गजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय

11391
views

Ringworm Nayata in Marathi, Gajakarna upay, Gajakarna Marathi information, Skin diseases in Marathi.

गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.

गजकर्ण, नायटा लक्षणे :
या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, स्तन ग्रंथीवर दिसतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.
हाच आजार जर हातावर झाला तर त्याला टीनिया मानम म्हणतात आणि पायावर झाला तर टीनिया पेडीस/अॅथलिट्स फुट असं म्हणतात.

गजकर्ण रोग प्रसार :
• गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो.
• ‎स्नानगृह, स्विमिंगपूल, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते.
• ‎प्राण्यांमध्येही गजकर्ण हा रोग आढळतो. ह्या रोगाचा प्रसार अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यानेही होतो.

संसर्ग झालेल्या बुरशीच्या प्रकारानुसार गजकर्णावर उपचार केले जातात. कोणत्या प्रकारची बुरशी आहे हे लॅबमध्ये सूक्ष्मदर्शकाने ठरवितात. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास बुरशी संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.

गजकर्ण, नायटा उपाय :
• गजकर्ण, नायटा होऊ नये यासाठी नियमित अंघोळ करावी. वयक्तिक स्वच्छता पाळावी.
• ‎सॅलिसिलिक ऍसिड, बेंझॉइक ऍसिड, रिसॉर्सिन, अ‍ॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे गजकर्णावर गुणकारी आहेत.
• ‎संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे (अँटी-बायोटिक) पोटात घ्यावी लागतात.

 


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :