तोंड येणे – Mouth Sores :

तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे. या त्रासात ओठ, जीभ, घसा, गालाचा आतला भाग, हिरड्या यांवर फोड व जखम होत असते. या त्रासामुळे दात घासताना किंवा गरम किंवा तिखट अन्न खाताना त्याठिकाणी अतिशय वेदना होऊ लागतात.

तोंड येण्याची कारणे –

अनेक कारणांमुळे तोंड येत असते.

  • तुटलेला किंवा धारदार दात गाल किंवा जिभेच्या लागल्यामुळे तोंड येऊ शकते.
  • अन्न चावताना गाल किंवा जिभेच्या ठिकाणी चावल्यामुळे तोंड येते.
  • दात घासताना ब्रश लागल्यामुळे,
  • गरम पदार्थांचा चटका बसल्यामुळे,
  • तिखट, मसालेदार, अम्लीय पदार्थ खाण्यामुळे वारंवार तोंड येते.
  • तंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे,
  • तोंडातील इन्फेक्शनमुळे,
  • आजारपणामुळे रोग प्रतिकारशक्ती कमजोर झाल्यामुळे,
  • काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे तोंड येते.
  • शरीरातील व्हिटॅमिन-B12 आणि फोलेटच्या कमतरतेमुळे तोंड येऊ शकते.
  • प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे, तोंडात फोड येऊन तोंड येण्याची समस्या होत असते.

याशिवाय इम्युन सिस्टीमचे आजार, तोंडाचा कर्करोग ल्युकोप्लाकिया, कॅन्डिडिआसिस, हर्पस सिम्प्लेक्स, लाइकेन प्लॅनस, एरिथ्रोप्लाकिया अशा अनेक आजारातसुद्धा तोंडात फोड व जखमा होऊन तोंड येते.

तोंड येणे याची लक्षणे –

तोंड येण्याच्या त्रस्त ओठ, जीभ, हिरड्या, गाल, घसा ह्यावर फोड व जखम होते. फोड आलेल्या ठिकाणी वेदना जाणवत असतात. विशेषतः कोणताही पदार्थ खाताना किंवा पिताना त्रास अधिक होऊ लागतो. अशी लक्षणे या त्रासामध्ये असतात.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

तोंड येण्याची समस्या सामान्य असल्यास साधारण 10 – 12 दिवसांत त्रास बरा होतो. मात्र जर वारंवार तोंडात फोड व व्रण होत असल्यास, अनेक महिने तोंडातील जखम बरी होत नसल्यास किंवा फोडांवर पांढरे ठिपके आले असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

तसेच जर आपणास तंबाखू, पानसुपारी, गुटका, बिडी, सिगारेट किंवा मद्यपान यांचे व्यसन असल्यास व असा त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे. कारण ती लक्षणे तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात.

तोंड येणे यावरील घरगुती उपाय –

  • हळद घातलेले थंड दूध प्यावे.
  • आहारात दूध, तूप, तोंडलीची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
  • तोंड आलेल्या ठिकाणी तूप, मध, कोरफड लावल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
  • तुळशीची 3-4 पाने चावल्यानेही तोंड येणे या समस्येत आराम पडतो.
  • कडुनिंबाच्या रसात मध मिसळून गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

तोंड येणे याच्यावर वरील उपाय उपयोगी पडतात.

तोंड येणे यावरील उपचार –

बऱ्याचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात हा त्रास कमी होत असतो. तोंड येणे यावर आपले डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे आणि तोंडातील फोडांवर लावण्यासाठी मलहम देऊ शकतात. तसेच व्हिटॅमिन्स किंवा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे तोंड आले असल्यास डॉक्टर मल्टी-व्हिटॅमिन, B-कॉम्प्लेक्सची औषधे देतील.

तोंड येण्याची समस्या होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

  • वारंवार तिखट, मसालेदार, खारट व अम्लीय पदार्थ खाणे टाळावे.
  • जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
  • काळजीपूर्वक आणि सावकाश अन्न चावून खावे.
  • दात गालावर किंवा ओठांवर लागून जखम होत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या.
  • रोजच्या रोज दात घासावेत.
  • दात घासण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करा.
  • जास्त जुने झालेले ब्रश वापरणे टाळा.
  • तोंडाची स्वच्छता ठेवा.
  • कोमट पाण्याने गुळण्या करा किंवा माऊथवॉशचा वापर करा.
  • वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा.
  • तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहा.

हे सुध्दा वाचा..

Read Marathi language article about Mouth sores Causes, Symptoms, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.