जननी सुरक्षा योजनेची माहिती

3163
views

Janani suraksha yojana in Marathi

जननी सुरक्षा योजनेची माहिती –
जननी सुरक्षा योजना केंद्रशासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005-06 या वर्षी सुरु केली आहे. राज्याने शासन निर्णय क्र. JSY2005/670 Prs. Kra.171/ FW 3 dated 26/10/2005 अन्वये या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली. त्यानुसार प्रथम ग्रामीण भागात ही योजना कार्यान्वित झाली आहे.
शासन निर्णय क्र. JSY 2005/670/ Pra.Kra. 171/ FW dated 14/08/2006 अन्वये ही योजना नागरी भागात नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणीस मंजूरी दिली. या योजनेत दारिद्रय रेषेखालील मातांना लाभ देण्यात येतो.
शासन परिपत्रक क्र. JSY/2006/ Pra.Kra.175/FW 3 dated 22/12/2006 अन्वये या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात व शहरी भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ देण्यास मान्यता दिली आहे.

योजनेचे उद्दिष्ट –
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील (मुख्यतः चाळी, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती इत्यादी) दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे असे आहे.
लाभार्थी पात्रता –
◦ दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी
◦ अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील)
◦ सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्षे असावे.
◦ सदर योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.

योजनेअंतर्गत लाभार्थीस दिला जाणारा लाभ –
(1) प्रसुती घरी झाली तर रु. 500/- (रुपये पाचशे फक्त) एवढा लाभ लाभार्थींना देय राहतो.
(2) शहरी भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 600/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.
(3) ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 700/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.
(4) सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रु. 1500/- चा लाभ देण्यात येतो.
वरील लाभ हा धनादेशाद्वारे देण्यात येतो.
उपकेंद्रस्तरावर जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य सेविकांच्या नावे सब-अकाउंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर अकाऊंट मधून लाभार्थींना लाभ देण्याच्या धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य सेविका यांना देण्यात आलेले आहेत.

सेवा केंद्रे –
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका-नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो.
जननी सुरक्षा योजने अंतर्गत् “आशा” कार्यकर्तीने लाभार्थीस आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास आदिवासी व बिगरआदिवासी कार्य क्षेत्रातील “आशा” कार्यकर्तीस अनुक्रमे रु. 600/- व रु. 200/- देय आहे.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.