गुडघेदुखी व त्यावरील उपचार

3046
views

Knee pain in Marathi information, Knee pain treatment in Marathi, Knee replacement in Marathi, Knee pain Marathi tips, Gudaghe dukhi Marathi mahiti.

गुडघेदुखी माहिती : कारणे, लक्षणे आणि उपचार –
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे आज उतारवयात प्रामुख्याने होणारा गुडघेदुखी सारख्या विकाराने आज अगदी तरुण वयामध्ये गुडघा कुरकूर करू लागल्याची तक्रार वाढलेली आहे. मात्र, व्यस्त जीवनामुळे, रोग अंगावर काढण्याच्या सवयीमुळे गुडघेदुखीवर सुरुवातीपासूनचं दुर्लक्ष केल्याने अखेर शेवटच्या टप्प्यातील गुडघ्याचा आर्थ्रायटिस जडल्याचे निष्पन्न होते. मगं आर्थ्रायटिस जडल्यानंतर डॉक्टरांकडून सांधे बदलाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. सांधे बदलाचे ऑपरेशन ही आता नवीन बाब राहिलेली नाही. पण तरीही अनेकजण माहितीअभावी या ऑपरेशनबाबत साशंक असतात. यासाठी येथे आर्थ्रायटिसमधील सांधे बदलाच्या उपचार पध्दतीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

दररोजची धावपळ-व्यस्तपणा, घरच्या जबाबदाऱ्या अशी असंख्य कारणे पुढे करून सुरवातीच्या काळात होणाऱ्या गुडघेदुखीकडे अनेकजन दुर्लक्ष करतात. परस्पर गुडघेदुखीवर घरच्या घरी उपचार सुरु करतात. नानाविध तेले गुडघेदुखीवर लावली जातात. वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेतात. आणि तरिही वेदना वाढत गेल्यावर मगं डॉक्टरकडे धाव घेतात. अनेकदा तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यातील आर्थ्रायटिस जडलेला असतो. अशा वेळेस पेशंटनी ऑपरेशन करून घेणे हिताचे ठरते.

गुडघ्याचा आर्थ्रायटिस लक्षणे :

 • गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होतात.
 • रुग्णाला दररोजची कामे करतानाही त्रास होतो.
 • सांधे दुखावणे, सांध्याची हालचाल मंदावणे, सांध्यावर सूज निर्माण होणे,
 • चालल्यावर गुडघेदुखी वाढणे व आराम केल्यास बरे वाटणे,
 • उठायला बसायला त्रास होणे,
 • शेवटच्या टप्प्यात पेशंटचे गुडघे वाकडे झालेले असतात.

गुडघेदुखीची कारणे :

 • गुडघेदुखी व संधिवात हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे. जसे व्यक्तीचे वय वाढत जाते त्याप्रमाणे सांध्यातील कुर्चांची झीज होत जाते त्यामुळे गुडघेदुखी होते.
 • व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा ही कारणे गुडघेदुखी होण्यास सहाय्यक ठरतात.
 • लठ्ठ व्यक्तींच्या वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त भार निर्माण होऊन कुर्चांची झीज वाढते.
 • तसेच गुडघ्याच्या ठिकाणी आघात झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात.
 • संधिवात हा आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो.

सांधेबदलाचे ऑपरेशन :
गुडघेदुखीच्या वेदनांपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. सांधेबदलाचे ऑपरेशन आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहजसोपे झाले असून ऑपरेशन यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच चांगले झाले आहे. त्यामुळे पेशंटना खूप फायदा होतो. वेदनांपासून कायमची मुक्ती मिळते आणि दैनंदिन जीवन खूपच सुकर होते.

ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावे लागते..?
जर एकाच गुडघ्यावरील सांधेबदलचे ऑपरेशन असेल, तर पेशंटला फक्त चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
ऑपरेशननंतर गुडघ्यात थोडी वेदना व सूज जाणवते. वेदना सहन करण्याजोग्या असतात. गोळ्या घेऊनही वेदनांपासून आराम मिळवता येतो. एका महिन्यानंतर पेशंटला कोणत्याच गोळ्या घेण्याची गरज भासत नाही.
ऑपरेशन झाल्यावर पेशंटला दुसऱ्या दिवसापासूनच चालायला सांगितले जाते. शौचाला जाणे व इतर कामे स्वतः करू शकतो आधुनिक ऑपरेशनमुळे पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर जाईपर्यंत काठीच्या आधाराने चालायला लागलेला असतो.

ऑपरेशनमध्ये काय करतात..?
या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये झिजलेल्या कुर्च्यासोबत(कार्टिलेज) हाडाचा काही भाग काढून टाकला जातो. त्याजागी धातूची प्लेट व प्लॉस्टिक बसवण्यात येते. या ऑपरेशननंतर गुडघ्याचे आयुष्य वाढते. पण या ऑपरेशनंतर खूप काळजी घ्यावी लागते.

सांधेबदल ऑपरेशनची तंत्रे :
(1) कम्प्युटर असिस्टेट सर्जरी (सीएएस) –
यात सांधेबदलाचे ऑपरेशन करण्यासाठी कम्प्युटरची मदत घेतली जाते. यामुळे ऑपरेशनमध्ये अचूकता येते आणि पेशंटला लवकर आराम मिळतो. मुख्य म्हणजे, या तंत्रामुळे बदललेल्या गुडघ्याचे आयुर्मान वाढत असल्याने हे ऑपरेशन तरुण पेशंटसाठी फायद्याचे ठरते.
(2) टिश्यू स्पेअरिंग सर्जरी –
यात स्नायू कापला जात नाही. त्याऐवजी स्नायू आत ओढला जातो. या तंत्रामुळे पेशंटला क‌मीतकमी वेदना सहन कराव्या लागतात.

गुडघारोपणाचे प्रकार :
रूग्णाच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या गुडघ्यांचे रोपण करता येते. सर्वसाधारण गुडघे रोपणातून 120 अंशापर्यंत आणि हाय फ्लेक्स रोपणातून 150 अंशापर्यंत गुडघ्याची हालचाल करता येते. आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून कोणत्या प्रकारचे रोपण कराययचे याचा निर्णय घेता येतो.

Gudaghe dukhi upaay Marathi mahiti.
Knee pain Treatment info in Marathi


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :