसणं.

अ‍ॅलर्जी ओळखा..
शीतपित्ताचा त्रास हा एखाद्या पदार्थाच्या अ‍ॅलर्जीमुळे होत असतो. त्या पदार्थापासून दूर राहिल्यास निश्चितच हा त्रास होणार नाही.
मग प्रश्न असा आहे की, आपल्याला एखाद्या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे हे कसे शोधून काढायचे?
वारंवार असा त्रास होणाऱ्या व्यक्तीला आपल्याला कशामुळे असा त्रास होतो, हे लवकरच समजतं.
रुग्णास कधीकधी वांगी, फरसाण, तूरडाळ, हरभरा डाळीचे पदार्थ, मांसाहार, अंडी अथवा उष्ण व मसालेदार पदार्थ खाण्यात आल्यास याचा त्रास जाणवतो.
यासाठी एक लिस्ट बनवा त्यात आपण रोज घेत असलेल्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांंची नावे लिस्टमध्ये लिहा. त्यानंतर कोणता पदार्थ खाल्यावर त्रास होतो हे आपल्या निरीक्षणातून ओळखणे सोपे जाईल.
जर पुरळाचे कारण थंड किंवा उष्णपणा असं असेल तर त्याकडे लक्ष द्यावं लागतं. उदा. ज्यांना थंडपणाने त्रास होतो, त्यांनी थंड पाण्यात पोहणं, शीतपेये पिणं टाळायला हवं.
तसेच काही तपासण्या करूनही आपल्याला कोणत्या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे शोधून काढता येते.

शीतपित्त उपचार :
शीतपित्त उपचारासाठी अँटी-हिसटामीन औषधे दिली जातात. अशा औषधामुळे खाज तात्पुरती कमी होते मात्र पुन्हा शीतपित्ताचा त्रास उदभवतो. मुळापासून हा त्रास घालविण्यासाठी शीतपित्ताच्या मूळकारण म्हणजे अ‍ॅलर्जीे असणारा पदार्थ दूर ठेवणे हा आहे. असे पदार्थ शोधणं आणि टाळणं हाच उपाय आहे. काही जणांना हा त्रास वर्षानुवर्षे होऊ शकतो.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

बहुतांशी लोक अंगावर गांधी उठून खाज सुरू झाली की एक सेट्रीझिन किंवा Ebastine नावाची गोळी घेतात. याने खाज थांबते आणि तात्पुरते बरे वाटते; पण याचे दीर्घकालीन दुष्परिणामही अधिक आहेत. मात्र याच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त लागते. किडनीचे आजार उदभवतात म्हणून या आजारावर अशा गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे.

स्मार्ट टिप्स :
शीतपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी हे करा.
• अंगावर खाज येऊन लहान-मोठ्या गांधी उठतात तेंव्हा त्यासाठी आमसुले पाण्यात भिजवून ते पाणी लावा.
• ‎करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते.
• ‎अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचा पाला घालून उकळलेले पाणी मिसळावे.
• ‎पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे. एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते.
• ‎खोबरेल तेल कोमट करून सर्वागाला लावणे याने लगेच बरे वाटेल.
• ‎पित्त वाढवणारे पदार्थ जसे आंबलेले दही, चहा-कॅाफी, बेसन, पापड, ब्रेड, लोणचे, जास्त खारट-तिखट पदार्थ खाऊ नये.



प्रतिक्रिया द्या :