नवजात बालकाची देखभाल कशी कराल

3459
views

बालसंगोपन :
जन्मलेल्या बाळाचं वजन किती असावं?
जन्मत: बाळाचं वजन निदान अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होतं आणि 1 वर्षाने तिप्पट होतं. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.

अपूर्ण वाढीचे मूल कसे ओळखावे ?
बाळंतपण 37 आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन 2 किलो पेक्षाही कमी असत. उंची18 इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणं गरजेच असते.

बाळाचे वजन कमी असल्यास काय काळजी घ्यावी ?
त्याला सतत आईच्या जवळ ठेवावे.
बाळाला नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्यावर टोपी घालावी.
आईने बाळाला स्तनपान नीट काळजीनं करावं. स्तनपान दर दोन तासांनी (थोडया-थोडया अंतरानं) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. तसंच त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे.

बाळाची नाळ किती दिवसांनी पडते ?
साधारणपणे 6-7 दिवसांनी बाळाची नाळ पडते. पहिले 3-4 दिवस त्यातून थोडा स्त्राव येतो. त्यामुळे तिथे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

प्रत्येक बाळाला जन्मल्यावर कावीळ होते का ?
सुमारे निम्म्या बाळांना जन्मल्यावर तिसऱ्या दिवशी कावीळ होते व 5-6 दिवसांनी ती कमी होते किंवा आपोआप नाहीशी होते. आईच्या रक्तपेशी बाळाच्या रक्तात बाळाच्या रक्तात असतात. त्यांचा नाश झाल्यामुळे कावीळ होते. त्याबद्दल फारशी काळजी करू नये. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते. पण जन्मल्यानंतर लगेच कावीळ दिसल्यास किंवा 7-8 दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकल्यास मात्र डॉक्टरांना दाखवणं आवश्यक असते.

जन्मल्यानंतर बाळ शी-शू कधी करते ?
पहिल्या 12 तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी 3-4 दिवस होते. एक संपूर्ण दिवस बाळाला शी झाली नाही तर काही व्यंग आहे का ते पहावं व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतेक मुले एक-दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे. कपडे ओले होतात की नाही ते पहावे. लघवीची धार व्यवस्थित असेल तर मुत्रमार्गाला काही अडचण नाही असं समजावं. शू केला नाही तर डॉक्टरांना दाखवावं.

बाळाला रोज तेल लावून आंघोळ घालावी का ?
बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कणात, गुदद्वारात तेल सोडणे चुकीचे आहे. आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. बाळाचे अंग पोट रगडू नये, हात, पाय हलक्या हाताने चोळावेत. दूध, हळद डाळीचे पीठ एकत्र करून अंगास लावावे व नंतर पाण्याने किंवा साबणाने अंग स्वच्छ धुवावे. बाळाच्या त्वचेवर जी लव असते ती चोळून काढण्याचा प्रयत्न करू नये. आंघोळ झाल्यावर मऊ स्वच्छ फडक्याने बाळाचे अंग टिपावे. जोराने पुसू नये.

आंघोळीनंतर बाळाला काजळ घालण्याचे काहीच कारण नाही. काजळाने डोळे मोठे होतात, डोळे स्वच्छ राहतात हे सारे चुकीचे आहे. उलट काजळ घातल्याने काजळाने किंवा अस्वच्छ बोटांमुळे जंतूदोष निर्माण होऊ शकतो. काजळ लावल्यामुळे दृष्ट लागत नाही, अशाही भोळ्या समजुतीने काजळ लावले जाते तेही चुकीचे आहे.

बाळाच्या टाळूची काळजी कशी घ्यावी ?
टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. तसे करण्याचे काहीच कारण नाही. कारण मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात. साधारणपणे एक ते दीड वर्षात ती जुळून येतात. ती जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.

बाळ झोपत नसले, रडत असले तर त्याला काय झाले असावे ?
त्याला किडा मुंगी चावली असेल किंवा डास, ढेकूण चावले असावेत. बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत.

बाळाचे कपडे कसे असावेत ?
बाळाचे कपडे सैल असावेत. सुती असावेत. थंडीच्या दिवसात गरम कपडे असावेत पण ते आतून मऊ असावेत. प्लास्टिक चड्डी, नायलॉनचे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ओले केलेले कपडे त्वरित बदलावेत. कपडे स्वच्छ असावेत.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :