मुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि आधुनिक उपचार

1658
views

मूळव्याध यालाच ‘पाईल्स’ किंवा ‘हेमोरहोयडस्’ असेही संबोधले जाते. आज बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा.
मूळव्याध हा आजार बैठे काम करणा-या लोकांमध्ये विशेष करून आढळतो. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. सामान्यता गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाली आहे, अशीचं प्रत्येक रुग्णाची भावना असते. मात्र गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात. यामध्ये फिशर, भगंदर, मलावष्टंभ (Constipation) आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्ये होत असतात.

मुळव्याध हा आजार दोन प्रकारांत मोडला जातो.

1) अंतर्गत मुळव्याध 2) बाह्य मुळव्याध

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

अंतर्गत मुळव्याध :
यालाच इन्टर्नल पाईल्स असे म्हणतात. आतील बाजूस झालेल्या मूळव्याधीमध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होतात तसेच तेथील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होतो.  गुदद्वाराच्या आतील बाजूस प्रभावित झालेल्या रक्तवाहिन्या फुगतात त्यामुळे सूज व वेदना रोग्याला जास्त जाणवते.  या आजारात प्राथमिक लक्षणं जास्त नसतात. शौचास साफ न होणं असं एक लक्षण असतं; परंतु वेदना, दाह कमी असतो. या व्याधीमध्ये शौचासोबत रस्त जाणं जास्त वेळा आढळतं.
यामध्ये मलत्याग करताना रोग्याला जास्त जोर द्यावा लागतो. त्या कारणास्तव रोग्याला खूप वेदना होतात. तसेच गुद्द्वाराला खाजणे, आग होणे, रक्तस्त्राव होणे या लक्षणांना सामोरे जावे लागते. आतील बाजूस मांसल गाठ तयार होऊन रोग्याला मलत्याग करण्यास कठीण जाते. काही गर्भवतींमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जास्त जोर द्यावा लागल्यास अशा स्त्रियांनाही मूळव्याध होण्याची संभावना असते.
या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये रोगी बध्दकोष्ठतेने त्रस्त असतो. तसेच अशा रुग्णांना खाली बसल्यानंतर त्रास होतो.

 मुळव्याध :
गुदद्वाराच्या बाह्य भागामध्ये म्हणजे अगदीच गुदद्वाराजवळ होणारे मुळव्याध खरेतर आतील मुळव्याधीच्या नसा जास्त फुगून त्या गुदद्वाराच्या बाहेेर येऊ लावातात व त्यातच बाह्य मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारात वेदना व दाह अत्याधिक असतो. रुग्णाला बसण्यासही त्रास होतो.  या प्रकारच्या रोग्यांच्या गुद्द्वाराला मोठमोठ्या आकाराचे मांसल गुच्छ जाणवतात. या प्रकारात वेदना, आग, खाजणे, रक्तस्त्राव अशा प्रकारच्या लक्षणांना रोग्याला सामोरे जावे लागते.

मुळव्याधीच्या लक्षणानुसार मुख्य चार अवस्था करता येतील.

अवस्था 1 : वेदना कमी, क्वचित दाह अशी लक्षणं या अवस्थेत असतात. प्राथमिक अवस्थेतील हा मुळव्याध केवळ औषधोपचारानं बरा होतो.

अवस्था 2 : शौचाच्या वेळी वेदना होणे, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव होणं, शौचास आग- खाज होणं, टोचल्यासारखे दुखणं अशी लक्षणं असतात. शौचाच्या वेळी गुदप्रदेशी मोड आल्याप्रमाणे जाणवते. ते बाहेर आलेले मोड शौचानंतर आपोआप जागेवर जातात. या अवस्थेतील मुळव्याध योग्य औषधोपचारानं बरा होऊ शकतो.

अवस्था 3 : शौचाच्या वेळी भयंकर, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव, आग होणं, खाज येणं, टोचल्यासारखं दुखणं ही लक्षणं वाढतात. या अवस्थेतील रोग्याला शौचाच्या वेळी बाहेर येणारे मुळव्याधीचे मोड हातानं दररोज आत ढकलावे लागतात. शस्त्रक्रियेशिवाय या अवस्थेतील मुळव्याध पूर्णपणे बरा होत नाही.

अवस्था 4 : या अवस्थेमध्ये वरील लक्षणं वाढतात आणि मुळव्याधीचा बाहेर येणारा भाग हातानं ढकलूनही आत जात नाही. शस्त्रक्रियेशिवाय या अवस्थेतील मुळव्याध पूर्णपणे बरा होत नाही.

आयुर्वेदात मूळव्याधीचे दोन प्रकार वर्णिले आहेत. विना रक्तस्राव (मोडाची मूळव्याध-शुष्क अर्श) आणि रक्तस्रावासहित (रक्ती मूळव्याध-रक्तार्श).

मूळव्याधीची कारणे :
बध्दकोष्ठता (Constipation) – मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बध्दकोष्ठता. पोट व्यवस्थीत साफ न होणे तसेचं मलाचा खडा धरणे म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणूनच बध्दकोष्ठता असलेल्या रुग्णांनी वेळीच त्यावर उपचार घ्यावेत. बध्दकोष्ठतेमुळे गुद्धवाराच्या रक्तवाहिनीला अडथळा निर्माण होतो व तेथील रक्तवाहिन्या कमजोर होत जातात. त्या कारणानेच मूळव्याध ही व्याधी निर्माण होते.

बैठी जीवनशैली – बैठे काम करणा-या लोकांमध्ये, व्यायामाचा अभाव असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या लोकांमध्ये सुरुवातीला बध्दकोष्ठता होऊन त्याचे रुपांतर मूळव्याधीमध्ये होऊ लागते.

अयोग्य आहारामुळे – तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे, चहा-कॉफी अतिप्रमाणात पिणे, अवेळी जेवण यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो व मूळव्याधीस आमंत्रण मिळते.

हे करा..

 • पालेभाज्या- आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या घ्याव्यात. कच्च्या पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण त्यामधील फायबर्समुळे पोट साफ राहण्यास मदत होते. तसेच फळे खाताना शक्य असेल तर फळ सालीसकट खावे.
 • चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ यांचे सेवन करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.
 • स्टीमबाथ- मूळव्याधीच्या रोग्याने थोड्या प्रमाणात स्टीम बाथ घ्यावे. त्यामुळे रक्तस्त्राव थांबण्यास व वेदना कमी करण्यास मदत होईल.
 • रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते घ्यावे.
  मुळव्याधमध्ये मोडाचा त्रास होत असल्यास, 1 चमचा मोहोरी आणि 2 चमचे दूध यांची बारीक पेस्ट करायची आणि ती दिवसातून 3-4 वेळा मोडावर लावायची, 15 – 20 दिवसात पूर्ण बरे होतात.
 • सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.

अत्याधुनिक शस्त्रक्रिया :
सध्या या आजारावर जलद तरीही परिणामकारक उपचारपद्धती उपलब्द आहेत. त्यात लेसर तंत्राच्या उपचारांचा समावेश होतो. लेसर हेमरॉईडप्लास्टी (LHP) ही एक अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती आहे. ही पद्धती वेदनारहित असून, त्यात कमीतकमी छेद घेऊन काही तासांतच रुग्णाला आराम मिळतो. LHP उपचार तंत्र हे मोडाच्या मूळव्याधीसाठी उपयुकत आहे, तर  भगंदरावरील उपचारासाठी फिलेसी (फिस्टुला ट्रॅक्ट लेसर क्लोजर) हे उपचारतंत्र उपलब्ध आहे. मूळव्याधीच्या प्राथमिक टप्प्यात जेव्हा रुग्णांना मलविसर्जनाच्या वेळी होणारा रक्तस्राव आणि वेदना रोखता येत नाहीत तेव्हा ही दोन्ही उपचार तंत्रे प्रभावी ठरतात.

मूळव्याधीच्या विकारात मलविसर्जनाच्या वेळेस रक्तस्राव झाल्यामुळे रुग्ण घाबरून जातो. त्यासाठी मलमार्गात (रेक्टल) होणार्‍या रक्तस्रावावरही आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.

त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

 • शस्त्रक्रियेदरम्यान छेद घेतला जात नाही. त्यामुळे टाके घालण्याची गरज नाही.
 • शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्ण घरी जातो व एक-दोन दिवसांत कामावर रुजू होऊ शकतो.
 • शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास कमीतकमी, आजार लवकर बरा होण्यास मदत होते.
 • संबंधित भागापुरती भूल देऊन किंवा कमी वेळ भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते.


प्रतिक्रिया द्या :