अॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त)


Acidity info in Marathi
आम्लपित्त किंवा अॅसिडीटी :
आजच्या या फास्टफूडच्या दुनियेत मध्यम वयोगटातील लोकांना भेडसावणारा विकार म्हणजे आम्लपित्त होय. यालाच अॅसिडीटीही म्हणतात. अशा ह्या अॅसिडीटीकडे आपण जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं ते त्रासदायक होणार आहे. अॅसिडीटी हा पचनसंस्थेअंतर्गत येणारा व्याधी आहे. अॅसिडीटी निर्माण होण्यामागची कारणं शोधून ती टाळण्यावर भर द्यायला हवा.
आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी पाचक रस तयार होत असतात. पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचे प्रमाण वाढले की आम्लपित्ताची लक्षणे दिसून येतात.

आम्लपित्त (अॅसिडीटी) ची लक्षणे :

 • अॅसिडीटीमुळे पोटात आग होणे,
 • छातीत जळजळणे,
 • मळमळ अथवा उलटी होणे,
 • तोंडात आंबट पाणी येणे,
 • तोंडाची चव बदलणे,
 • डोके खूप दुखणे,
 • शौचास साफ न होणे, ही प्रामुख्याने आम्लपित्त वाढल्याची लक्षणे दिसून येतात.

अॅसिडीटीची कारणे :

 • अयोग्य आहारामुळे – अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं, अतिशय आंबट खाणं, अतिप्रमाणात चहापान करणं, मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणं यामुळे,
 • पोटाचे विकार – पोटात गॅस होणे, अपचन, अल्सर, जठराचा दाह झाल्यामुळे,
 • मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण,
 • मानसिक चिंता, अतिजागरण अशी कारणं सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते.

हे करा..
पित्तनाशक औषधे देऊन अॅसिडीटीचा त्रास तात्पुरता बरा करता येतो, पण कायमचा बरा करता येत नाही. यासाठी खालील पथ्य पाळल्यास अॅसिडीटीचा त्रास कायमचा बरा होण्यास मदत होईल.

 • नेहमी अन्न चावून खाणे. जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात.
 • लिंबू पाणी घ्यावे
 • आहारात वरण भात आणि तूप घ्यावे. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो.
 • बाहेरचे खाणे एकदम बंद करावे.
 • सकाळी उठल्यावर नित्यनियमाने प्रात:र्विधी केले पाहिजेत. दिवसातून दोन वेळा मल: विसर्जनास गेल्यास अॅसिडीटीमूळे पित्त वाढून वारंवार होणारी डोकेदुखी कमी होते.
 • अॅसिडीटीच्या रोग्याने रोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात एक छोटा चमचा जिरे व धने घालून ठेवावेत व सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्यावे, याने आजार लवकर बरा होतो.
 • जेवणानंतर वज्रासन केले पाहिजे.
 • अति जागरण टाळावे.
 • मद्यपान व धुम्रपान पूर्णपणे बंद करावे.
 • आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे.
  वरील सर्व उपाय करून खबरदारी घेतल्यास आम्लपित्ताला नक्कीच बाय बाय करता येईल.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :